Friday, May 17, 2024
Homeनिवडणूक २०२४राज्याला नाही तर देशाला अस्थिर करण्याचे काम भटकते आत्मे करत आहेत

राज्याला नाही तर देशाला अस्थिर करण्याचे काम भटकते आत्मे करत आहेत

महायुतीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवारांवर टीका

पुणे : ज्यांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत त्यांचे आत्मे भटकत राहतात. ४५ वर्षांपूर्वी आपल्या महत्वकांक्षापोटी अस्थिर करण्याच्या खेळाची सुरूवात केली. तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता आली. त्यानंतर राज्यातील अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळही पूर्ण करू शकले नाहीत. ते विरोधकांसोबत त्यांच्या पार्टीला आणि त्यांच्या परिवाराला अस्थिर करत आहेत. १९९५ साली भाजप-शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतर त्यावेळीही तो आत्मा त्या सरकारला अस्थिर करत होता. आता फक्त राज्याला नाही तर देशाला अस्थिर करण्याचे काम हा आत्मा करत आहे, अशी टीका मोदींनी शरद पवारांचे नाव न घेता केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ते बोलत होते.

पंतप्रधान मोदींची सभा वानवडी येथील रेसकोर्स मैदानावर झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, सुनेत्रा पवार, श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव पाटील त्याचबरोबर मंत्री चंद्रकांत पाटील, निलम गो-हे, मनसेचे अमित ठाकरे, हर्षवर्धन पाटील आणि इतर नेते उपस्थित होते.

गेल्या साठ वर्षात काँग्रेसने देशातील नागरिकांना मुलभूत सुविधाही दिल्या नव्हत्या. पण आम्ही दहा वर्षांत देशातील नागरिकांना मुलभूत सुविधा दिल्या. देशात लवकरच बुलेट ट्रेन सुरू होणार आहे. केवळ दहा वर्षांत सव्वा लाखांपेक्षा जास्त स्टार्ट अप सुरू केले आहेत. यातील अनेक स्टार्ट अप पुण्यातील आहेत. देशात नवीनता वाढविण्यासाठी मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. दहा वर्षांपूर्वी भारतात मोबाईलची आयात केली जात होती. पण आता आपण देशातील दुसऱ्या क्रमांकाचे निर्यातदार झालो आहोत. भारताला सेमीकंडक्टर, इनोव्हेशन, एनर्जी हब बनवायचे आहे, अस पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पुणे तिथे काय उणे म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरूवात केली. पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, देशात संशोधन करणाऱ्यांसाठी १ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षात देशातील महागाई नियंत्रणात आणली. भारत आज देशात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. देशातील सत्तर वर्षांवरील नागरिकांवर मोफत उपचार केले जाणार. तसेच औषधेही सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सरकारने सर्वसामान्यांसाठी देशातील बँकांचे दरवाजे उघडले. पथारी व्यावसायिक तसेच छोट्या व्यावसायिकांना कर्जांचे वाटप करण्यात आल्याचा दावा मोदींनी केला.

धर्माच्या आधारावर आरक्षण लागू होऊ देणार नाही

विरोधक धर्माचे राजकारण करत आहेत. काँग्रेसने नेहमीच सविंधानाचा अपमान केला. सविंधान दिवस साजरा करण्यास काँग्रेसचा विरोध होता. काँग्रेसचा देशातील गरिबांच्या संपत्तीवर डोळा आहे. इंडिया आघाडी धर्माच्या आधारावर देशात फूट पाडत आहे. ज्यांना सविंधानाच्या आधारे आरक्षण मिळाले आहे त्यांचे आरक्षण काढून मुसलमानांना आरक्षण देणार आहे असं म्हणाले. याचा प्रत्यय कर्नाटकात आला आहे. देशात मी कधीही धर्माच्या आधारावर आरक्षण लागू होऊ देणार नाही.

विश्वास आणि विकासाचे दुसरे नाव म्हणजे मोदी

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, प्राण जाये पर वचन ना जाये, असं पंतप्रधान मोदींचे वागणे आहे. मोदी जे बोलतात ते करून दाखवतात. मोदींनी देशवासियांना दिलेले शब्द पूर्ण करून दाखवला. कलम ३७० तसेच राम मंदिराचा मुद्दा त्यांनी सोडविला. दुसरीकडे काँग्रेसने साठ वर्ष देश बुडविला होता. काँग्रेसच्या काळात बॉम्बस्फोट, भ्रष्टाचार होत होता, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. २०१४ नंतर देशात शांतता नांदली. त्यानंतर सत्तेवर आलेल्या मोदींनी देशाचा गौरव वाढविला. विश्वास आणि विकासाचे दुसरे नाव म्हणजे मोदी आहे, असेही ते म्हणाले.

लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये प्रवास

६० वर्षांपर्यंत राज्य केले, पण देशातील अर्ध्या जनतेला मूलभूत सुविधाही देऊ शकले नाही. आम्हाला फक्त १० वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली. या दहा वर्षांत मूलभूत सुविधांसोबत जनतेच्या आकांक्षाही पूर्ण केल्या आहेत. गावागावात चांगले रस्ते मूलभूत सुविधा पाहून चांगलं वाटतं की नाही. पुणे मेट्रो पाहा, पुणे विमानतळ पाहा, समृद्धी महामार्ग पाहा, हे आधुनिक भारताचं चित्र आहे. महाराष्ट्राच्या जनतेला ही मोदीची गँरेंटी आहे की, तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये प्रवास कराल, असं आश्वासन मोदींनी दिलं आहे.

येत्या काळात पुणे ऑटोमोबाईल हब बनेल

२०१४ आधी भारत मोबाईल आयात करायचा. मोदी सरकार आल्यानंतर भारत आता मोबाईल निर्यात करतो. मेड इन इंडिया चिपही जगभरात निर्यात केली जाणार आहे. देशाला तरुणी पिढीवर विश्वास आहे. भारताच्या तंत्रज्ञानावर विश्वास आहे. पुण्यातील तरुण बुद्धीमान आहे, येत्या काळात पुणे ऑटोमोबाईल हब बनेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.

साताऱ्याची भूमी ही शौर्याची भूमी

सातारा: २०१३ मध्ये जेव्हा भाजपने माझी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषणा केली तेव्हा मी सगळ्यात अगोदर रायगडावर आलो. तेव्हा तर निवडणुकाही नव्हत्या. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक झालो. कोणतंही काम करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा ऊर्जादायी ठरते. तेव्हा रायगडावरुन घेतलेल्या ऊर्जेवर मागची दहा वर्षे मी देशासाठी काम करत आहे. साताऱ्याची भूमी ही शौर्याची भूमी आहे. देशसेवेसाठी सैनिक देणारी भूमी आहे.” असं म्हणत मोदींनी सैनिकांसाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा वाचला.

तर देशाची फाळणी होईल

सोलापूर : भ्रष्टाचार आणि दहशतवादाच्या नावाने कलंकित इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या काँग्रेसने इंडिया आघाडीच्या माध्यमातून पुन्हा सत्तेचे स्वप्न पाहात आहे. काँग्रेसला पुन्हा सत्तेची मलाई खायची आहे. त्यासाठी त्यांची पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याची तयारी आहे. त्यांच्या हाती एवढ्या मोठ्या देशाची सत्ता सोपविल्यास देशात पुन्हा भ्रष्टाचार आणि दहशतवाद होऊन देशाची फाळणी होईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची होम मैदानावर जाहिर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -