Saturday, April 27, 2024
Homeसाप्ताहिककोलाजस्वागत : दिवाळी अंकांचे

स्वागत : दिवाळी अंकांचे

मृणालिनी कुलकर्णी

महाराष्ट्राच्या दिवाळीचा एक वेगळा पैलू : मराठी दिवाळी अंक! आपल्या साहित्य संस्कृतीची ती एक विशेष खूण. ११० वर्षांपासून पिढीपिढीतून चालत आलेला हा दिवाळी अंकांचा वारसा; कोरोनासहित अनेक चढ-उतार आले, तरी संपादक, प्रकाशकांनी दिवाळी अंकांच्या परंपरेत खंड पडू दिला नाही. सणाला साहित्याची जोड असणारा दिवाळी हा एकमेव सण! दिवाळी! प्रकाशाचा सण! पणती, आकाशकंदील, फराळासोबत अक्षर साहित्यिक फराळाचा दिवाळी अंक टेबलावर हवाच. चार दिवसांचा दिवाळीचा प्रकाश, दिवाळी अंकांच्या रूपाने सहा महिने राहतो. मराठी कुटुंबात दिवाळी अंक वाचन-संस्कृतीची परंपरा आजही काही अंशी चालू आहे. दिवाळी अंकांचा आयाम मोठा असल्याने छपाईच्या आर्थिक व्यवहाराची उलाढालही मोठी होती. प्रकाशक-लेखकांना दिवाळी अंक ही मोठी पर्वणी होती.

अरुणा ढेरे यांच्या मते एकेकाळी वाचकांनाही झिंग यावी अशा अंकांची निर्मिती होत असे. अनेक लेखक आपले उत्कृष्ट लेखन दिवाळी अंकांसाठी राखून ठेवायचे. दिवाळी अंक, त्यातील लेखन, लेखक यावर वाचकांत संवाद, अंकाची देवघेव होत होती. दिवाळी अंकांनी समाज समृद्ध झाला. वाचकांना वाङ्मयीन दृष्टी मिळाली. लोक विचारशील झाले.

जाहिरातीचे माध्यम असलेल्या दिवाळी अंकांना आज जाहिराती मिळत नाहीत. कागद महागला. तरुणांचा वाढता कामाचा व्याप, मोबाइलचे अतिक्रमण, मास मीडियाचे आकर्षण, इंग्रजी माध्यमामुळे बालवाचक दुर्लभ, इत्यादींमुळे वाचक घटला. वाढत्या किमतीने विक्रीत घट, प्रकाशकाच्या खर्चाचे गणितच बिघडले. तरीही काही संपादक नेटाने टक्कर देत, दिवाळी अंकांच्या आजही ३० ते ४०% प्रति उपलब्ध करीत आहेत.

बदलत्या काळानुसार, अभिरुचीनुसार, तंत्रज्ञानाशी मैत्री करून ऑडिओ व्हिज्युअल अंक, दिवाळी अंकांचा वारसा जपत आहेत. आज हॉटेल, चित्रपट, इतर खरेदीत आपण हजारो रुपये खर्च करतो, तर मराठी भाषा, दिवाळी अंकांची संस्कृती टिकावी यासाठी एक दिवाळी अंक खरेदी करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, तुमच्याकडे दोन रुपये असतील, तर एक रुपया पोटाला आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. दिवाळी अंकांची जागरूकता हरवली असेल, तर ती निर्माण व्हावी त्यासाठी हा लेख लििहताना एका वितरकाशी, संपादकांशी, चिंचपोकळी आणि चिंचवड येथील समर्थ आणि धर्मगंगा ग्रंथालय आणि वाचकांशी संवाद साधला.

आजही ७०/८० वर्षे हंस, आवाज, वसंत हे दिवाळी अंक आपले सातत्य, दर्जा टिकवून आहेत. त्यांना आधार मिळायला हवा. ग्रंथालय टिकली, तर मासिके वाचकांपर्यंत पोहोचणार. ठरावीक अंक वगळता, इतर अंक वाचकांपर्यंत पोहोचतच नाहीत. दिवाळी अंकांची शतकोत्तर परंपरा टिकावी, चांगले विषय, अंक वाचकांकडे पोहोचण्यासाठी वृत्तपत्रांनीही इतर सणाप्रमाणे जादा पुरवणी काढावी. मराठी संस्कृतिक खात्यानेही विचार करावा. गेली अनेक वर्षे मराठी भाषा, मराठी माणसांसाठी… असे ऐकते तर कागदाला सवलत द्या. आज दिवाळी अंकाला धक्का बसला आहे तरी दिवाळी अंकाची परंपरा,संस्कृती संपलेली नाही. वाचक म्हणूनच मी ही व्यथा मांडत आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा भाग समजल्या जाणाऱ्या दिवाळी अंकाची सुरुवात १९०५ मध्ये साहित्याला वाहिलेला दिवाळीप्रीत्यर्थ ‘मित्रोदय’ आणि ‘आनंद’ या दोन अंकांनंतर १९०९ मध्ये काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी ‘मनोरंजन’ हा पहिला दिवाळी अंक काढला. त्यात बालकवीची आनंदी आनंद गडे ही कविता आणि महाराष्ट्रातील तत्कालीन वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांची छायाचित्रे होती. जे आजही वाचक पसंत करतात. त्यानंतर ‘वधु-वरांच्या लग्नाची वयोमर्यादा’ यावर विद्वानांचा परिसंवाद, नंतरच्या व्यक्ती विशेषांकात नामवंतांचा छायाचित्रांसह त्यांच्या कार्याचा अभ्यास, सचित्र वाचनीय असे मृत्युलेख, अशा अनेक परंपरेचा पायंडा मनोरंजन मासिकांनी घातला. तो वारसा आजही चालू आहे.

मधल्या काळात दिवाळीच्या एकाच अंकात कथा, कविता, कांदबरी, रेसिपी, भविष्य असे ते मर्यादित स्वरूपाचे सारे साहित्य होते. त्यानंतर जीवनाशी निगडित, चाकोरी सोडून अनेक क्षेत्राशी, विविध विषयांची लोकांची आवड लक्षात घेऊन दिवाळी अंक निघू लागले. एप्रिल, मेपासून अंकाच्या बांधणीला सुरुवात होते. दिवाळीच्या सुमारास मागे-पुढे पाक्षिक, साप्ताहिकासोबत अनेक वृत्तपत्रांचेही वार्षिक अंकही बाहेर येतात. प्रत्येक दिवाळी अंकाचा साचा वेगळा. नावावरूनच त्या त्या दिवाळी अंकाची विशेषतः कळते.

दीर्घ कथा-साधना, पाककृती-अन्नपूर्णा, आरोग्य-शतायुषी, क्रीडा-षटकार, महिलांसाठी – माहेर – अनुराधा – सुवासिनी – स्त्री; बाल साहित्य – चांदोबा, किशोर, वयम. काही अंक दरवर्षी एखादा विषय ठरवून नियोजन करतात. तेव्हा तो एक संदर्भग्रंथ तयार होतो. थोडक्यात वाचकाला स्वतःच्या आवडीनुसार अंक निवडणे सोपे जाते. दिवाळी अंक म्हणजे आपले सांस्कृतिक संचित. – मौज, हंस, सत्यकथा, दीपावली, पद्मगंधा, अंतर्नाद, जत्रा, आवाज, मोहिनी, नवल, अमृत, ग्रंथजगत, वृत्तपत्रांचे अंक, कालनिर्णय, ऋतुरंग, अनुवादित अंकाबरोबरच महिला, आरोग्य, भविष्य, पाककृती, कथा, अद्भुत कथा, पोलिसांचे दक्षता, या अंकांना मागणी आहे. सध्याच्या अंकात विनोदी आणि बाल साहित्य दिसून येत नाही, ही खंत वाचकांनी बोलून दाखवली.

वाचकांशी संवाद

१. आज दिवाळी अंकाच्या संख्येत लक्षणीय वाढ आहे. विशिष्ट वयोगटाकडून मागणीही आहे. तरीही सखोल वाचन कमी.
२. प्रतिवर्षी नवे अंक दिसतात, जुने दोन-चार लुप्त होतात. विषयात वैविध्य आहे. लिहिणारे खूप आहेत तरीही सर्वंकष लेखन शोधावे लागेल. अंक चाळून बाजूला होतो.
३. असे ऐकले – गुलजार यांनी सुचविल्यानुसार ऋतुरंगमधील लेखातून ‘नापास मुलाचे प्रगतिपुस्तक’ तयार झाले.
४. आमच्या महाराष्ट्रीय सोसायटीत एक वर्ष सोसायटीच्या पैशातून दिवाळी अंक घेतले. गच्चीवर प्रत्येकजण एकेका अंकावर बोलले.
५. मी (मुलगी) आईला अनेक वर्षं दिवाळी अंकाचा सेट भेट देते.
६. व्यक्ती विशेषांकात, धोंडो केशव कर्वे यांचे संतती नियमन कार्य वाचल्यावर, कळत्या वयापासून निर्माण झालेली मदतीची भावना मी आजतागायत (७८ वर्षे)जोपासत आहे.
७. ‘एकटेपणा’ या विषयावरचा थिंक पॉझिटिव्ह हा अंक आजही लक्षात आहे.
८. दिवाळी अंकांमुळे लेखनातील वैविध्य लक्षात आले. अंकाचे संपादन व संकलन यातील फरक कळाला.
९. पर्यटनावर (विश्वभ्रमंती २०१२ ते २०१९) दिवाळी अंक काढावा, या वसंत सहस्त्रबुद्धे यांच्या (वय ८५) मूळ कल्पनेला, मित्र डॉ. सुनील कवठे यांनी एक ऑपरेशन कमी केले असे समजून सर्व आर्थिक भार उचलून उमेद वाढवली. वाचकहो, दिवाळी अंकाचे वैभव जोपासण्याचा माझा हा प्रयत्न.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -