Friday, May 3, 2024
Homeसाप्ताहिककोलाजवाढता वाढता वाढे...

वाढता वाढता वाढे…

वाढते वजन हा नेहमीच चिंतेचा विषय ठरतो. त्यामुळे नेहमीच आपल्याला जवळची व्यक्ती वजन कमी करण्याचे सल्ले देत असते. पण वाढते वजन आपला आत्मविश्वास कमी करतात, हे जेव्हा आपल्या लक्षात येते, तेव्हा मात्र जवळच्या व्यक्तींनी दिलेला सल्ला एक कानमंत्र ठरतो.

नक्षत्रांचे देणे – डॉ. विजया वाड

तुझं जरा वजन वाढलंय नेहा.” गजानन आरशात बघून साडी नेसणाऱ्या, नेहाकडे बघत म्हणाला.
“हे बघ गजू, बायको जरा गोल गोलच छान दिसते.”
“पण चेंडूसारखी गोल नाही बरी.”
“गजू नको ना रे लागेलसं बोलू. तूच एक माझा तारणहार आहेस.” नेहाच्या डोळ्यांत पाणी पाहून, गजाननला वाईट वाटलं.
“बरं नाही बोलत काही अधिक उणं! बस्?” गजू बायकोला बरं वाटेलसं बोलला.
लग्न झालं, तेव्हा किती छान दिसायची जोडी.
‘स्पर्श तुझा मालकंस
खास तुझा सोनचाफा
मिठीत तुझ्या गंध गंध
जणू सुगंधाचा ताफा’

असं गोड गाणं होतं, दोघांचे वैवाहिक जीवन! पण सुख नेहाच्या अंगी लागलं हो बघता-बघता आणि गोलाई वाढली हो!
“नुसतं वजन कमी कर म्हणून म्हटलं, तर इतका राग नाही बरा.”
“मी काही अधिक उणं बोलले का?”
नेहा म्हणाली.
“नाही गं! मी म्हटलं का तसं?”
“गजू, मी तुला आवडते
ना रे?”
“हो गं नेहा. खूप
खूप आवडतेस.”
“मग झालं तर.”
नेहा सुखावली.
“पण गोल होऊ नकोस, ते चांगलं नाही तुझ्यासाठी.”
“मला समजत का नाही? पण गजू कळतंच नाही रे! कशी कमी होऊ?
सांग ना!”
“स्वस्त आणि मस्त उपाय सांगू? सांगू का?”
“सांग ना रे.”
“तू २०० दोरीच्या उड्या मार.”
“२००? मांड्या भरून येतील रे गजू.”
“अगं २५ ने सुरुवात कर.
२५ तरी जमतील ना?”
“हो गजू. नक्की जमतील.”
“आज २५. उद्या ५०. असं करत-करत २००चा पल्ला आठ दिवसांत गाठ. हाय काय! अन् नाय काय!”

“खरंच रे गजू. अगदी तस्संच करते.” नेहा उत्साहाने खदखदली. आपण आटोपशीर झाल्याची स्वप्ने तिला ताबडतोब पडू लागली. सुखद स्वप्न हवीशी वाटतात ना? गजूच्या नेहाला तसंच झालं.
पण…
हे पणच मोठे वाईट असतात ना!
झालं काय? नेहाने वाढता वसा आठ दिवसांत पूर्ण केला खरा; पण जेवणात वाढ झाली नकळत. भूकच आवरत नसे! मग काय? ममत्व आडवं स्वत: बाबतीत! दोन घास जास्त खाल्ले, तरी अंगी लागू लागले.

“नेहा ताई, वजन वाढतंय बरं!”
“अहो, हे काही म्हणत नाहीत.”
“नेहाताई, तुम्हाला घाबरत असतील मिस्टर.”
“मी का वाघ, सिंह आहे घाबरायला?”
“वाघ, सिंह परवडले हो. ते निदान पिंजऱ्यात तरी असतात. बायको हा प्राणी केव्हा अंगावर येईल, याची कायम भीती असते ना, विवाहित नवऱ्यांच्या मनात.”

महिला मंडळ आपल्याच विनोदावर खूशम खूश झालं. पण नेहाच्या मनाला ते लागलं.
घरी आल्यावर गजाननला ती म्हणाली की, “इतकी का मी बेढब दिसते गजू तुझ्यापुढे?”
“फारशी नाही गं!” गजानन
मनापासून म्हणाला.
“मला भोपळा म्हणतात नि तुला पडवळ.”
“खरंच? महिला मंडळ बोलतं?”
“हो रे.”

पण डॉ. ब्रह्मे घरी आले नि चटकन वहिनींना बघून म्हणाले, “वहिनीमाय, तुम्हाला हृदयविकार जडू शकतो.”
“अहो काही तरीच काय डॉक्टरसाहेब?”
“मी गंमत करीत नाही वहिनीमाय… माझ्या पेशंट
सौ. लुडबुडे.”
“काय झालं?”
“बोलता-बोलता गेल्या हो!”
नेहा दचकली. आपुले मरण पाहिले म्यां डोळा! सारखी घाबरली.
“मला मिसेस लुडबुडे व्हायचं नाही. डॉक्टरसाहेब!”
“हवं तर मी दोरीच्या उड्या विकत आणून देतो.” डॉक्टरसाहेब म्हणाले नि त्यांनी तसे केले. तेव्हापासून “वाढता वाढता वाढे…” ने उड्यांचा सपाटा लावला आहे.
वहिनीमायचा मजला तिसरा! बिचारे दुसरा मजला रहिवासी!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -