Friday, May 10, 2024
Homeसाप्ताहिककोलाजये रातें, ये मौसम, नदीका किनारा...

ये रातें, ये मौसम, नदीका किनारा…

श्रीनिवास बेलसरे

पद्मश्री नूतन समर्थ एक गुणी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होती. तिच्या सौंदर्याची गोष्टच काही और होती. तिचे नितळ, सात्विक सौंदर्य मनात आगळेच भाव उत्पन्न करायचे. नूतनचे रूप मधुबालासारखे बेधुंद नव्हते किंवा तरुण वयातील वैजयंतीमालासारखे मोहक नव्हते, साधनासारखे गूढ नव्हते किंवा माला सिन्हासारखे लोभस नव्हते. खरे तर तिच्या सौंदर्याचे वर्णन करणेच अवघड आहे. प्रेक्षक जरी तिच्या सौंदर्याने मोहित होत असले तरी तिच्याभोवती सात्विकतेचे एक अदृश्य सुरक्षावलय सतत फिरत असायचे. तिच्या आकर्षणात तिच्याबद्दल एक सुप्त आदरही समावलेला असे.

या गुणी अभिनेत्रीच्या नावावर एक वेगळाच विक्रमही होता. सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून ‘फिल्म फेयर’चा किताब ५ वेळा जिंकणारी ती एकमेव अभिनेत्री होती! तिचा हा विक्रम तिच्याच भाचीने, म्हणजे काजोलने, २०११साली पूर्ण करून दाखवला. आपल्या ४१ वर्षांच्या कारकिर्दीत सुमारे ७० सिनेमांत प्रमुख भूमिकेत चमकलेल्या नूतनने ६वे फिल्मफेयरही ‘मेरी जंग’(१९८५)मधील सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेतूनही मिळवलेच! अतिशय स्वाभाविक अभिनय करणारी नूतन प्रत्येक भूमिकेत खरीच वाटायची. खरे तर तिने चाकोरीबाहेरच्या, अगदी अनपेक्षित अशाही भूमिका स्वीकारल्या. ती सर्वात जास्त सुंदर दिसली होती ‘दिल्ली का ठग’मध्ये! निर्माता दिग्दर्शक एस. डी. नारंग यांनी १९५८ साली काढलेल्या या विनोदी सिनेमात किशोर कुमार नायक होता आणि मदन पुरी आणि इफ्तेखार महत्त्वाच्या भूमिकेत होते. त्यात नूतनच्या सौम्य, शीतल, सात्विक सौन्दर्यासारखेच एक अतिशय गोड गाणे होते. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे जोवर तरुण-तरुणींत आकर्षण आहे, प्रेम आहे, सगळे जग विसरून क्षणभर का होईना, एकमेकांत मग्न होऊ शकणारे प्रेमिक आहेत, तोवर गाणे अजरामर राहील!

मजरूह सुलतानपुरींच्या लेखणीतून उतरलेल्या शब्दांना संगीत होते रवी यांचे! किशोरदा पडद्यावरही होते आणि गाणे गायलेही त्यांनीच! मात्र आशाताईंनी गाण्यासाठी वेगळाच स्वर लावला होता. या गाण्यात दिसणाऱ्या नूतनच्या एकेक अदा म्हणजे तिच्या गुप्त चाहत्यांसाठी अक्षरश: जीवघेण्या होत्या! आशाताईंनी ज्या नाजूक, मोहक आवाजात गाणे गायले आणि संगीतकार रवीने जे संथ, कर्णमधुर संगीत दिले त्याच्याशी नूतनचा लाडीक अभिनय इतका एकरूप झाला होता की ज्याचे नाव ते!

गाणे ऐकताना मनात एक टोकाची एकरूपता साधली जाते. सात्विक प्रेमाचा निशीगंध सगळीकडे अक्षरश: दरवळू लागतो. प्रियकर प्रेयसी आपल्या प्रेमाची सफलता पहिल्यांदा साजरी करत आहेत, असे वातावरण आपोआप निर्माण होते. त्यावेळी त्या दोघांनाही जे हवे असते ते परस्परांना द्यायचे आश्वासन आपोआपच त्यांच्या ओठावर उमटते आणि गाणे सुरू होते…

ये रातें, ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा
कहा दो दिलों ने की मिलकर कभी हम,
ना होंगे जुदा…
प्रेमात सगळे मनासारखे झाले आहे, तरी मनाचे विचित्र खेळ थांबत नसतात. आपल्या जिवलगाकडून त्या क्षणी, त्या प्रेमाची आयुष्यभराची शाश्वती पुन्हा पुन्हा उच्चारून हवी असते आणि एवढेच नाही, तर त्याने ती मागितली नसताना स्वत:हून पुन्हापुन्हा द्यायचीही इच्छा असते! ती नितांत सुंदर, धुंद भावावस्था म्हणजे मजरूह सुलतानपुरींचे हे गाणे!

पूर्वीचे गीतकार, ते ज्या पात्रांसाठी गाणे लिहित त्यांच्या अगदी मनात शिरत असत. कधीकधी तर वाटते, जसे जुन्या पुराणकथांतील लोक ‘परकायाप्रवेश’ करत तशीच शब्दांच्या या जादुगारांना पर-मन-प्रवेशाची विद्या अवगत असावी! हव्या त्या व्यक्तीकडून प्रेमस्वीकृती झाली की, जणू सर्व काही साध्य झाले असे वाटण्याचा तारुण्य हा आयुष्यातला एकमेव ऋतू असतो. सगळे जग आगळेच वाटू लागते –
ये क्या बात हैं, आज की चाँदनी में
के हम खो गये, प्यार की रागनी में
ये बाहों में बाहें, ये बहकी निगाहें
लो आने लगा ज़िन्दगी का मज़ा, ये रातें, ये मौसम…
खरे तर जगाला या गोड गुपिताची खबर लागलेली असते. कुठेकुठे तर मत्सराची विषारी रोपटीही वाढू लागलेली असतात. पण प्रेमाचे अमृत प्यालेल्या त्या दोन निरागस जीवांना मात्र कसलीच कल्पना नसते. त्यांना वाटत असते की, सगळा आसमंत आपल्या या मिलन-समारोहात मनापासून सामील झाला आहे.
सितारों की महफ़िल ने करके इशारा
कहा अब तो सारा जहां हैं तुम्हारा
मोहब्बत जवां हो, खुला आसमां हो
करे कोई दिल आरजू और क्या, ये रातें, ये मौसम…
तरीही मध्येच इतके सगळे, इतके चांगले कसे घडू शकते? अशी पूसटशी शंका मनात क्षणभर का होईना डोकावतेच! ‘लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला’ सारखी मनाची अवस्था होते. मग आपले हे प्रथमच प्राप्त झालेले वैभव सुरक्षित करण्यासाठी एकमेकांकडून वचने घेणे, शपथा घालणे सुरू होते.
कसम हैं तुम्हें, तुम अगर मुझसे रूठे,
रहे सांस जबतक ये बंधन ना टूटे…
शिवाय ती मुग्धा स्वत:ही स्वत:च्या प्रेमाची कबुली देते. न मागितलेले आश्वासनही देऊन टाकते. अशा अवस्थेत दोन्ही मनात एक टोकाचे तादात्म्य साध्य झालेले असते. वचन मागतानाच वचन दिलेही जाते.
तुम्हें दिल दिया हैं, ये वादा किया हैं,
सनम मैं तुम्हारी रहूंगी सदा…, ये रातें, ये मौसम…
आता ही अशी इतकी साधी गाणी, मुग्ध भावनांचे असे निरागस व्यक्तीकरण कुठे दिसणार? म्हणून तर हा नॉस्टॅल्जेया!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -