Thursday, May 9, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यGokhale Bridge : फसलेल्या ‘त्या’ पूलावर पालिकेचे स्पष्टीकरण

Gokhale Bridge : फसलेल्या ‘त्या’ पूलावर पालिकेचे स्पष्टीकरण

  • मुंबई डॉट कॉम : अल्पेश म्हात्रे

गोपाळकृष्ण गोखले पूल बर्फीवाला पुलाला जोडण्यासाठी व्हीजेटीआय संस्थेकडून लवकरच सूचना घेण्यात येणार आहे. वाहन चालकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी गोखले पुलाची उभारणी करण्यात आली तरीही वाहतूक कोंडीची अडचण सोडवण्यात पालिकेला अपयशच आल्याचे दिसून येत आहे.

अंधेरी रेल्वे स्थानकावरून गोखले पुलाचा एक भाग जुलै २०१८ मध्ये कोसळला होता, यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. धोकादायक असल्याने हा पूल पाडून त्या पुलाची नव्याने पुनर्बांधणी करण्यात आली आणि आता पूल पूर्ण होण्यासाठी फेब्रुवारी २०२४ उजाडले. हा पूल अंधेरीतील बर्फीवाला उड्डाणपुलाला जोडण्याचे काम मुंबई महापालिकेकडून करण्यात आले, मात्र पालिकेच्या पदरी अपयशच पडले आहे, त्यामुळे हा पूल मुंबईकरांच्या दृष्टीने व महापालिकेला टीका करणारे लक्ष बनला आहे. यात करदात्या जनतेचा पैसा वाया गेला असून, त्यात चूक कोणाची याची चर्चा होताना जास्त दिसत आहे. त्यातच विरोधी पक्षांनी आता तर थेट पालिका आयुक्तांना त्यासाठी जबाबदार धरले असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र मुंबई महापालिकेने याबाबत आपले स्पष्टीकरण दिले असून, काही तांत्रिक बाबींची पूर्णता राहिली असून त्यासाठी रेल्वेलाही तेवढेच जबाबदार ठरवले आहे.

अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले पुलाचे बांधकाम करताना त्याची उंची रेल्वे प्रशासनाच्या धोरणानुसार वाढवण्यात आली. परिणामी, पुलाचे पोहोच रस्ते देखील अधिक उंच झाले. याचा परिणाम म्हणून बर्फीवाला पुलाच्या दिशेने तीव्र उतार तयार झाला असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. वाहन चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इतक्या तीव्र उतारावर आहे त्या स्थितीत जोडणी करणे शक्य नाही, त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय) संस्थेची मदत घेण्यात येत असून, लवकरच त्यांच्याकडून सूचना अपेक्षित आहेत. या सूचना प्राप्त होताच गोखले पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांमध्ये बर्फीवाला पुलाची जोडणी करण्याचा समावेश करून ती कामे हाती घेण्यात येणार आहेत.

आता मुंबई पालिका, रेल्वे प्राधिकरण, सल्लागार यांच्यासोबत सातत्याने बैठका घेऊन बर्फीवाला पूल हा गोखले पुलासोबत जोडण्यासाठी अनेक पर्यायांवर विचारमंथन करण्यात येत आहे. व्हीजेटीआय संस्थेच्या सल्लागारांनी प्रकल्पस्थळी भेट दिली असून, दोन्ही पूल जोडण्यासाठीची पद्धती त्यांच्याकडून सुचवली जाणे अपेक्षित आहे. ही पद्धती पालिकेला सुचविण्यात आल्यानंतर दोन्ही पुलाच्या जोडणीचे काम हाती घेण्यात येईल. त्यासोबतच दुसऱ्या टप्प्याचे कामही त्याचवेळी जलदगतीने करण्यात येईल.
बर्फीवाला उड्डाणपूल हा गोपाळ कृष्ण गोखले पुलासोबत जोडण्यासाठी सद्यस्थितीला स्वामी विवेकानंद मार्ग आणि जुहू येथून अंधेरी स्थानकाच्या दिशेने जाणारा मार्ग येथे दुरुस्ती किंवा अद्ययावतीकरणाच्या कामासाठी अतिरिक्त जागेची आवश्यकता आहे. गोखले पुलाच्या कामासोबतच जोडणीचे काम हाती घेतल्यास हे दोन्ही मार्ग बंद करावे लागतील. परिणामी स्वामी विवेकानंद मार्ग आणि बर्फीवाला मार्ग येथे वाहतुकीचा खोळंबा निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणूनच नियोजित केल्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील कामासोबतच दोन्ही पुलांच्या जोडणीचे काम हाती घेण्यात येईल. व्हीजेटीआय संस्थेच्या माध्यमातून सुचवण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीचे अनुकरण करत हे दोन्ही पूल जोडण्याचे काम लवकरच पालिका करणार आहे.

पालिकेने हे काम करताना रेल्वे पुलाखाली किमान ६ मीटर इतकी ओव्हरहेड उंची ठेवून हे पुनर्बांधणीचे काम करावे. त्यानुसारच रेल्वे भागातील पुलाचे (रेल्वे ओव्हरब्रीज) ओपन वेब गर्डरच्या आराखड्याचे काम पूर्ण करून पालिकेच्या वतीने रेल्वे प्रशासनाला सादर करण्यात आले. रेल्वे प्रशासनाने हा आराखडा दिनांक ३० मे २०२२ रोजी मंजूर केला. आराखड्यात रेल्वे भागातील पुलाच्या ८.४५ मीटरच्या उंचीच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. परिणामी रेल्वे हद्दीतील पुलाची उंची ही २.७३ मीटरने वाढली. सद्यस्थितीत रेल्वे भागातील पुलाची पातळी व बर्फीवाला जंक्शन येथे पुलाची पातळी यामध्ये दोन्ही पुलांच्या उंचीतील फरक हा २.८३ मीटर इतका आहे.

इंडियन रोड काँग्रेस : ८६ – २०१८ च्या अनुच्छेद ९.२ अन्वये शहरी भागात वाहनांसाठी उतार (व्हर्टिकल ग्रेडिएंट) हा ४ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आला आहे. इंडियन रोड काँग्रेस : ८६ – २०१८ च्या अनुच्छेद ९.२ अन्वये सुरक्षित ताशी २० किमी वेगाने वेग प्रतिबंधात्मक अंतर हे २० मीटर इतके असायला हवे. नवीन वाढीव उंचीच्या गोपाळ कृष्ण गोखले पुलाला सद्यस्थितीतील बर्फीवाला पुलाच्या उंचीला जोडण्यासाठी रस्ता तयार केला असता, तर व्हर्टिकल ग्रेडिएंट ७.२५ टक्के इतका म्हणजे प्रचलित नियमाच्या तुलनेत ३.२५ इतका अधिक उतार तयार झाला असता. तर उतारावरील स्टॉपिंग साईट डिस्टन्स म्हणजे वाहन थांबण्याच्या गतीचे अंतर ताशी २० किमी वेगाने फक्त ४.५५ मीटर इतके कमी झाले असते. या दोन्ही बाबी प्रचलित नियम आणि वाहन सुरक्षा या दोन्ही दृष्टीने अतिशय धोकादायक आहेत. परिणामी गोखले पुलावर रेल्वे भागातील खांब क्रमांक ५ आणि बर्फीवाला जंक्शन हे जोडणीसाठी शक्य नसल्याचे सल्लागारांनी स्पष्ट केले होते. तसेच नव्याने बांधण्यात आलेला गोपाळ कृष्ण गोखले पुलाचा उतार हा स्वामी विवेकानंद मार्गाच्या दिशेने असून, उत्तर दिशेचा बर्फीवाला पुलाचा उताराचा भाग गोखले पुलाच्या दिशेने आलेला आहे.

दोन्ही पुलाचे चढ-उतार हे एकमेकांच्या विरोधात आहेत, त्यामुळे दोन्ही पुलांचे उतार पाहता बर्फीवाला उड्डाणपूल हा गोखले पुलाला जोडणे शक्य नाही. अतिशय खोल उतार असल्याने याठिकाणी अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.

या खोल उताराचे तोटे म्हणजे वाहनाची स्थिरता – तीव्र उतारामुळे वाहनाच्या स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो. विशेषतः अवजड किंवा मालवाहू वाहनांवर याचा परिणाम होतानाच वाहनाचे नियंत्रण सुटू शकते. ब्रेकिंगची समस्या – तीव्र उतारामुळे परिणाम होतानाच इंजिन ओव्हरहिट होणे तसेच ब्रेक निकामी होणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. वाहनांच्या देखभालीवर परिणाम – तीव्र उतारामुळे सततची देखभाल दुरुस्ती गरजेची असते, परिणामी देखभाल दुरुस्ती खर्चात भर पडते. रस्ते वापरावर मर्यादा – तीव्र उतारामुळे अशा रस्त्याच्या वापरावर काही वाहनांना मर्यादा येतात. ज्या वाहनांची अश्वशक्ती कमी आहे किंवा वहन क्षमता कमी आहे, अशा वाहनांना खोल उतारावरून पुढे जाताना वाहतुकीसाठी मर्यादा येतात. इंधन बचतीवर परिणाम – जी वाहने उंच चढावर प्रवास करतात, अशा वाहनांना अधिकचे इंधन खर्ची होते. वाहतुकीवर परिणाम – तीव्र उतारामुळे वाहतुकीच्या वेगावर परिणाम होतो. परिणामी वाहतूक मंदावतानाच प्रवासाचा वेळ वाढतो. प्रवासाची गैरसोय-तीव्र उतारावरील प्रवासामुळे प्रवाशांना अस्वस्थ वाटू लागणे यासारखे विपरीत परिणाम होऊ शकतात. वाहन कार्यक्षमतेवर परिणाम-तीव्र उतारावर वाहन चालल्याने अधिकचा आवाज निर्माण होतानाच, कंपने वाढून तसेच गैरसोयीचा प्रवास होतो. दृश्यमानतेत घट-तीव्र उताराचा परिणाम म्हणून वाहनचालकांच्या दृश्यमानतेत घट होवू शकते.

वाहतुकीच्या दृष्टीने नागरिकांना दिलासा देतानाच त्यांच्या सुरक्षिततेचा देखील विचार करणे हा पालिकेचा अग्रक्रम आहे. व्हीजेटीआय संस्थेने सुचवलेल्या शिफारशी प्राप्त होताच त्यांचा अवलंब करून बर्फीवाला पूल आणि गोपाळ कृष्ण गोखले हे दोन्ही पूल जोडण्याच्या कामासाठी लवकरच सुरुवात करण्यात येईल, असे पालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे. पालिकेने असे स्पष्टीकरण किती केले असले, तरी मुंबई महापालिकेसारखी संस्था अशा तांत्रिक चुका करते तेव्हा मात्र सर्वांच्याच चर्चेचा विषय बनते. मुंबई महापालिकेचे नाव जगभरात प्रचलित आहे, त्यात या सर्व बाबतीत आर्थिक गैरव्यवहाराचे आरोपही पालिकेवर होतील, कंत्राटदाराला दिलेले पैसे, सल्लागारावर झालेला खर्च हा जनतेच्या पैशांची अशी नासाडी होते, तेव्हा मात्र याला कोणाला तरी जबाबदार धरावेच लागते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -