Tuesday, July 23, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सपथ्यापथ्य नेमके कशासाठी?

पथ्यापथ्य नेमके कशासाठी?

डॉ. लीना राजवाडे

– भाग २

जनपदोध्वंसनाच्या (साथीच्या) विकारांमध्ये सृष्टीतील उदक-देश-काल-वायू या सामान्य भावांची दृष्टी झालेली असते. अशा वेळी या उदकादी सामान्य भावांचा संपर्क मनुष्यांवर सारखाच होतो; परंतु पथ्याने राहणाऱ्यास त्यामुळे आजार त्रासदायक होत नाहीत. झालाच तर तो सौम्य प्रमाणात होतो आणि चिकित्सेने आरोग्यलाभही लवकर होतो. तसेच सर्वच अपथ्यकर आहार-विहार, तुल्यदोषकर होत नाहीत. सर्व दोष तुल्यबल होत नाहीत आणि प्रत्येक शरीराची व्याधी प्रतिबंधक शक्तीसारखी असत नाही, वेगवेगळी असते. म्हणून प्रत्येक शरीरही पथ्य-अपथ्यासाठी बारकाईने विचारात घ्यावे लागते.

सामान्यत: पथ्य हे धातूंचे साम्य व शुद्धी राखते आणि औषधाच्या कार्याला मदत करते, तर औषध हे दुष्ट दोषांची शरीरातील आक्रमकता (जोराचा आघात) दूर करण्यास उपयोगी पडते व तो आघात दूर झाल्यावर रोगाचा पुनर्भव होऊ नये म्हणून पथ्य अधिक उपयोगी पडते. बारकाईने पाहिले, तर असे आढळून येईल की, सर्वांना सर्व ठिकाणी व संपूर्णतः पथ्यकारक वा अपथ्यकारक असा पदार्थ नाही. तरी प्रत्येक आहार अगर विहार आपल्या स्वाभाविक गुणांमुळे व इतर पदार्थांच्या संयोगामुळे एकांत हितकर म्हणजे पथ्यकर अगर अहितकर म्हणजे अपथ्यकर होतो.

बलानुसार पथ्यापथ्य : रोग्याचे व रोगाचे जसे दोन्ही प्रकारांनी बल विचारात घेऊन पथ्यापथ्य ठरवावे लागते. रोग्याचे सहज, युक्तिज व कालज असे तीन प्रकारचे बल असून त्याच्या काम करण्याच्या शक्तीवरून ते ठरवावे लागते. याची माहिती आपण मागील काही लेखांत घेतली आहे. बल चांगले असणाऱ्या माणसाला शारीरिक कष्ट, तीव्र उपचार – औषध देणे पथ्यकारक आहे, तर दुर्बल माणसास थोडेही श्रम व तीव्र औषधोपचार अपथ्यकर आहेत. धातुक्षीणतेमुळे तसेच दोष संचयामुळे येणाऱ्या अबलत्वावर त्या त्या कारणानुसार पथ्यापथ्य ठरवावे लागते. आजाराची लक्षणे खूप कमी झाल्यानंतर धातुक्षीणतेमुळे आलेल्या अबलत्वावर तो धातुवृद्धीकर आहार व विहार पथ्यकारक वाटतो. जसे विश्रांती, बृहणकारक पदार्थ व रसायने पथ्यकारक होतात, तर याच्या  विपरीत अपथ्यकारक होतात.

अग्नीनुसार पथ्यापथ्य : अग्नीनुसार पथ्यापथ्य ठरविताना दोषानुसार म्हणजे विषमाग्नीला वात दोषाचे, तीक्ष्णाग्नीला पित्तदोषाचे, मंदाग्नीला कफदोषाचे पथ्यापथ्य असते. अग्नी अबल असेल, तर आहारात रुचकर, अम्लोष्ण, दीपन-पाचनात्मक हिंग, हुलगे, लसूण, कढणे, गरम पाणी असे पदार्थ पथ्यकर होतात. तीक्ष्णाग्नी असेल, तर (जसे भस्मक विकारात) गुरू-शीत-मधुर-स्निग्ध व अति मात्रेत असे पदार्थ तसेच दिवास्वाप, विश्रांती हे विहार पथ्यकर आहेत. याउलट असणारे आहार-विहार तीक्ष्णाग्नीला अपथ्यकर होतात.

वयानुसार पथ्यापथ्य : अगदी तान्ह्या मुलास त्याच्या आईचे दूध पथ्य तम आहे. त्याच्याअभावी गाईचे वा शेळीचे दूध आईच्या दुधाच्या समान गुणाचे केलेले पथ्यकर होते. घृत, मध हेही पथ्यकर आहेत. मूल दोन वर्षांचे होईपर्यंत गुरू-शीत-स्निग्ध पदार्थ पचणे कठीण असल्यामुळे तसेच लंघन, पंचकर्मे इ. कर्मे बालकास अपथ्यकर होतात. तरुण वयात रसायन घेणे, सर्व रसाभ्यास असणे, नेहमी कार्यमग्न असणे हे पथ्यकर असून याउलट अति साहस, अजीर्ण भोजन, अति भोजन, अध्यशन, संताप इ. अपथ्यकर आहे. वृद्धांना नियमित आणि अल्प आहार-विहार, विश्रांती, दिवसा अल्प निद्रा, लघू स्निग्धोष्ण पदार्थ, रसायने, चिंता न करणे, मन शांत ठेवणे ही सर्व पथ्यकर होत. याउलट लंघन, शोधन, अतिश्रम, गुरू-शीत-रूक्ष-उष्ण पदार्थ, जागरण, व्यायाम इ. अपथ्यकर होत.

सवयीनुसार पथ्यापथ्य :  मनुष्याच्या नेहमीच्या सेवनातील आहारातील पदार्थ व वागणूक ही त्या त्या मनुष्याला बहुधा मानवतात. प्रकृतीच्या विपरीत गुणांची मानवतात. पण समगुणी द्रव्ये बहुधा मानवत नाहीत. जी मानवतात ती पथ्यकर समजावीत व जी मानवत नाहीत ती अपथ्यकर समजावीत.

ज्या माणसाला जो पदार्थ नेहमी सवयीचा असतो, त्याला त्याच्या बदली त्याच गुणाचा दुसरा पदार्थ दिला, तरी तो सवयीचा नसल्यामुळे त्या द्रव्याचा अग्नी तयार नसतो म्हणून अपथ्यकर असतो. उदा., मांस गुरू-स्निग्ध गुणाचे आहे. तसेच गहूसुद्धा गुरू-स्निग्ध गुणाचे आहेत. म्हणून गहू खाण्याची सवय असणारा माणूस एकदम मांस खाऊ लागल्यास मांस पचविणारा अग्नी बलवान नसल्यामुळे ते पचत नाही व अपथ्यकर होते. मारवाडी लोकांना तुपाची, गुजराती लोकांना गव्हाची, कोकणी लोकांना भाताची, कानडी लोकांना तिखटाची, शेतकऱ्यांना कष्टाची, गवई लोकांना जागरणाची सवय असते व तेच त्यांना पथ्यकर असू शकते. याच्या विपरीत आहार-विहार अपथ्यकर असते. कित्येक सवयी केवळ मानसिकच असतात. त्यांचे स्वरूप लक्षात घ्यावे लागते. ·रोगाच्या सवयीनुसार आहार-विहार ठरविणे म्हणजे केवळ रोग्याला पसंत पडेल, तेच ठरवावयाचे असे नव्हे, तर जेणेकरून शरीराचे आरोग्य बिघडणार नाही, असा विचार करून व योग्य संस्कार करून ठरवावे म्हणजे तो पथ्यकारक होतो.

आजची गुरुकिल्ली

“पथ्य पाळणाऱ्या मनुष्याला औषधाची गरज काय? पथ्य न पाळता औषध घेतले, तर त्या औषधाचा तरी काय उपयोग?”

पथ्ये सति गदार्तस्य किमौषधिनिषेवणैः।
पथ्येऽसति गदार्तस्य किमौषधिनिषेवणैः॥

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -