Saturday, July 6, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सडाळपस्वारी : देवाचा मानवीय संबंध

डाळपस्वारी : देवाचा मानवीय संबंध

अनुराधा परब

तोफा धडाडल्या, नगारे झडले, तुतारी फुंकली गेली. स्वारी आपल्या महालातून बाहेर पडल्याची वर्दी वाऱ्याच्या वेगाने पसरली. रयतेचा राजा / देव रयतेला भेटण्यासाठी येणार म्हणून सगळ्या गावामध्ये एकच उत्साह संचारला. गल्लीबोळ आकर्षक रांगोळ्या, रंगीत पताकांनी सजले. घरा-दारांवर फुलांची तोरणं झुलू लागली. हातात पूजेची तळी घेऊन रयत आपल्या देवाला प्रत्यक्ष भेटण्यासाठी आतूर झाली. आता पुढचे काही दिवस राजा आणि रयतेची, देव आणि भक्तांची थेट भेट घडून मानकऱ्यांकडे / देवस्थानी त्यांचा मुक्काम होणार. मुक्कामात देवाच्या प्रत्यक्ष सेवेची संधी, समस्या – प्रश्नांची उत्तरं त्या दिवसांत मिळणार असल्याचा विश्वास गावकऱ्यांमध्ये दिसत असतो. हे वर्णन कपोलकल्पित नसून वास्तव आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशिष्ट गावांमध्येच साजऱ्या होणाऱ्या डाळपस्वारी परंपरेतील शाही मिरवणूक म्हणजे कोण्या राजा महाराजाच्या रंजक गोष्टीतली घटना नसून वास्तवात ‘याचि देही याचि डोळा’ अनुभव घेण्याइतकी श्रीमंत गोष्ट आहे.
कोणे एके काळी राजेरजवाडे, संस्थानिक हत्तीवर बसून किंवा पालखीतून सगळ्या राज्यामध्ये फिरत असल्याची वर्णने अनेक गोष्टींमधून वाचलेली असतात. भारतातील संस्थाने विलीन झाल्यानंतर अशा प्रकारचे शाही सोहळे किंवा राजेशाही थाटाची राजाची मिरवणूक होणे दूर आणि अनुभवणे तर त्याहूनही अप्रूपाचेच राहिले. अपवादात्मक उदाहरणांपैकी कोल्हापूर दरबारच्या शाही सोहळ्यांचा उल्लेख होणे क्रमप्राप्त आहे.

दक्षिण कोकणामध्ये मात्र आजदेखील आपल्याला राजांच्या (जिथे ग्रामदेवताच संस्थानिक आहे) / देवतांच्या शाही मिरवणुका, स्वाऱ्या अनुभवायला मिळतात. त्याचे कारण तो प्रादेशिक लोकपरंपरेचा आणि विशिष्ट गावांच्या धर्म आणि संस्कृतीचा बोलका चेहरा आहे. साळशी, मुणगे (तालुका देवगड) तसेच आचरे, वायंगणी (तालुका मालवण) येथे दर वर्षी किंवा तीन वर्षांनी साजरी होणारी ‘डाळपस्वारी’ ही सिंधुदुर्गची अजून एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. गावऱ्हाटी ही फक्त जशी कोकणातच पाहायला मिळते, तशीच त्या गावऱ्हाटीअंतर्गत येणारी महत्त्वाची कामे, उत्सव हेदेखील तेवढेच वेगळ्या ढंगाचे असल्याचे इथेच अनुभवायला मिळते. विशेष म्हणजे गोव्याच्या पेडणे महालापासून ते अगदी चिपळूणपर्यंतच्या भागांमध्ये साजऱ्या होणाऱ्या उत्सवांचे स्वरूपसुद्धा एकसारखे नाही. इथे गावानुसार उत्सवाची वैशिष्ट्ये, स्वरूप, महत्त्व बदलताना आपल्याला दिसते. गेल्या वेळेस याच मालिकेतून शिवपंचायतनाविषयीची माहिती घेतली. गावऱ्हाटीमधील त्या पंचायतनाच्या स्वरूपावरूनदेखील उत्सवाची रूपरेषा ठरलेली पाहायला मिळते. साधारणपणे ज्या गावांमध्ये लिंग पंचायतन अर्थात शिवपंचायतन असते, शिवलिंग हेच ग्रामदैवत असते. तिथल्या वार्षिक उत्सवांमध्ये डाळपस्वारी, आषाढी एकादशी, घटस्थापना, दसरा, दहिकाला, होळी, देसरूड इत्यादी कार्यक्रमांचा समावेश असतो. प्रमुख देवता गावऱ्हाटीतील शक्तींवर आपले नियंत्रण ठेवून त्यानुसार त्याचा मेळ घालत असतात. यापैकी एक काम असते ते म्हणजे आपल्या अखत्यारीत येणाऱ्या गावाचे, लोकांचे संरक्षण करणे तसेच त्यांची समस्यांपासून सोडवणूक करून त्यांना अभय देणे किंवा भयमुक्त ठेवणे. गावपळणीसारख्या परंपरेमागील विविध पैलूंचा आढावा घेताना मुख्य ग्रामदैवत गावाला कोणत्या प्रकारे भयमुक्त करते, त्याची कथाच आपण इथे पाहिली. डाळपस्वारीच्या माध्यमातून हेच प्रमुख ग्रामदैवत तरंगाच्या रूपाने लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी संवाद साधते. लोकांमध्ये जाऊन आपण सदैव लोककल्याणाकरिता तत्पर आहोत, याचीच ग्वाही देते. एकविसाव्या शतकातील जनता दरबार या शासकीय योजनेची रुजवात धर्म आणि संस्कृतीची सांगड पूर्वीच घालून दिलेल्या अशा परंपरांमधूनच झालेली असावी.

सीमेवरील देवतांना ‘एक भाकरी, एक नारळ’ असा नैवेद्य अर्पण करणे किंवा देवाचा जसा कौल मिळेल त्याप्रमाणे दरवर्षी वा तीन वर्षांतून एकदा तरंगांसह (खांबकाठी) देवता गावातल्या वाड्या वस्तींवरील देवस्थानांमध्ये जाऊन आपापला “भाग” स्वीकारतात.

कोकणातल्या डाळपाचे हे दोन प्रकार आहेत. ‘डाळप’ याचा थोडक्यात अर्थ म्हणजे आपल्या सीमेअंतर्गत येणाऱ्या देवस्थानांतून नेमून दिलेला आपला “लागभाग गोळा करणे” होय. हे डाळप करण्यासाठी कोकणातील देव चांदीचे आशीर्वादाचे हात असलेले तरंग, झळाळत्या काठपदरी वस्त्रांकित अन्य देवतांच्या मुखवट्यांच्या तरंगकाठींसह मोठ्या थाटामाटात निघतात. अब्दागिरी, छत्र, चामर, निशाण, वाजंत्री आणि मानकऱ्यांच्या सहभागाने निघणाऱ्या या राजेशाही मिरवणुकीचे गावातील वाटेवाटेवर जंगी स्वागत होते. मुख्य मंदिरातून बाहेर पडताना देव आपल्या मानकऱ्यांना मायेने साद घालतो. आपली ही पिढ्यान् पिढ्या चालत आलेली वहिवाट पुढे नेणाऱ्यांना तो “वाडवडील जसे वागले तसे असलेले चार तुम्ही वागा”, असा इशारा देतो. हाच इशारा गावऱ्हाटीतील समतोल राखायला साह्यकारी होतो.

डाळपस्वारी होणाऱ्या गावातील परगावी गेलेल्या व्यक्ती आपल्या बंद घराची कवाडे यानिमित्ताने उघडण्यासाठी कसंही करून गावी येतात. देव स्वतःहून चालत आपल्या घरी येणे, या गोष्टीला श्रद्धासंस्कृतीमध्ये अतिव महत्त्व आहे. असं काय आहे, या डाळपस्वारीमध्ये जे दूर असलेल्यांना आणि स्थानिकांनाही भूल घालतं? असा प्रश्न नक्कीच पडतो. महाराष्ट्रातील अनेक गावांतून ग्रामदेवतांचे सोहळे, उत्सव होतच असतात. डाळपस्वारीचं वेगळेपण त्यात काय, हा कुतूहलाचा – जिज्ञासेचा भाग आहे.

गोवा – कोकणात नांदणारी “तरंग संस्कृती” हा त्याचा गाभा आहे. प्रत्येक गावांमध्ये ग्रामदैवतांचे पाषाण किंवा मूर्ती ही मंदिरांमध्ये प्रतिष्ठित झालेली असते. कोकणात मात्र या ग्रामदैवतांचे आणि त्याच्या अन्य देवीदेवतांचे तरंग हे देवतास्वरूप होऊन वार्षिक उत्सव, सोहळ्यांमध्ये चैतन्य आणतात. गावऱ्हाटीतील मानकरी इतर वेळी सामान्य माणसेच असली तरीही तरंग धारण करताच संचारी अवसरांच्या आवेगात त्या क्षणी माणसांची जागा देवत्वाचा अंश घेते. असे चल-तरंग धारणकर्त्या व्यक्तींची देहबोली, आविर्भाव सारे काही बदलून टाकत समोरच्याला दिङ्मुढ करतात. मानवी रूपातला तरीही माणसाहून निराळा देव आपणहून लोकांच्या भेटीसाठी घरोघर येतो, हा डाळपस्वारीचा विशेष ही सिंधुदुर्गाची खास ओळख आहे. देव आणि माणूस यांतील मानवीय संबंधांची भूल डाळपस्वारीला वेगळे परिमाण मिळवून देते. डाळपस्वारी परंपरेमध्ये धर्म, संस्कृती तसेच राजकारण आणि समाजकारणाचीही सरमिसळ झालेली दिसते. राजमंदिरी बसून रयतेचे प्रश्न समजून घेणे कठीण असते, हे लक्षात आल्यामुळेच इतिहासातील कित्येक राजांनी वेषांतर करून नगरभ्रमण केल्याच्या घटना वाचलेल्या आहेत; किंबहुना राज्यशकट उत्तम हाकायचा असेल, तर राजाला आपल्या प्रजेचे हित कशात आहे, हे प्रजेमध्येच जाऊन समजून घेतले पाहिजे. याचेच प्रतिबिंब ग्रामसंस्कृतीमध्ये, देवता उत्सवांमध्ये पडलेले दिसते. वर्षातून एकदा किंवा तीन वर्षांनी मंदिराबाहेर पडून समाजात वावरणारा, सुख-दुःखं जाणून घेऊन त्यांचे निराकरण करणाराच देव लोकमानसावर गारूड करतो, हेच डाळपस्वारीतूनही अधोरेखित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -