Friday, May 10, 2024
Homeक्रीडाIPL 2024पंजाबचा चेन्नईवर रोमांचक विजय

पंजाबचा चेन्नईवर रोमांचक विजय

शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक सरशी

चेन्नई (वृत्तसंस्था) : गोलंदाजांच्या अपयशानंतरही उत्कृष्ट फलंदाजीच्या बळावर बाजी मारता येतो याचा वस्तुपाठ पंजाबने रविवारी घालून दिला. प्रभसिमरन सिंग, लिअम लिव्हिंगस्टोन यांच्या झंझावाताला सिकंदर रझाच्या निर्णायक फटक्याची किनार मिळाली आणि पंजाबने चेन्नईवर ४ विकेट राखून चेन्नईतच रोमहर्षक विजय मिळवला. पराभवामुळे डेवॉन कॉनवेची नाबाद ९२ धावांची एकहाती खेळी व्यर्थ गेली.

चेन्नई सुपर किंग्जने दिलेल्या २०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग यांनी अपेक्षित सुरुवात करून दिली. दोघांनीही मोठ्या फटक्यांची आतषबाजी करत पाचव्या षटकातच पंजाब किंग्जला अर्धशतक झळकावून दिले. ही जोडी चांगली सेट झाली. त्यामुळे पंजाबला दमदार सुरुवात मिळाली. तुषार देशपांडेने शिखर धवनचा अडथळा दूर करत चेन्नईला पहिला बळी मिळवून दिला. धवनने २८ धावांचे योगदान दिले. प्रभसिमरन सिंग आणि अथर्व तायडे ही जोडगोळी सेट होत होती. इथे जडेजा चेन्नईच्या मदतीला आला. धोनीने जडेजाच्या गोलंदाजीवर प्रभसिमरनला स्टम्पिंग आऊट करत पंजाबला दुसरा धक्का दिला. प्रभसिमरनने ४२ धावा केल्या. त्यानंतर अथर्व तायडेही फार काळ थांबला नाही. लिअम लिव्हिंगस्टोनने फलंदाजीची सूत्रे हाती घेत चेन्नईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याने २४ चेंडूंत ४० धावा तडकावल्या. सॅम करनच्या २९ धावांची त्याला चांगली साथ मिळाली. जितेश शर्माने १० चेंडूंत २१ धावा फटकावत पंजाबला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. अत्यंत रोमांचक अशा या सामन्यात पंजाबला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ३ धावांची आवश्यकता होती. सिकंदर रझाने शेवटच्या चेंडूवर तीन धावा घेत पंजाबला विजयी केले.

डेवॉन कॉनवेच्या दमदार खेलीच्या जोरावर चेन्नईने निर्धारित २० षटकांत चार विकेटच्या मोबदल्यात २०० धावांपर्यंत मजल मारली. कॉनवेने ५२ चेंडूंत नाबाद ९२ धावांची खेळी केली. कॉनवेच्या फटकेबाजीला रुतुराज गायकवाडने ३७, तर शिवम दुबेने २८ धावांची जोड दिली. त्यामुळे चेन्नईला द्विशतक झळकवता आले. चेन्नईला सुरुवात मनाजोगती मिळाली. कॉनवे आणि रुतुराज जोडीने ८६ धावांची सलामी दिल्याने चेन्नईला चांगली सुरुवात मिळाली. दुबेनेही कॉनवेला छान साथ दिल्याने चेन्नईला धावांची गती वाढविण्यात यश आले. दुबे बाद झाल्यानंतर मोईन अलीने १०, रवींद्र जडेजाने १२ आणि महेंद्रसिंह धोनीने नाबाद १३ धावांची भर घातली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -