Friday, April 26, 2024
Homeसाप्ताहिककोलाजDivorce : काडीमोड

Divorce : काडीमोड

काडीमोड (Divorce) हा शब्द जरी जुना असला तरी ही रीत फार जुनी नव्हे. कारण पूर्वी लग्न टिकविण्याकडे समाजाचा कल दिसून यायचा. आजकाल जरा शाब्दिक खटके उडाले की, भविष्यातही हेच होणार हे जाणून काडीमोड घेतला जातो. काडीमोड म्हणजे स्वातंत्र्य, मुक्तता. जी नको असलेल्या नात्यांचा भार जास्त काळ मनावर ठेवू देत नाही.

पण काडीमोड घेण्याआधीच जर योग्य विचार केला असता तर ही वेळच आली नसती असं का वाटत नाही अशा माणसांना? की लग्न पाहावे करून सारखे आयुष्यात असे प्रसंग धुमधडाक्यात साजरे करून मग जरा पटले नाही की काडीमोड घ्यायला मन धजावतं आणि मग सुटलो एकदाचे या बंधनातून असं होऊन जातं?

सर्वसामान्यपणे पाहिलं तर समाजात संस्कारक्षमपणे विवाह बंधन टिकविण्याकडे कल दिसून येतो. मात्र चित्रपटसृष्टीत काडीमोड या शब्दाचा पडलेला पायंडा पाहता कुणाचा विवाह कधी होतो आणि काडीमोड कधी होतो ते कळतही नाही. अवघाची संसार असा तकलादू का? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

समाजाच्या एक पाऊल पुढे वावरणारं हे क्षेत्र वैयक्तिक आयुष्यातही असंच पुढारलेलं दिसून येतं. कारण येथे काहीतरी अनोखे अजब गजब कहाण्यांचे किस्से ऐकायला मिळतात. आपलं सारं आयुष्य करिअरला वाहून घेतलेली अनेक मंडळी विवाहापासून वंचित तरी राहतात किंवा विवाह केला तर काडीमोड हा पर्याय वर्षभरातच अवलंबतात. किंवा मग त्याही पुढला पर्याय आयुष्यात मुलांना एंट्री नसते. कारण करिअरपुढे मुलांची हेळसांड होऊ नये, त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये, त्यांची आबाळ होऊ नये यासाठी असे कठोर निर्णय घेतले जातात. कलाकारांच्या आयुष्यात काय चाललंय याकडे सोशल मीडियामध्ये झंझावात दिसून येतो.

अलीकडेच एका अभिनेत्रीचा काडीमोड झाल्याची घटना घडली आणि काळजात धस्स झालं. धस्स यासाठी कारण तिने सासरच्या माणसांना ज्याप्रकारे अॅक्सेप्ट केलं होतं ते पाहून वाटलंही नव्हतं की ही काडीमोड घेईल. यूट्युब चॅनेलवर तर ही चुलीपाशी बसून भाकऱ्या थापतानाही दिसली. कौटुंबिक कार्यक्रमात मोकळेपणाने वावरली. इतकं असतानाही जर असे काडीमोडाचे प्रसंग उद्भवत असतील, तर मग लोकांसमोर दिसणारे चॅनेल आणि खरी परिस्थिती यात जमीन अस्मानाचं अंतर असतं हे ओळखायला वेळ लागत नाही.

दिखाव्यातून स्पष्ट होणारं रूप आणि वास्तवता यातलं अंतर पाहिलं तर समाजात काडीमोड हा शब्द अलीकडे फारच चर्चेत येऊ लागला आहे.

अशी अनेक उदाहरणे पाहता येतील जी एका वर्षातच काडीमोड घेऊन आपल्या करिअरला प्रथम प्राधान्य देताना दिसून आली. विचारांचे मतभेद हे यासाठी विशेषत: कारणीभूत ठरत असतील. करिअरला खोडा हे दुसरं कारण असू शकतं. विशेषत: विवाह झालेल्या स्त्रीने केवळ घर आणि संसार सांभाळावा, करिअर पुरे आता असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तिचा स्वाभिमान दुखावणं साहजिकच असतं. कारण तिने स्वत:च्या सामर्थ्यावर निर्माण केलेलं तिचं अस्तित्व, तिची ओळख ही क्षणभरात मिटणारी नसते. पत्नीने आपलंच ऐकावं आणि आपण सांगतो तसंच वागावं, करिअरला पूर्णविराम द्यावा, असा हेका ठेवून आपले निर्णय तिच्यावर लादले तर तिचा इगो दुखावणारच.

सुरुवातीला ती सारं कुटुंब स्वीकारते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागते, रितीरिवाजही पाळते, पण ठरावीक काळानंतर तिचा कल हा करिअरकडे दिसून येतो. यावेळी घरातून काही बंधनात ती अडकलेली असते, पण यातून मुक्त होण्यासाठीची तिची धडपड ही शेवटी या एका पर्यायाकडे तिला घेऊन येते.

सुरुवात आणि शेवट पाहिला तर आयुष्याच्या मध्यंतरीचा हा काळ निर्णयासाठी महत्त्वाचा असताना नेमका या आयुष्याच्या टप्प्यावर होणारा हा निर्णय तिला तिच्या पुढच्या संपूर्ण आयुष्यात एकटं करून टाकणारा असतो.

काडीमोड होण्यासाठी अनेक कारणे घडतात. जी त्या त्या माणसांना न पटणारी असतात. भातुकलीच्या खेळाप्रमाणे मांडलेल्या संसाराचा जेव्हा काडीमोड होतो तेव्हा तिचं मुक्त आयुष्य अनुभवणारं मन खरंच मुक्त होत असेल का? की विचारांच्या पंखाखाली मनातून ती अधिक खचली जात असेल? वरवर तिचं हसणं, बोलणं समाजाला प्रेरित करणारं असेल की, मुक्तता, स्वैराचाराचं रूप म्हणजेच ती अशाप्रकारे समाजासमोर आदर्श ठरेल? माहीत नाही, पण संसाराचं चक्र न्याहाळताना आपण सात जन्माचं बंधन घालतो स्वत:भोवती. पण पंखात बळ असेल तर काडीमोड हा पर्याय निवडताना, तिची निर्णयक्षमता न्याहाळताना कोण चुकलं असेल यावेळी? हा विचार करत बसण्यापेक्षा एवढा मोठा निर्णय घेण्याची क्षमता जर एखादी स्त्री दाखवते तेव्हा ती निश्चितच कमकुवत नाही याचेच इथे प्रत्यक्ष दर्शन घडते एवढंच.

-प्रियानी पाटील

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -