फिरता फिरता – मेघना साने
न्यूयॉर्क राज्यात हडसन नदीच्या परिसरात पगकिप्सी नावाचे एक हिरवेगार गाव आहे. तेथे इंडियन कल्चरल संेटर आणि हिंदू, जैन टेम्पल ही वास्तू दिमाखात उभी आहे. वास्तूच्या अंगणात रंगीत रंगीत फुले बहरली आहेत. पायऱ्या चढून या पवित्र वास्तूत आल्यावर देवादिकांचे दर्शन होते. पण नुसत्या मूर्त्यांचे दर्शन घेण्यासाठी नागरिक तिथे जात नाहीत, तर भारतीय शास्त्रीय संगीताचे वर्गही तेथे चालतात. अनेक भाषांमधून कार्यक्रम करण्यासाठी, तेथे एक सुंदर हॉल बांधला आहे. कार्यक्रमासाठी रसिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. भारतीय संस्कृतीचे दर्शन या वास्तूत होत असते.
२०१७ साली इंडियन कल्चरल सेंटरला भेट देण्याचा योग आला. त्यापूर्वी हडसन नदीच्या विशाल पात्रावर बांधलेल्या पुलावरून आम्ही सगळी मित्रमंडळी फिरून आलो. याच गावात महाराष्ट्रातून अमेरिकेत जाऊन, वैद्यकीय शिक्षण घेतलेली पहिली डॉ. आनंदीबाई जोशी यांचीही समाधी आहे. ती पाहून आम्ही हिंदू जैन टेम्पल पाहायला गेलो. आमची एक मैत्रीण डॉ. अंजली नांदेडकर या इंडियन कल्चरल सेंटरमध्ये संगीत शिक्षिका म्हणून काम करते. कोणतेही शुल्क न आकारता, गेली वीस वर्षे तिने तेथील विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रीय संगीत शिकवले आहे. त्यांना गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांनाही बसवत आहे.
अंजली दाढे नांदेडकर ही मूळची पुण्याची. १९६६ पासून पं. विष्णू पलुस्कर विद्यालयातून शास्त्रीय संगीताचे धडे घेत होती. पुढे ती इंजिनीअरिंग कॉलेजमधील हुशार विद्यार्थिनी म्हणून माहीत झाली. लग्नानंतर अमेरिकेला गेली. युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियामधून एम. एस. आणि नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीमधून पीएच. डी. डिग्री मिळवली. संगीताची आस होतीच. आपले स्वतःचे संगीत शिक्षण तिने ऑनलाइन सुरू ठेवले. डॉ. सुधा पटवर्धन या संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती तिला गुरू म्हणून लाभल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अंजलीने संगीतात अलंकार पदवी मिळवली. आता ती न्यूयॉर्कमधील पगकिप्सी येथे शास्त्रीय संगीताचे धडे देऊन, विद्यार्थी घडवीत आहे आणि तिचा संगीताचार्य पदवीचा (पीएच. डी.) अभ्यास सुरू आहे.
इंडियन कल्चरल सेंटर हे हिंदू व जैन टेम्पल यांना जोडून आहे. अतिशय सुबक अशा देवदेवतांच्या मूर्ती येथे आहेत. राम, लक्ष्मण, सीता, शंकर, पार्वती, गणेश, सरस्वती, राधा कृष्ण, एवढेच नाही तर महावीरांची मूर्तीही तेथे आहे. मंदिराच्या भल्यामोठ्या मोकळ्या, स्वच्छ सुंदर दालनात ही सारी छोटी छोटी मंदिरे आहेत. आतील मोठ्या हॉलमध्ये अनेक वाद्ये आहेत. हार्मोनियम, तंबोरे, तबले इत्यादी. “इथेच आमचे संगीताचे वर्ग चालतात.” अंजली म्हणाली. “येथे भारतीय शास्त्रीय संगीत, व्होकल, तबला हे शिकण्यासाठी विद्यार्थी येतात. शास्त्रीय व्होकल संगीत शिकवताना तंबोरा व तबल्याच्या साथीसाठी आय तबला प्रो (i Tabla Pro) या ॲपचा वापर केला जातो. विशारदच्या परीक्षेसाठी सात लेव्हल्स आणि अलंकारच्या परीक्षेसाठी नऊ लेव्हल्स लागतात. या कल्चरल सेंटरमध्ये नऊ लेव्हल्सपर्यंतचे म्हणजे अलंकारपर्यंतचे शिक्षण मिळू शकते. सर्व वर्गांना अंजली नांदेडकर मॅडम एकट्याच शिकवतात आणि तबल्याचे वर्ग दुसरे गुरुजी घेतात अशी माहिती मिळाली. इथे कथ्थक, भरतनाट्यम्, वीणा, बासरी आणि कर्नाटक शास्त्रीय संगीताचे वर्गही चालू आहेत.
अमेरिकन हिंदू मुलांच्या शिक्षणातील अडचणी अशा की, त्यांना देवनागरी लिपी येत नाही आणि संगीताचे अलंकार किंवा बंदिशी या देवनागरीत असतात. त्यामुळे अंजली थियरीचे आणि प्रॅक्टिकलचे सर्व टायपिंग इंग्रजीत करते. अभ्यासक्रम शिकवण्यासाठी तिने हजार एक पाने टाइप केली आहेत. अलंकार आणि पलटेसुद्धा इंग्रजी स्पेलिंग करून लिहावे लागतात. उदा. सा रे ग हे Sa Re Ga असे लिहून द्यावे लागते. बंदिशींचा अर्थ इंग्लिश ट्रान्सलेशन करून, समजावून द्यावा लागतो. बंदिशी लिहिण्यासाठी पलुसकर आणि भातखंडे लिपी वापरली जाते. अंजलीने या लिपी लिहिण्यासाठी दोन fonts तयार केल्या. Paluskar.ttf आणि bhatkhande.ttf. अभ्यासक्रमातील सर्व पाठ पीडीएफ (PDF) आणि एमपी ३ (MP3) द्वारा वेबसाइटवर उपलब्ध आहेत. (www.swaranjalimusicschool.com). सर्व वर्ग झूम वर चालतात. त्यामुळे अंजलीच्या विद्यालयात लांबून शिकणारे विद्यार्थी पण आहेत. या इंडियन कल्चरल सेंटरमध्ये शिकणाऱ्या मुलांना गायनाचे सादरीकरण करता यावे, यासाठी सुंदर सभागृह आहे. व्यासपीठही असते व श्रोत्यांना बसण्याची सोय होती. येथे भारतीय भाषेतील कार्यक्रमांना प्राधान्य दिले जाते, असे कळल्यावर आम्हीही एक कार्यक्रम बसवून आणायचे ठरविले.
शास्त्रीय संगीताच्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा मुले अमेरिकेतून देऊ शकतात. याचा अभ्यासक्रम अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाने पाठवलेला असतो. परीक्षा केंद्र मात्र जेथे असेल, तिथे जाऊन परीक्षा द्यावी लागत असते. अमेरिकेत अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा देण्यासाठी पंधरा केंद्रे आहेत. पगकिप्सीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायला कॅनडा किंवा व्हर्जीनिया सेंटरला जावे लागत असे. परीक्षा केंद्रावर संगीत सादरीकरणाची सोय केलेली असते. स्टेज, हॉल तयार असतो.
गावातून संगीतप्रेमींना आमंत्रण देतात व ते ऐकायला येतात. मस्त मैफल सजते. कोविड साथीपासून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाने ऑनलाइन परीक्षा सुरू केल्या आहेत. त्यामुळे जगभरातील विद्यार्थ्यांची खूपच सोय झाली आहे. २०२३ मध्ये अंजली नांदेडकरने आम्हाला कार्यक्रम सादर करण्यासाठी आमंत्रित केले. त्यामुळे पुन्हा इंडियन कल्चरल सेंटरमध्ये जाण्याचा योग आला. तेथील सुंदर हॉलमधे आमचा हिंदी गाण्यांचा इंग्रज निवेदनासहित कार्यक्रम आम्ही पूर्ण तयारीनिशी सादर केला. अंजलीनेही सुरेल गाऊन रसिकांची वाहवा मिळवली. बऱ्याच श्रोत्यांनी त्यांची मुले भारतीय शास्त्रीय संगीत शिक्षण घेत असल्याचे सांगितले.