Tuesday, April 30, 2024
Homeसाप्ताहिककोलाजपथ्यापथ्य नेमके कशासाठी

पथ्यापथ्य नेमके कशासाठी

- भाग १

डॉ. लीना राजवाडे

(पथ्यं पथोऽनपेतं यत्‌ यच्चोक्तं मनसः प्रियम्‌)

वाचकहो मागील दोन लेखांतून आपण ऋतुचर्या आणि व्याधीक्षमत्व या दोन विषयांबद्दल माहिती करून घेतली. या दोन विषयांना धरूनच महत्त्वाचा विषय म्हणजे पथ्य संकल्पना.

पथ्यं पथोऽनपेतं यत्‌ यच्चोक्तं मनसः प्रियम्‌ ‘पथ’ म्हणजे (आरोग्याचा) मार्ग. म्हणून आरोग्याच्या मार्गाला सोडून जे नाही ते आणि प्रायः मनाला प्रिय असेल ते सर्व पथ्य होय. याउलट आरोग्याला विघातक व मनाला अप्रिय ते सर्व अपथ्य होय.

पावसाळ्यात ऋतू म्हणून जसा आपण खाण्या-पिण्याच्या सवयी यातील बदल करणे, हे जसे आरोग्य टिकवण्यासाठी फायदेशीर असते. तसेच वातावरणातील होणारे बदल त्यामुळे दूषित हवा, पाणी, याबरोबरच आगंतुक आजार जसे की ताप, सर्दी-खोकला यांसारखे आजार होतात. अशा वेळी आजारी अवस्था लवकर संपावी किंवा जास्त काळ टिकू नये म्हणून पाळायचे असते ते म्हणजे पथ्य. जनमानसात एक चुकीचा समज आहे की, विशिष्ट पथीसाठी किंवा औषधांसाठी पाळायला लागणारी गोष्ट म्हणजे पथ्य, ती या लेखाच्या निमित्ताने दूर व्हावी, अशीही अपेक्षा आहे.

पथ्य, अपथ्य हे ठरलेले नसते. अमुक वस्तू पथ्यकर आणि अमुक वस्तू अपथ्यकर असे शंभर टक्के पक्के विधान करता येत नाही. कारण पथ्यकर वस्तूसुद्धा अति मात्रेत खाल्ली, तर ती अपथ्यकर ठरू शकते. प्रदेशानुसार व जीवनशैलीनुसारही पथ्यापथ्य बदलू शकते. उदा. मीठ रूची वाढविणारे, पचनास मदत करणारे, मलप्रवृत्ती साफ होण्यास मदत करणारे असते, मात्र अतिप्रमाणात खाल्ले, तर शुक्रधातूला कमी करते, शक्तीचा ऱ्हास करते. काळ – कोणत्या ऋतूत काय खावे हे ऋतुचर्येत समजावलेले आहेच. त्याचा विचार न करता कधीही, काहीही खाल्ले, तर एका ऋतूत पथ्यकर असणारी वस्तू दुसऱ्या ऋतूत अपथ्यकर ठरू शकते. उदा. मलई बर्फीसारखी मिठाई हेमंत ऋतूत खाल्ली, तर तेव्हा अग्नी बलवान असल्याने नीट पचू शकते व धातूंचे पोषण करू शकते. मात्र हीच मलई बर्फी, कफ प्रकृतीच्या व्यक्तीने शिशिर ऋतूत खाल्ली, तीसुद्धा आवडते म्हणून थोडी जास्तीतच खाल्ली, तर त्यातून कफ दोष तयार होऊ शकतो आणि हीच बर्फी पावसाळ्यात, जेव्हा अग्नी मंद झालेला असतो, अशा वेळी खाल्ली, तर अपचनाला कारण ठरू शकते.
·
आपली जीवनशैली व आपला व्यवसाय यावर सुद्धा काय पथ्यकर, काय अपथ्यकर हे ठरत असते. दिवसभर शेतात काम करणाऱ्या, घाम गाळणाऱ्या व्यक्तीने जड अन्न खाल्ले तर त्याला पचू शकते, मात्र दिवसभर बसून असणाऱ्या व्यक्तीला ते अन्न अपचनाला कारण ठरू शकते.

भूमी – त्या त्या देशात पथ्यकर काय, अपथ्यकर काय याच्या व्याख्या बदलतात. उदा. दक्षिण भारतात उष्णता जास्त असल्याने तेथे थंड गुणाचे खोबरेल तेल स्वयंपाकात वापरले जाते, तर उत्तर भारतात थंडी अधिक असल्याने तेथे मोहरीचे तेल वापरता येते. रुचीपायी किंवा चवीला चांगले लागते म्हणून किंवा इतर कोणत्या कारणाने दक्षिण भारतात मोहरीचे तेल वापरले गेले, तर ते अर्थातच अपथ्यकर ठरते.

दोषाच्या भिन्न अवस्था – ऋतुमानाप्रमाणे तसेच दिवस व रात्रीच्या विभागानुसार शरीरात वात-पित्त-कफ दोषात चढ-उतार होत असतात. त्यानुसारही कधी काय खावे किंवा काय करावे हे ठरत असते. वेळ-काळाचे भान न ठेवता खाल्लेली वस्तू किंवा केलेली क्रिया ही अपथ्यकर ठरू शकते. उदा. दुपारी झोपण्याने कफ व पित्तदोष वाढत असल्याने दुपारची झोप अपथ्यकर असते. मात्र तीच झोप रात्री घेतली, तर पथ्यकर असते. दुपारचे जेवण मध्यान्ही जेव्हा पित्तदोष वाढलेला असतो तेव्हा केल्यास नीट पचते. मात्र ती वेळ उलटून गेल्यावर केलेले जेवण अपथ्यकर ठरते. म्हणून आपण राहतो ते देश, हवामान, आपली प्रकृती, आपला व्यवसाय, आपली जीवनशैली वगैरे सर्व गोष्टी ध्यानात घेऊन आपल्यासाठी पथ्यकर काय, अपथ्यकर काय हे ठरवणे आवश्यक होय.

पथ्य हा शब्द सर्वत्र प्रसिद्ध आहे. ‘पथ्य काय?’ या एकाच प्रश्नात पथ्याबरोबर अपथ्याच्या उत्तराचीही जिज्ञासा असते. निरनिराळ्या आजारांमध्ये, अधिक झालेली, आजार उत्पन्न करणारी कारणे कमी करणे व शरीरातील कमी झालेली आजाराशी लढा देणारी गोष्ट बाह्यसृष्टीतून शरीराला पुरविणे या तत्त्वानुसार पथ्यापथ्य प्रयोग सांगितले आहेत.

चिकित्सेच्या औषध व उपचार यांना साह्यभूत होणाऱ्या आहार-विहाराला पथ्य व विकार किंवा वर्धक आहार-विहाराला अपथ्य असे समजावे. तसेच स्वस्थ मनुष्याच्या स्वास्थ्य रक्षणासाठी कराव्या लागणाऱ्या आहार विहाराचा विचारही पथ्यापथ्य विषयात येतो. ·औषध व पथ्य यांच्या मर्यादा समजणे आवश्यक आहे. कित्येक वेळा औषध व पथ्य यांची मर्यादा इतकी जवळ असते की, पथ्य कोठे संपते व औषध कोठे सुरू होते, हे समजत नाही. दूध हे कित्येक वेळा औषध म्हणून, तर कित्येक वेळा पथ्य म्हणूनही दिले जाते. नेहमी दुधाचा आहार घेणाऱ्या अतिसारी (प्रचंड प्रमाणात जुलाब होणे) मनुष्याला दाह व तहान असेल, तर त्याला दूध हे पथ्य होते आणि जीर्णज्वरामध्ये (खूप दिवस ताप राहणे) दाह असताना, धारोष्ण दूध हे औषध म्हणून उपयोगी होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -