Monday, May 6, 2024
Homeसाप्ताहिककोलाजtransient : क्षणिका - दुसऱ्याच्या नजरेतून...

transient : क्षणिका – दुसऱ्याच्या नजरेतून…

तूप कढले तसा गॅस बंद केला आणि ते पातेले गॅसवर ठेवून बेडरूममध्ये जाऊन कपडे घडी घालत बसले. तूप आता थोडेसे गार झाले असेल, असा विचार करून ते गाळण्यासाठी स्वयंपाकघरात आले.

‘इथंच तर भांड होतं…’ बाजूच्या बेसीनमध्ये भांडी घालत घासत असलेल्या कामवाल्या बाईकडे पाहून म्हटले.
‘कोणतं भांड बाई…?’ ‘अगं तूप कढवल्याचं भांड.’ ‘हे काय घासायला घेतलं…’
मी चमकून बेसिनकडे पाहिले तर बाई ते खसाखसा घासत होती.
‘अगं त्यात आत्ताच कढवलेलं तूप होतं म्हणून तर घासायला टाकलं नव्हतं.’
मी कपाळावर हात ठेवत म्हटले.
‘मला वाटलं जळलेलं काळ भांड आहे म्हणून तुम्ही पाणी टाकून उकळत ठेवलं गॅसवर घासायला सोपं जावं म्हणून…’
‘अगं तूप होतं त्याच्यात.’ ‘असं घरी बनवतात का तूप… माहीत नाही हो मला. तुम्ही कामात दिसलात म्हणून… मीच घेतलं ते पटकन घासायला…’

चांगली तीन आठवड्यांची साय वापरून पाव किलोपेक्षा जास्त असलेला घरचे आणि ताजे तूप बाईने चक्क फेकून दिले होते. साय जमवणे, त्याला विरजण लावणे, रवी लावून किती वेळ घुसळणे, लोणी काढून त्याला कढवणे, तूप व्हायचा क्षण सांभाळणे याविषयी या बाईला काय समजावून सांगू?

बाईला बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. स्वतःवरच चरफडत बेडरूममध्ये निघून गेले आणि दार लावून घेतले. सकाळी सकाळी डोके जड झाले होते. जरा अंग टेकले.

तुपाविषयी अनेक गोष्टी आठवत गेल्या. सासू म्हणायच्या, ‘आपल्याकडे तीन आठवड्यातून एकदा आपण तूप काढतो ते जेमतेम पाव ते अर्धा किलो… आमच्या घरी दिवसाला एवढे तूप निघायचे.’

मग रोज किती लिटर दूध त्यांच्या घरी लागायचे, त्यावर भाकरीसारखी कशी जाड साय यायची, तूप घुसळण्यासाठी उभे राहून फिरवायची रवी कशी होती, या सर्व कामासाठी घरातल्या महिलांना किती वेळ लागायचा, त्यात त्यांना किती आनंद मिळायचा. कढलेल्या तुपानंतर भांड्यात खाली राहिलेली बेरी वापरून त्या गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत आणि पौष्टिक वड्या कशा बनवायच्या. रोज भातावर किती तूप टाकायच्या आणि पुरणपोळ्याच्या जेवणामध्ये वाटी भरभरून कसे पंक्तीत तूप वाढायचे, अशा कितीतरी गोष्टी मला कंटाळा येईपर्यंत प्रत्येक वेळेस घरात तूप कढायचे, त्या दिवशी सांगायच्या.

आमच्या घरातसुद्धा तूप कढवलेल्या भांड्यातून शेवटच्या थेंबापर्यंत तूप व्यवस्थित काढल्यानंतर उरलेल्या बेरीमध्ये साखर टाकून सासऱ्यांना खायला नेऊन द्यायच्या, हे मी डोळ्यांनी पाहिले होते.
त्या म्हणायच्या, ‘खाऊन माजावे फेकून माजू नये.’

आज सासूबाई नाहीत. परंतु त्यांच्या अनेक गोष्टी आठवत राहतात. त्या असेपर्यंत मी कधीच तूप कढवले नव्हते. ‘तूप कढवणे’ हा त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाचा भाग असायचा. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला त्या क्षणी पूर्णपणे टिपतही यायचा. दुधावर कमी जाडीची साय येऊ लागली की त्या केवळ त्या सायीसाठी दुधाची कंपनी बदलून टाकायच्या. चुकून कधी त्यांच्या हातून तूप कढवताना करपले तर हळहळायच्या. या करपलेल्या तुपात त्या वाती भिजवून ठेवायच्या. देवापुढे रोज तुपाचा दिवा लावायच्या.

मला तूप आवडत नाही, म्हणून खूप रागवायच्या. ‘तूप नाही तर रूप नाही म्हणायच्या.’ शारीरिक सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी तू अत्यावश्यक आहे म्हणून समज द्यायच्या. इतकेच नाही तर बाईला पीठ भिजवतानाच तूप घालून मग माझ्यासाठी ती पोळी लाटायला सांगायच्या. कुठूनही माझ्या पोटात तूप गेले पाहिजे यासाठी धडपडायच्या.
आज बाईने तूप फेकून दिले. त्या असत्या तर किती हळहळल्या असत्या, असे वाटून गेले. तुपासाठी त्यांनी खास जाड बुडाचं चांदीचं भांड आणलं होतं. त्यातील तूप संपत आलं की त्यात त्या गरम वरण घालून ठेवायच्या आणि भातात ते वरण कालवताना म्हणायच्या, ‘हे खाऊन बघ… यालाच पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात.’

आता सासुबाई स्वर्गात पोहोचल्या आहेत. तेथूनही त्या या घरावर लक्ष ठेवून आहेत, असे कुठेतरी आतून वाटत राहते.
आज ‘सुतावरून स्वर्ग गाठणे’ या उक्तीनुसार मी सुद्धा ‘तुपावरून स्वर्गातल्या सासूबाईनाच जणू
गाठले.’ असो.

विचार करता करताच मला डुलकी लागली. कामवाल्या बाईच्या नजरेतून तूप म्हणजे त्या दिवशी पाणी होते. ते त्यांनी फेकून दिल्यावर माझ्या जीवाचे पाणी पाणी झाले. दुसऱ्याच्या नजरेतून एखाद्या गोष्टीकडे पाहिले (तसे ते जमणे कठीणच!) तरच त्या गोष्टीचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्या लक्षात येते इतके मात्र खरे!

-प्रा. प्रतिभा सराफ

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -