Tuesday, May 7, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखSela Tunnel : सेला बोगदा : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर

Sela Tunnel : सेला बोगदा : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताची संरक्षण सिद्धता किती चोख आणि जबरदस्त आहे, याचे प्रत्यंतर काल मोदी यांच्याच हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या सेला या दुहेरी बोगद्याने येते. हा सेला बोगदा आसामातील कामेग आणि अरुणाचल प्रदेशातील तैवांग या जिल्ह्यांना जोडणारा आहे आणि तो जगातील सर्वात उंचीवरचा म्हणजे १३ हजार फूट उंचीवर आणि सर्वाधिक लांबीचा दुहेरी बोगदा आहे. हा अभियांत्रिकीचा चमत्कार भारतीय अभियंत्यांनी घडवला आहे. पण याचे महत्त्व इतकेच नाही, तर जो चीनसारखा देश भारताला सर्वाधिक मोठा शत्रू मानतो, त्या देशाला मोदी यांच्या सरकारने दिलेले चोख उत्तर आहे.

आता भारतीय सैनिक सर्वाधिक उंचीवर येणे – जाणे करू शकतील आणि चीनचे सैनिक खाली तळावर असतील. भारतीय सैनिकांची चीनच्या कोणत्याही सैनिकी हालचालींवर कडक नजर राहील. ही सामरिकदृष्ट्या सर्वात मोठी उपलब्धी आहे. चीनने आतापर्यंत भारताला सातत्याने त्रास दिला आहे आणि आता त्यांचेच औषध त्यांनाच पाजण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. त्याशिवाय मोदी यांच्या काळात देश सुरक्षित आहे, ही जाणीव आणखी मजबूत करणारा हा सेला बोगदा आहे. मोदी यांनी चीनला जाणवून दिले आहे की, भारत आता १९६२ चा भोळसट देश राहिलेला नाही.

पंडित नेहरू यांच्या काळात ‘हिंदी चिनी भाई भाई’ असे बकवास नारे दिले गेले आणि जो तो चीनच्या प्रेमात पडला. नेहरूंच्या भोळसट धोरणाचा इतकाच परिणाम झाला की, चीनने १९६२ मध्ये भारताशी युद्ध पुकारले आणि त्यात भारताचा दारुण पराभव झाला. काँग्रेसी सरकारांच्या काळात त्यांच्या साऱ्या संरक्षण मंत्र्यांना आसाम किंवा अरुणाचल प्रदेशात रस्ते, बोगदे, पूल वगैरे उभारावेत, याची गरजच वाटत नव्हती. त्यांचा युक्तिवाद तर अत्यंत हास्यास्पद असे. संरक्षणाकडे अत्यंत उपेक्षेने पाहिले जाई आणि मनमोहन सिंग यांचे संरक्षण मंत्री तर संसदेत असेही म्हणाले होते की, भारत – चीन सीमावर्ती प्रदेशात सुविधा तयार केल्या तर त्याचा उपयोग शत्रू राष्ट्राच्या सैनिकांना होईल. इतका हास्यास्पद युक्तिवाद कोणत्याही देशाने कधी केला नसेल. परिणाम इतकाच झाला की आसाम, अरुणाचल प्रदेश वगैरे इशान्येकडील राज्ये सैन्याच्या परिवहनासाठी कोणत्याही सुविधा देत नव्हती, पण मोदी यांचे सरकार आल्यावर या परिस्थितीत आता जमीन-अस्मानाचा फरक झाला आहे. लडाख, सेला, तवांग या प्रदेशात भारताचे सैन्य सुगमपणे हालचाली करू शकत आहे ते केवळ मोदी सरकारने तेथे या परिवहनाच्या सुविधा तयार केल्यानेच.

भारताच्या संरक्षण सिद्धतेमध्ये हा सेला बोगदा आणखी एक मानाचे मोरपीस साबित होणार आहे, कारण हा दुहेरी बोगदा आहे आणि सैनिकांच्या सुरक्षेसाठी तेथे मजबूत श्वसनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आत दिव्यांचा झगझगाट आहे, कारण इतक्या उंचीवर असताना प्राणवायू मिळवण्यात त्रास होतो. त्याचीही काळजी यात घेण्यात आली आहे. काँग्रेस सरकारांच्या काळात जे घडत नव्हते ते आता घडत आहे. काँग्रेसचे संरक्षण मंत्री होते ए. के. अँटनी, त्यांनी तर संरक्षण आधुनिकीकरणाचे सारे करार दाबूनच ठेवले होते. इतका उदासीन दृष्टिकोन असलेला संरक्षणमंत्री भारताला दुसरा लाभलेला नाही. आसाम आणि अरुणाचल प्रदेशात सुविधा तयार केल्या, तर त्याचा लाभ भारतीय सैनिकांना होईल, असा साधा विचार कुणा संरक्षण मंत्र्यांना शिवत नसे. त्यामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेशाला जोडणारा हा बोगदा चीनसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. चीनच्या विस्तारवादी धोरणाला हा जोरदार काटशह पंतप्रधान मोदी यांनी दिला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या काळात देशाच्या संरक्षण क्षेत्राने आत्मनिर्भरता प्राप्त केलीच आहे, पण भारताला संरक्षणदृष्ट्या बलवान आणि बलाढ्य बनवले आहे. हे परिवर्तन देशात घडत आहे आणि कोट्यवधी भारतवासी त्याचे साक्षीदार आहेत. बोगदा आता तयार झाल्यामुळे भारतीय सैनिकांना आता तेथून सीमावर्ती प्रदेशात ये-जा करणे सोपे झाले आहे. अरुणाचल प्रदेशातील कामेग ते आसामातील तेजपूर जिल्ह्यांना जोडणारा हा बोगदा १३ हजार फूट उंचीवर आहे. तो उभारण्यासाठी ८२५ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. देशाच्या संरक्षणावर इतका खर्च कशाला, अशा डरकाळ्या काँग्रेसवाले फोडत होते आणि त्यांना नंतर याचे उत्तर मिळाले की, चीनकडून भारताचा दारुण पराभव झाला. चीन हाच भारताचा क्रमांक एकचा शत्रू आहे, याची अक्कल येण्यासाठी काँग्रेसी तत्कालीन सरकारांना फार वेळ लागला. तोपर्यंत व्हायचे ते नुकसान होऊन गेले होते. सीमावर्ती राज्यांतील या कामांबद्दल असलेली केंद्र सरकारची उदासीनता आणि साधनसंपत्तीचा अभाव ही ती दोन कारणे आहेत, ज्यामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेशात सरकारांनी कधीच विकासकामे केली नाहीत. चीनच्या प्रेमात पडलेल्या पंडित नेहरू यांच्या काळातील सरकारांचा चीनप्रति असलेला मैत्रीभाव सोडून द्या. त्यानंतर नेहरूंच्या नीतीमुळे हिंदी चिनी भाई भाई असे नारे लगावले गेले. पण त्यातून देशाचे अतोनात नुकसान झाले. ही भरपाई आता मोदी सरकार करत आहे.

चीनने भारताला वारंवार गोड बोलून फसवले आणि काँग्रेसी लोक नेहरूंचे गोडवे गात होते. पण देशाच्या झालेल्या नुकसानाकडे कुणाचेच लक्ष नव्हते. ती सारी पापे आता मोदी सरकार धुऊन काढत आहे. त्याचवेळी भारतासमोर बलाढ्य राष्ट्र म्हणून जगाने नतमस्तक व्हावे, अशी कामे मोदी सरकार करत आहे. याबद्दल मोदी सरकारची करावी तितकी प्रशंसा कमीच आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -