Saturday, July 13, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सपाण्याच्या शुद्धतेसह विशुद्ध नाट्याची गॅरेंटी : शुद्धता गॅरेंटेड

पाण्याच्या शुद्धतेसह विशुद्ध नाट्याची गॅरेंटी : शुद्धता गॅरेंटेड

भालचंद्र कुबल – पाचवा वेद

गंगा नदीला तमाम भारतीयांच्या हृदयात अपार श्रद्धेचे स्थान आहे; परंतु या श्रद्धेनेच या गंगेची अवस्था विद्रुप करून टाकली. १२ ऑगस्ट २०११ साली ‘राष्ट्रीय गंगा स्वच्छ’ मिशनची स्थापना करण्यात आली. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांना समृद्ध करणाऱ्या गंगेने २०व्या शतकात अपवित्रतेची पार सीमा रेषा ओलांडली. २०२० साली पाचव्या शिखर संम्मेलनात ‘गंगा नदी स्वच्छता’अभियानांतर्गत जागतिक बँकेद्वारे २५,००० करोड रुपयांचे सहाय्यता कर्ज या अभियानास मंजूर झाले आणि एकंदर ३१३ परियोजना गंगेला प्रदूषणमुक्त करण्याच्या कार्यावर आजही कार्यरत आहेत. भारतीय इंजिनीअरांसाठी हा एक मोठा टास्क आहे. एक स्वतंत्र मंत्रालय यासाठी काम करते आहे. २०१४ साली स्थापित झालेल्या नव्या सरकारने हाती घेतलेल्या कामात या अभियानाचा फार मोठा वाटा आहे; परंतु याबाबत आजही आपण सारे अनभिज्ञ आहोत.

हे सांगण्यामागचे कारण असे की, अभियानात एका तरुण मराठी आय. ई. एस. इंजिनीयरचे योगदान अधोरेखित करण्याजोगे आहे. ते काम “शुद्धता गॅरेंटेड” या एकपात्री नाट्यप्रयोगातून मराठी रंगभूमीवर सद्या पाहावयास मिळत आहे. महेश भोसले नामक इंजिनीयरने गंगेला प्रदूषणमुक्त करण्याचा ध्यास उरी बाळगून केलेले अथक प्रयत्न प्रमोद शेलार हा अभिनेता आपल्यापर्यंत जेव्हा पोहोचवतो, तेव्हा त्यास मनापासून स्टँडिंग ओव्हेशन द्यावे लागते.

साधारण २०१७च्या सुमारास ‘कल्पना एक, आविष्कार अनेक’ ह्या एकांकिका स्पर्धेत ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी सुचवलेल्या ‘कृपा’ या विषयाअंतर्गत एक एकांकिका सादर झाली होती, त्याच एकांकिकेचा हा दीर्घांक. विशेष म्हणजे प्रमोद शेलार यांनी एकांकिकेचा दीर्घांक करताना विषयाला पसरट न करता, आशयाची खोली वाढवली आहे. महेश भोसले नामक अधिकारी नदी स्वच्छता अभियानामार्फत गंगा नदीच्या प्रदूषणासंदर्भात सुरू असलेल्या प्रोजेक्टवर नेमला जातो. गेली कित्येक वर्षे आपल्या आसपास पाण्याविषयी सुरू असलेल्या जनजागृतीचा त्याच्यावर खूप मोठा परिणाम झालेला असतो. गंगा, यमुना व तसेच इतर नद्यांच्या प्रवाहातील विविध शहरांत जाऊन सर्वेक्षण करण्याचा आणि पर्यायाने प्रदूषण पातळी कमी करण्याचा त्याचा मानस असतो. त्याप्रमाणे तो हरिद्वारपासून ते पुढे कानपूर, अलाहाबाद व अलीकडे यमुना नदीसाठी दिल्लीजवळच्या भागात सर्वेक्षण करतो.

या सगळ्या मानवनिर्मित अव्यवस्थेमुळे निसर्गाची होत असलेली हानी आणि त्याच कारणांमुळे होत असलेले नद्यांचे प्रदूषण त्याच्या निदर्शनास येते. २५ पेक्षा जास्त शहरांतून वाहणारी व शेवटी कोलकाता करून बंगालच्या उपसागराला मिळणारी गंगा नदी हरिद्वार ते कोलकाता या प्रवासात अत्यंत वाईट पद्धतीने प्रदूषित होत आहे. हे त्याच्या निदर्शनास येते. या सगळ्याला सामाजिक, राजकीय घडामोडी, तसेच गावखेड्यातील व शहरातील लोकांच्या मानसिकतेची जोड असते. या सगळ्यांत महेश भोसले पार गुंतत जातो. त्याने आखलेल्या प्रोजेक्टचे पुढे काय होते? तो त्याचे आराखडे पूर्ण करू शकतो का? हे प्रत्यक्ष नाटकात बघणे फार वेगळा अनुभव आणि वास्तविकतेची जाणीव करून देते.

मी माझ्या नाट्यनिरीक्षणातून वारंवार नाटकांच्या बदललेल्या पोस्ट कोविड फाॅरमॅटचा उल्लेख करत असतो. मर्यादित तंत्र सहाय्य किंवा एकंदरीतच मर्यादित सादरीकरण हा फाॅरमॅट पोस्ट कोविड निर्मितीमध्ये प्रकर्षाने जाणवू लागला. याचाच एक महत्त्वाचा परिणाम म्हणून वाढीस लागलेली एकपात्री नाट्यनिर्मिती. एकपात्री नाट्यप्रयोगांची निर्मिती आज मराठी रंगभूमीचे बलस्थान बनू पाहत आहे. पूर्वी ते तुरळक होते, परंतु संख्यात्मक आणि गुणात्मक दर्जा आज वधारलेला आहे. पुलंची ‘बटाट्याची चाळ’, ‘बिगरी ते मॅट्रिक’, सदानंद जोशींचे ‘मी अत्रे बोलतोय’, रंगनाथ कुलकर्णी यांचे ‘एका गाढवाची कहाणी’, लक्ष्मणराव देशपांडे यांचे ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ आणि १९८९ सालापासून गाजंत असलेले ‘व्हय मी सावित्रीबाई’ ही काही त्यातली महत्त्वाची एकल नाटके.

कोविड काळात ऑनलाइन परफाॅरमन्सची लाट आली आणि त्यात नटांच्या सुप्तगुणांना वाव देणारे एकल नाट्य फोफाट्याने फोफावले. पण जेव्हा नाट्यगृहांकडे प्रेक्षक पूर्ववत वळला, तेव्हा हेच प्रयोग नाट्यगृहातही होऊ लागले. अखिल महाराष्ट्रात सादर होणाऱ्या एकल नाटकांची संख्या जवळपास ६०-७० असावी. मुंबईतच गेल्या सहा महिन्यांमध्ये मी सहा एकल नाट्यप्रयोग पाहिले आहेत, त्यातील तीन तर गेल्या तीस दिवसांतील आहेत. पैकी अमृता मोडक यांचे छोटी डायरी, अभिजित झुंजारराव दिग्दर्शित मन आणि प्रमोद शेलारांचे ‘शुद्धता गॅरेंटेड.’ मुळात पूर्वीच्या प्रयोगांमध्ये असलेले स्टँडअप काॅमेडी किंवा परफाॅरमन्सचे सूत्र या बदललेल्या फाॅरमॅटमध्ये दिसून येते. या एकपात्री प्रयोगांना ठोस असे कथाबीज आहे. त्या सादर होणाऱ्या कथेतील एका व्यक्तीच्या वावरण्यास प्रासंगिक कारणे आहेत. त्यामुळे त्यास प्रकाशयोजना, नेपथ्य व संगीत आदी तांत्रिक बाजूंची सकारण जोड आहे. माईक तोंडासमोर ठेवून केवळ वाचिक आणि सात्विक अभिनयाचा हा प्रयोग नाही. त्यामुळे जरी एकपात्री असले, तरी ते पूर्ण नाट्यानुभव देते.

प्रमोद शेलारांच्या शुद्धता गॅरेंटेड बाबतही हेच म्हणावे लागेल. सहा टेबल्स आणि दोन खुर्च्या प्रसंगानुरूप नेपथ्यात बदल घडवून आणतात आणि ते बदल प्रमोद शेलार प्रेक्षकांशी संवाद साधता साधता घडवतात. मुळात ज्यावेळी तुम्ही महेश भोसलेचे आत्मकथन ऐकायला सुरुवात करता, तेव्हा विषयातील गांभीर्यामुळे बाकी तांत्रिकतेकडे तुमचे लक्ष खरेतर जात नाही, परंतु त्यातील गांभीर्य अधोरेखित व्हायला तांत्रिक बाजूंची बरीच मदत होते. प्रमोद शेलारांच्या आवाजाची पोत सर्वसाधारण नटाची नाही, त्यांच्या आवाजात अनुनासिक खरखरीतपणा आहे (खर्ज्य नव्हे) त्यामुळे पहिल्या वाक्यापासून हा अभिनेता काय बोलतो, यातील नेमकेपणा प्रेक्षकवर्ग अडकतो…आणि इथेच ‘ऑडियन्स हुक’ होतो. नैराशेपोटीचा पोटतिडकीचा आवाज शेलारांकडे उपजतच आहे.

त्यामुळे ‘शुद्धता गॅरेंटेड’ला कुठल्याही अजेंडा नाट्याचे कव्हर नाही. कैलास ठाकुरांची प्रकाशयोजना आणि महेंद्र मांजरेकरांचे संगीत हे नाटक पाणी पिणाऱ्या प्रत्येकासाठी आहे, याची साक्ष देते. नाटक बघता बघता अंतर्मुख व्हायला लावणारा पाण्याच्या प्रदूषणाचा प्रश्न किती विदारक होत चाललाय, हे फक्त मराठी रंगभूमीच पोटतिडीकेने सांगतेय, हे नमूद करणे गरजेचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -