डॉ. विजया वाड
माझे विद्यार्थी, माझे वाचक आणि माझा मित्र परिवार यांनी माझे आयुष्य इतके आनंदी केले आहे की, मला कधी एकटेपणा वाटलाच नाही… की मुलींची लग्ने झाली नि एकटे उदास जीवन फक्त दोघांचे झाले.
मनोहर तोडणकर हे कवी मित्र माझ्याकडे पंधरा दिवसांनी एकदा हटकून येत. फार सुंदर कविता करीत. आम्ही तेव्हा मुलुंडला राहात असू, रणजित सोसायटीत. तोडणकर नव्या नव्या कवितांचा खाऊ आणीत असत. मुली आनंदाने आमच्यात बसत नि मग मैफल जमे. आनंदाची वारी!
पण एकदा फार अस्वस्थ वाटले अन् टपटप अश्रू त्यांच्या डोळ्यांतून गालावर धावले. “काय झालं तोडणकर? सांगता का? मी मायेनं विचारलं.”
“काका सांगा ना!” मुली म्हणाल्या.
“नोकरी गेली, कंपनी बंद पडली.” ते गदगदत म्हणाले.
धडाधडा कंपन्या बंद पडतात नि लोकांची आयुष्ये उद्ध्वस्त होतात. माझा दादा तेव्हा ठाणा जेल येथे जेलर होता. मी त्याला फोन लावला. “दादा काही करता येईल का रे? घरात मुले लेकरे आहेत. कवितेवर पोट भरण्याइतका पैसा नाही रे मिळत. त्यासाठी कामच हवे.” त्यावेळी जेलमध्ये दत्ता सामंत होते. त्यांची वट जेलमधूनही उभ्या महाराष्ट्रावर होती. एक फोन त्यांनी भांडुपच्या कंपनीत केला नि तोडणकर परत पोटाला लागले. मुलुंडहून भांडुपला जायला दादाची सायकल दादाने त्यांना दिली.
तोडणकर फार आनंदले नि ते पाहून रणजितमधले माझे घर! त्यालाही आनंदाचे तोरण लागले. एक पुस्तक मी नि ठाण्याच्या लीला जोशी यांनी बरोबर लिहिले. त्या पुस्तकाचे नाव होते ‘उंच माणसांचे बेट’. त्यात २५० अपंग पण अभंग अशा स्वाभिमानी माणसांच्या गोष्टी होत्या आणि त्यातून अंध, कर्णबधिर, अपंग माणसांना धीर येईल ही अपेक्षा होती. माधवराव गडकरी त्यावेळी लोकसत्तेचे संपादक होते. त्यांना हे पुस्तक इतके आवडले की त्यांनी त्यावर लोकसत्तेत अग्रलेख लिहिला. ते पुस्तक तीन-साडेतीन महिन्यांत (वर्ष १९८५) खपले नि अनेक अप्रकाशित स्वाभिमानी आयुष्यांवर प्रकाशझोत पडला. मी कमला मेहता अंधशाळेत या पुस्तकाचे वाचन केले, तेव्हा एक मुलगी म्हणाली, “मला काही बोलायचं आहे.” “बोलू?”
“बोल! का! व्यक्त हो गं.”
“मी मे महिन्यात मामीकडे गेले होते कोकणात. बरं वाटतं! मामे-मावस भावंडं भेटली की! गप्पा टप्पा! जरा मज्जा. पण त्यात एक घटना मला रडवून गेली. मी रडले. पण आतल्या आत.”
“काय झालं बाळ? भावंडांनी दुजाभाव केला का?”
“नाही. भावंडं फार चांगली आहेत. मामीने केला. सर्वांना चहा केला नि मलाही! पण त्यांच्या चहात नक्कीच दूध होते. कारण कोणीही तक्रार केली नाही की चहा बिनदुधाचा आहे म्हणून. पण बाई, माझा चहा मात्र कोरा होता. बिनदुधाचा, तिला वाटलं, हिला काय कळणार? ही तर आंधळी. पण मामीला ते ठाऊक नव्हतं की आंधळ्या माणसाची जीभ आंधळी नसते.”
तिचे हे बोल आपण प्रत्येकाने लक्षात ठेवण्याजोगे आहेत. नि दुजाभाव मनाच्या सांदी कोपऱ्यातूनही झटकून टाकला पाहिजे. दूध समजा कमी असेल, तर स्वत: घे ना बाई कोरा चहा! अगं, अतिथि देवो भव! ही आपली संस्कृती आहे! मी त्या मुलीस म्हटलं,
“तू व्यक्त का झाली नाहीस? सांगायचं मामीला.”
“त्यातून राग ओढवून घेतला असता मी मामीचा. बाई, माझी मे महिन्याची सुट्टी खराब झाली असती. भावंडांबरोबर किती किती आनंद असतो. माझे घर बंद होऊन मला चालणार नव्हते. मग म्हटलं… जाने दो…! बाई, जाने दे अॅटिट्यूड धारण केली ना की आयुष्य सुखी, आनंदी नि मनमुक्त होते.”
आयुष्यातील सुखाचा कानमंत्र एका अंध मुलीकडून मला वयाच्या चाळिशीत मिळाला होता. हिथ्रो एअरपोर्टवर सात तासांचा हॉल्ट होता. मी माझ्या लेकीकडे शंभर दिवसांसाठी अमेरिकेतील याकिमा या गावी गेले होते. तिचे पिल्लू लहान होते आणि तिला एम डी (निद्राविकार)ची परीक्षा द्यावयाची होती म्हणून. हिथ्रो हा मधला हॉल्ट होता. तारीख १३ जून होती. एअरपोर्टवर रेणूबेनचा फोन आला. मी तेव्हा पोद्दारची प्राचार्य होते. रिझल्ट ९९ टक्के. एकच मुलगी गणितात सात गुणांनी गचकली. “चला इतर सारी पास, याचा आनंद करू.” मी म्हटले. बाकावर बसले. स्टॉलवरून केक पीस घेतला. रिझल्ट बाकावर बसलेल्या ब्रिटिश बाईसोबत केक देऊन सेलिब्रेट केला. वर्ष होते २००२!
“तू प्रिन्सिपॉल आहेस का?” तिने विचारले.
“हो. आपण?”
“मी? मी एक फसवलेली बाई आहे. मुलीच्या बाळंतपणाला आले होते. लंडनला. मी मूळची लंडनची पण माझा नवरा इंडियात गेला. ब्रिटिश एम्बसीत. मग मलाही जावे लागले.”
“ओ! आमचा देश छान आहे.”
“पण माझा नवरा छान नाही ना!”
“का? काय झालं?”
“त्याने मला फोन करून सांगितले की मी परतू नये. त्याने दुसरीबरोबर घरोबा केलाय नि ती स्त्री आमची इंडियन मेड आहे.”
“सांगितलंय ना त्याने? उडत गेला! मर म्हणावं. तू तुझी जग.” मी रागे रागे त्याचा निषेध केला.
“तरी मी जात्येय. तिला झिंज्या उपटून बाहेर काढणार, जाते जाते पुलीस भी ले जाऊंगी! अरे! माझा नवरा पळवते म्हणजे काय? वो मेरी प्रॉपर्टी हैं!”
“अगं पण ज्याचे आपल्यावर प्रेम उरले नाही…”
“तरी त्याला सतावणारच मी. ठिय्या देणार, लग्नाची बाईल मी आहे.” मी थक्क.
छत्रपती शिवाजी हवाई अड्डा! हे घ्यायला आलेले.
मी प्रथमच अत्यंत प्रेमाने विचारले. “माझेच आहात
ना?” हे बघतच राहिले. आज ५३ वर्षे आम्ही
सोबत आहोत…!