Friday, April 26, 2024
Homeकोकणरायगडनिधींचा वर्षाव, मात्र ठोस कामे नाहीत

निधींचा वर्षाव, मात्र ठोस कामे नाहीत

कर्जतकर संभ्रवास्थेत; एकाच कामासाठी विविध माध्यमांतून लाखोंचा खर्च

कर्जत (वार्ताहर) : मागील अडीच वर्षांत कर्जत नगर परिषद हद्दीतील विकासकामांसाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमांतून करोडो रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे नगर परिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच आमदार यांनी वारंवार जाहीर केले आहे. मात्र जाहीर केलेला निधी आणि प्रत्यक्ष जागेवरील विकासकामे यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे करोडो रुपयांच्या निधीचा वर्षाव होऊनही प्रत्यक्षात ठोस कामे दिसत नसल्याने हा निधी नक्की मुरतो तरी कुठे? असा सवाल कर्जतकरांमध्ये उपस्थित केला जात आहे.

आमदारांचे भाचे तथा नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक संकेत भासे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून आजपर्यंत सुमारे ३२ कोटी विकासकामांसाठी मंजूर करून आणले. काही विकासकामांचे भूमिपूजनही झाले आहे. मात्र प्रत्यक्षात येथील काही विकासकामांना अद्यापि मूर्त स्वरूप आलेले नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या निधीतून नक्की कोणती विकासकामे केली, अशी चर्चा नागरिकांत आहे.

कर्जत परिषदेकडे करातून प्राप्त होणाऱ्या निधीतून म्हणजेच नफा फंडातून विविध विकासकामे केल्याचे कागदोपत्री नोंद आहे. मात्र या कामाबद्दलही नगर परिषदेच्या संबंधित प्रशासकीय विभागाकडे विचारणा केली असता तसेच लेखी माहिती मागितली असता माहिती अर्जदाराला देण्यास टाळाटाळ अथवा दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे नफाफंडाच्या माध्यमातून कागदोपत्री दाखविण्यात येणाऱ्या विकासकामांबद्दलही नागरिकांमध्ये शंका-कुशंका निर्माण झाले आहे.

त्यामुळे एकीकडे शहरातील बंद पडलेले उपक्रम म्हणजे वीजनिर्मिती करणारा बायोगॅस प्रकल्प, आमराई येथील रखडलेली स्मशानभूमी, भाजी मंडई, मासळी बाजार तसेच भुयारी गटारे, भुयारी केबल जोडणी आदी महत्त्वाची विकासकामे प्रलंबित असताना त्याच त्याच कामांवर लाखोंचा निधी खर्चाचा अट्टाहास का? असाही प्रश्न नागरिकांना विचार करण्यास भाग पाडत आहे. तसेच यामागे गौडबंगाल आहे का? अशी शंकाही नागरिकांतून उपस्थित केली जाऊ लागली आहे.

एकाच कामांसाठी शासनाचा निधी खर्च करणे योग्य नाही. कर्जत शहरात अनेक महत्त्वाची कामे आहेत, त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. – उमेश गायकवाड, (नगरसेवक, कर्जत न. प.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -