Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरवसई-विरार मनपा आयुक्त - प्रशासक डी. गंगाथरन यांची बदली?

वसई-विरार मनपा आयुक्त – प्रशासक डी. गंगाथरन यांची बदली?

पालघर (प्रतिनिधी) :वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासक – आयुक्त डी. गंगाथरन यांची मंत्रालयात बदली झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यांच्या बदलीच्या वावड्या यापूर्वी अनेकदा उठल्या होत्या. त्यामुळे या वृत्ताबद्दल सर्वत्र साशंकता व्यक्त होत आहे. पण खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सिडकोचे वरिष्ठ अधिकारी अनिल पवार यांची वर्णी लागली आहे.

डी. गंगाथरन यांनी २०२०च्या प्रारंभी वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतली होती. त्याच सुमारास क्षेत्रामध्ये कोविड-१९चा प्रादुर्भाव सुरू झाला व संपूर्ण यंत्रणा त्यांच्या नेतृत्वाखाली कामाला लागली; परंतु अल्पावधीतच ते व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये विविध विकासकामांवरून बेबनाव निर्माण होत गेला. जून २०२० मध्ये महानगरपालिकेची मुदत संपली व राज्य सरकारने त्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर मात्र माजी नगरसेवक व प्रशासक या दोघांमध्ये अनेकदा ‘तू तू मैं मैं’ सुरू झाले. प्रशासक, शिवसेनेचे हस्तक म्हणून वावरू लागल्याचा थेट आरोप माजी नगरसेवकांनी त्यांच्यावर केला. त्यांच्या अशा वागण्यामुळे अधिकारी व कर्मचारीही बिथरले. त्याचा परिणाम मनपाच्या कामकाजावर होत गेला. त्याच सुमारास त्यांनी आपल्या निवासस्थानात अनधिकृत बांधकाम केल्याचा त्यांच्यावर आरोप झाला व प्रकरण न्यायालयात गेले.

मनसेने त्यांच्याविरोधात अनेकदा आंदोलने छेडली. ते शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार, पालकमंत्री व शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी वगळता इतर कोणालाही भेटत नसत. या काळात त्यांच्यावर अनेक आरोप झाले. त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या वागण्यात बदल केला व त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांशी मिळतेजुळते घेतले.

दरम्यान त्यांची बदली झाल्याच्या अफवा सतत उठत होत्या. कालांतराने त्या थांबल्या. आता त्यांची मंत्रालयात बदली झाल्याचे खात्रीलायक वृत्त असून त्यांच्या जागी सिडकोचे अनिल पवार यांची वर्णी लागल्याचे कळते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -