Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखअद्वितीय जनसंवादक, विक्रमी दस्तावेज!

अद्वितीय जनसंवादक, विक्रमी दस्तावेज!

  • चंद्रशेखर बावनकुळे : प्रदेशाध्यक्ष, भाजप, महाराष्ट्र

तल्लख वक्तृत्व हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या अद्वितीय क्षमतेचे एक उदाहरण आहे. ते ज्या उत्कटतेने, आपुलकीने व तन्मयतेने जनतेशी संवाद साधतात ते बिनतोड आहे. म्हणूनच भारतीयांच्या मनात त्यांच्याविषयी जगावेगळे विश्वासार्ह नाते निर्माण झाले आहे. याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक म्हणजे मोदीजींमध्ये अलौकिक प्रतिभेचा आणि प्रामाणिकतेचा मिलाफ आहे व ‘सत्यम, शिवम, सुंदरतेची’ जाण आहे. तत्त्व आहे आणि विरळी तार्किक्ताही!! संवाद मनातून असेल तरच मानसिक व सामाजिक क्रांती घडू शकते. याच स्नेहबंधामुळेच ‘मन की बात’ हा मोदीजींचा संवादी कार्यक्रम जगाच्या इतिहास आणि वर्तमानातील एक विक्रमी दस्तावेज ठरला आहे.

असे एकही क्षेत्र नसेल अथवा असा एकही विषय नाही की ज्याबाबत मोदीजींनी जनतेशी संवाद साधला नसावा. केवळ सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक मुद्द्यांवरच नव्हे तर, हवामान बदल, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा संकट, अवकाश, जल विविधतेचे भारतीय उत्सव आणि जगण्याचे भान यांसारख्या आव्हानात्मक समस्यांवरही त्यांचे शब्द प्रेरणा देतात आणि सक्रियही करतात. विशेष म्हणजे, हा संवाद साधताना ते कधीच पंतप्रधान वाटत नाहीत; ते काळजी घेणारे, मार्गदर्शन करणारे कुटुंबप्रमुख वाटतात. त्यांच्या कथनात गोडवा असतो. त्यांनी संवादादरम्यान जी उदाहरणे दिली तीसुद्धा मनाचा ठाव घेणारी आहेत.

आविष्कारातील सातत्य
‘मन की बात’चा पहिला भाग ३ ऑक्टोबर २०१४ रोजी प्रसारित झाला होता. तो आता, ३० एप्रिल २०२३ रोजी १०० वा भाग पूर्ण झाला. हा पल्ला गाठणे व तो यशस्वी करणे जगावेगळा पराक्रम आहे. नियोजन, मांडणी आणि अंमलबजावणी यातील अनेक दुवे अभिनंदनास पात्र आहेत. २६२ रेडिओ स्टेशन्स आणि ३७५ हून अधिक खासगी व सामुदायिक रेडिओ स्टेशनसह ‘ऑल इंडिया रेडिओ’द्वारे मा. मोदीजी सामाजिक-आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समाजापर्यंत पोहोचतात. मन की बात हा भारतातील पहिला व्हर्च्युअली समृद्ध रेडिओ कार्यक्रम आहे, जो टीव्ही चॅनेलद्वारे एकाच वेळी प्रसारित केला जातो. दूरदर्शन नेटवर्कच्या ३४ चॅनेल्स आणि १०० हून अधिक खासगी उपग्रह टीव्ही चॅनेल्स हा कार्यक्रम देशभरात प्रसारित करतात.

ऋणानुबंधाची साखळी
या कार्यक्रमाची रूपरेषा बघितली की, हा रेडिओ कार्यक्रम नाहीच तर ती ऋणानुबंधाची साखळी असल्याचे जाणवते. पंतप्रधान जनतेने पाठविलेल्या पत्राचे वाचन करतात, ते टेलिफोनवरून जनतेशी बोलतात. ही संवादशैली जनतेसाठी अविस्मरणीय ठरते. लोकशाही, सरकार व प्रशासनावरील विश्वास अधिक वाढविते. भूतकाळाचे अवलोकन आपल्याला वर्तमान आणि भविष्यासाठी सज्ज राहण्याची प्रेरणा देत असते. या संवादात आपलेपणा असतो. काळाचे, स्थितीचे भान राखले जाते.
मला मोदीजींच्या या काळातील अनेक गोष्टी भावून गेल्या. त्यांनी गेल्या वर्षीच्या शेवटी सरणाऱ्या २०२२ या वर्षाचे अनोख्या पद्धतीने आभार मानले. २०२२ या वर्षातील चौफेर यशाने आज जगभरात भारतासाठी एक विशेष स्थान निर्माण केले आहे. भारताने जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून प्राप्त केलेला दर्जा मिळवला. भारताने २२० कोटी लसीकरणाचा अविश्वसनीय टप्पा ओलांडण्याचा विक्रम केला. प्रत्येक नागरिकाने ‘आत्मनिर्भर भारत’ हा संकल्प स्वीकारण्याला गती दिली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो किंवा महिला हॉकी संघाचा विजय असो, आपल्या तरुणाईने प्रचंड सामर्थ्य दाखवले, ते गेल्या वर्षी आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला तो म्हणजे, जी २०चे अध्यक्षपद भारताला मिळाले. हे सगळे सांगून त्यांनी २०२३ च्या संकल्पनांची पायाभरणी केली. देशाला जागे राहण्याचा विश्वास दिला. याच भावनेने भारताला २०२५ पर्यंत टीबीमुक्त करण्याचा संकल्प केला.

डिजिटल अर्थव्यवस्थेचे सकारात्मक रूप
मोदीजींचा एक आणखी मुद्दा स्पर्शून गेला तो म्हणजे, यूपीआयचा वापर फक्त दिल्लीतच नव्हे तर ग्रामीण भागातही वाढला आहे हे पटवून देण्याचा. याचा परिणाम असा झाला की, यूपीआय ही भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि सवयींचा भाग होऊ शकला. डिजिटल अर्थव्यवस्थेमधूनही देशात एक वेगळी संस्कृती आकार घेऊ लागली. डिजिटल वापराबाबतचे सर्वसामान्य नागरिकांत असलेले भय निघून गेले. गल्लीबोळातल्या छोट्या दुकानांमध्ये डिजिटल पेमेंटमुळे अधिकाधिक ग्राहकांना सेवा देणे सोपे झाले आहे. आता त्यांना सुट्ट्या पैशाचीही समस्या राहिली नाही. रोजच्या जगण्यात तुम्हाला सुद्धा यूपीआयची सोय जाणवली असेल. कुठेही जा, रोख पैसे बाळगण्याचा, त्यासाठी बँकेत जाण्याचा, एटीएम शोधण्याचा त्रास संपला आहे. मोबाइलवरूनच सगळे व्यवहार केले जातात; परंतु या लहान-सहान ऑनलाइन पेमेंटमुळे देशात किती मोठी डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? आजघडीला आपल्या देशात दररोज सुमारे ३५ ते ४० हजार कोटी रुपयांचे व्यवहार होत आहेत. यामुळे देशात सुविधा वाढत असून, प्रामाणिकपणाचे वातावरणही निर्माण होते आहे. भारताच्या अर्थव्यवहारात आलेली ही क्रांती आहे. मोदीजींनी ही क्रांती आणण्यासाठी जनतेला विश्वासात घेतले. त्यांना या पद्धतीचे महत्त्व पटवून दिले. सामान्य लोकं, युवक आणि दुकानदार अथवा मोठ्या बँका आता किती नीटपणे व सुरक्षित व्यवहार करू शकतात, याची उदाहरणे सांगितली. संबंधित व्यक्तीशी थेट संवाद साधून तिला जनतेसमोर बोलते केले. अवयवदान चळवळ याच पद्धतीने उभी झाली. ‘मन की बात’मधून अनेक चळवळी व मोहिमा साकारल्या, हे यश मोठे आणि चिरकाल टिकणारे आहे.

राहणीमानात झाली सुधारणा
अलीकडे मन की बातसंदर्भात पाहणी अहवाल बघण्यात आला. त्यातून देशाच्या सकारात्मक सृजनतेची कल्पना येते. देशातील ७७% लोकं देश प्रगती करत आहे या भावनेने आशावादी आहेत. या संवादी कार्यक्रमाचा मनावर परिणाम झाला. ५८% श्रोत्यांनी त्यांच्या राहणीमानात सुधारणा झाल्याचे म्हटले. सरकार आणि जनता यांच्यातील नातेसंबंध सकारात्मक झाल्याचे मत ६३% लोकांनी मांडले. देशहिताचा विचार मोठा झाला. ६०% लोक म्हणतात, राष्ट्र उभारणीसाठी काम करण्यास त्याची तयारी आहे. १९ ते ३४ वयोगटातील ६२ % लोकांनी हा कार्यक्रम टीव्हीवर पाहतात. हे सगळे भारतात घडू शकते आणि तेही भारताचा अमृतकाळ सुरू असताना. ही भावनाच आनंद देणारी, अद्भुत आणि अचंबित करणारी आहे. हा देश आत्मनिर्भर तर होतोच आहे, यासोबतच नवभारताकडे जलद वाटचाल करत आहे, हेच या शताब्दी मन की बातचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचे लोकसंवादाचा एक अद्वितीय जनसंवादक जनतेने अनुभविला आणि मन की बात म्हणूनच विक्रमी दस्तावेजही ठरला. जो, पुढे अनेक शतके भारतीय प्रेरणा, प्रगती, विस्ताराचा मार्गदर्शक ठरेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -