Wednesday, June 26, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखतू चाल पुढं तुला रं गड्या...

तू चाल पुढं तुला रं गड्या…

प्रत्येकाच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा असा प्रारंभिक टप्पा म्हणजे दहावीची परीक्षा. या परीक्षेत जर चांगली टक्केवारी मिळाली, तर पुढील शिक्षणाचा मार्ग सुसह्य होत जातो, असा सर्वात्रिक समज आहे. त्यामुळे शहरांपासून गाव-खेड्यांपर्यंतच्या लहान – मोठ्या अशा सर्व शाळांमधून दहावीच्या परीक्षांना प्रचंड महत्त्व दिले जाते. त्याचबरोबर घराघरांतून दहावीच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त टक्के मिळवावेत यासाठी त्यांना नामांकित क्लासेसमध्ये पाठविऱ्यात येते, तर काही घरांत खासगी शिकवण्यांवर भर दिला जातो. आपल्या पाल्याने जास्तीत जास्त मार्क मिळवावेत यासाठी पालकांमध्येच चढाओढ लागलेली दिसते. ही स्पर्धा इतकी टोकाला जाते की, संबंधित विद्यार्थी मेटाकुटीला येतो आणि थोडे कमी मार्क मिळाल्यास घरची बोलणी खायला लागतील किंवा पालकांच्या रोषाला सामोरे जायला लागू नये म्हणून टोकाचे पाऊल उचलतो. काही वर्षांपूर्वी दहावी – बारावीसारख्या महत्त्वाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्यांनी किंवा कमी मार्क मिळालेल्या काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या. अशा वाढत्या घटनांमुळे महाराष्ट्र हेलावून गेला होता आणि या घटनांना आळा घालण्यासाठी युद्धपातळीवर पावले उचलण्यात आली. तसेच विद्यार्थी आणि पालकांचे समुपदेशन करण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली. या मोहिमेला बऱ्याच प्रमाणात यश आले आणि या नाहक आत्महत्या कमी झाल्या. दहावीची परीक्षा किंवा अन्य एखाद्या महत्त्वाच्या परीक्षेत अपयश आले म्हणजे सारे काही संपले असे होत नाही. यशस्वी होण्यासाठी इतर अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्यांचा अवलंब करावा म्हणजे आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यात प्रावीण्य मिळवून यशस्वी होता येते ही बाब पटवून दिल्यास जीवन सुसह्य होते, हे समाजात रुजविण्यात आले व त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे.

हा सर्व ऊहापोह करण्याचा उद्देश म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेस राज्यभरातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता. म्हणजेच या परीक्षेचा निकाल ९३.८३ टक्के इतका लागला असून नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५.८७ इतकी, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.०५ टक्के इतकी आहे. राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याची नेहमीप्रमाणे उत्सुकता होती. मात्र बोर्डाने अचानक तारखा जाहीर करून लगेचच निकाल ऑनलाइन जाहीर करून टाकला. अंतर्गत मूल्यमापनामुळे जवळपास सर्वच विद्यार्थी गेल्या वर्षी उत्तीर्ण झाल्यानंतर यंदा दहावीच्या पारंपरिक पद्धतीने दहावीचा निकाल राज्य मंडळाने जाहीर केला. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल ३.११ टक्क्यांनी घटला असून मार्च २०२० च्या निकालाची तुलना करता यंदाचा निकाल १.४७ टक्क्यांनी कमी आहे.

विशेष म्हणजे यंदा दहावीच्या निकालात १५१ विद्यार्थ्यांनी १०० टक्के मार्क मिळविले आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे १०८ विद्यार्थी लातूरचे असून त्या खालोखाल औरंगाबादचे २२, अमरावती ७, मुंबई ६, पुणे ५ आणि सर्वाधिक निकाल लागलेल्या कोकण विभागाचे केवळ ३ विद्यार्थी आहेत. यावरून निकालातील एक वेगळा पैलू पुढे आला आहे. तसेच यंदाच्या दहावीच्या निकालात फर्स्ट, सेकंड क्लासनुसार टक्क्यांची वर्गवारी पाहिली असता ५ लाख २६ हजार २१० विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत, तर ३,३४,०१५ विद्यार्थी द्वितीय, तर ८५,२१८ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ६६ हजार विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत, तर १ लाख ९ हजार ३४४ विद्यार्थ्यांना ८५ ते ९० टक्के गुण मिळाले आहेत.

या निकालात खासगी विद्यार्थी व पुनर्परीक्षार्थींच्या यशाचा आढावा घेतला असता पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये उत्तीर्णतेचे प्रमाण ६०.९० टक्के, तर खासगी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७४.२५ टक्के इतके आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे दहावीच्या निकालात दिव्यांग विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले असून त्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण थोडेथोडके नव्हे, तर ९२.४९ टक्के इतके आहे. पुण्यातील ५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. टिळक रोड येथील डीईएस इंग्लिश मीडियम स्कूलचा १०० टक्के निकाल लागला आहे. त्या स्कूलमधील स्वराली राजपूरकर या विद्यार्थिनीला १०० टक्के मिळाले आहेत. दहावीच्या निकालाचा विभागवार टक्केवारीचा विचार केल्यास मुंबई, पुणे हे शहरी अग्रेसर विभाग मागे पडले आहेत. मुंबईचा ९३.६६, तर पुण्याचा ९५. ६४ टक्के निकाल लागला आहे. कोकण विभागाने मात्र नेहमीप्रमाणे आपली घोडदौड कायम ठेवली असून या विभागात ९८.११ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकंदरीत दहावीच्या निकालाचा टक्का जरी घसरला असला तरी कोकण विभागाचा निकाल नेहमीप्रमाणे सर्वाधिक लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीप्रमाणे दहावीच्या निकालाचा टक्काही घसरला आहे. मागील वर्षी महाराष्ट्राचा निकाल ९६.९४ टक्के लागला होता, तर यंदाचा निकाल ९३.८० टक्के लागलेला आहे. चला आयुष्याचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि काही कारणाने जे हा टप्पा पार करू शकले नाहीत त्यांनी अजिबात खचून न जाता पुन्हा निर्धाराने पुढेच जायचे याचे भान सदैव ठेवावे. एकूणच तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -