Thursday, May 9, 2024
Homeताज्या घडामोडीPandit Dhaygude : पोटावरून दुचाकी नेत दोनदा विश्वविक्रम करणारे कोण आहेत पंडित...

Pandit Dhaygude : पोटावरून दुचाकी नेत दोनदा विश्वविक्रम करणारे कोण आहेत पंडित धायगुडे?

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बँकेचे शिपाई म्हणून करतात काम

स्वतःचाच विक्रम मोडत पुन्हा एकदा रचला ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’; काय आहे धायगुडेंची कहाणी?

सांगली : पोटावरुन अत्यंत जड असलेल्या दुचाकी जाऊ देत विश्वविक्रमाला (World record) गवसणी घालणारे पंडित धायगुडे (Pandit Dhaygude) यांनी स्वतःचाच विक्रम मोडत पुन्हा एकदा विश्वविक्रम रचला आहे. त्यांनी २०१६ मध्ये २५७ किलो वजनाच्या दोन दुचाकी लागोपाठ १२१ वेळा आपल्या पोटावरून जाऊ देत ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये (Guinness book of World Record) आपले नाव नोंदवले. यानंतर ७ मे २०२३ मध्ये २७६ किलो वजनांची वाहने ३७६ वेळा पोटावर चालवून त्यांनी विश्वविक्रम केला. या नव्या विक्रमाची नुकतीच ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात हा विश्वविक्रम झाल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाईचे काम करणाऱ्या पंडित धायगुडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पंडित तुकाराम धायगुडे यांनी हा विश्वविक्रम रचत जतच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांचा जन्म जत तालुक्यातील कंठी येथील धायगुडे वस्तीत झाला. आई-वडील आणि तीन भावंडे, पत्नी, मुलं असा परिवार. गरिबीचे चटके सोसतच त्यांचे बालपण गेले. आई – वडिलांसमवेत दुसऱ्यांच्या शेतात राबत दिवस काढले. जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक व दहावीपर्यंतचे शिक्षण जतमध्ये पूर्ण केले.

पंडित यांना लहानपणापासूनच खेळाची आवड होती. नोकरीसाठी त्यांनी मामामसमवेत मुंबई गाठली. मुंबईमध्ये आल्यावरही खेळाची आवड टिकवून ठेवली. मुंबईतील देवनार बकरी मंडीमध्ये काम करत करता फावल्या वेळेत कराटे प्रशिक्षण घेतले. सर्व अडचणींवर मात करत त्यांनी राष्ट्रीय स्तरावर दोन पदके मिळवली. त्यानंतर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००३ मध्ये त्यांची शिपाईपदी नियुक्ती झाली.

नोकरीची भ्रांत मिटली असली तरी आपण देखील काहीतरी वेगळे करून दाखवले पाहिजे, असा निर्धार करून त्यांनी सराव सुरू ठेवला. विविध स्पर्धांमधून पाच, दहा व २१ किलोमीटर धावणे सुरूच ठेवले. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करायचे, यातूनच वजनदार दुचाकी अधिकाधिक वेळा पोटावरून नेण्याच्या प्रकाराचा पंडित धायगुडे यांनी सराव केला. या मेहनतीचे फळ म्हणजे त्यांच्या नावाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये दोनदा नोंद झाली आहे.

विद्यार्थ्यांना देताहेत स्वसंरक्षणाचे धडे

शिक्षणासमवेत क्रीडाक्षेत्रातही आपलं नैपुण्य असणं भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, हे पंडित धायगुडेंनी जाणलं व अनुभवलं. यासाठी २००० पासून ते शाळेतील विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे, तसेच कराटेचे प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत. युवा पिढीला, खासकरून युवतींना एकटे वावरत असताना छेड काढणाऱ्याविरोधात आत्मसंरक्षण करता यावे. शिवाय, युवापिढी व्यसनांपासून दूर राहावी, यासाठी वेळोवेळी त्यांना प्रबोधन करण्याचे काम निःस्वार्थ भावनेने पंडित धायगुडे हे करत आहेत. भविष्यात सतत प्रयत्न करून आताच्या युवापिढीला आत्मपरीक्षणाचे धडे देण्याचे कार्य करायचे आहे. त्याचबरोबर युवापिढी व्यसनापासून दूर कशी राहील. यासाठी मी प्रयत्नशील राहीन, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -