Tuesday, April 30, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सआई - मुलींमध्ये मैत्रीचं नातं असावं

आई – मुलींमध्ये मैत्रीचं नातं असावं

टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल

सोनाली खरेचा ‘माय लेक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये खऱ्या जीवनातील आई व मुलीने पडद्यावर आई व मुलीची भूमिका साकारली आहे. दुसरं म्हणजे सोनालीने या चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. सोनाली खरेचा जन्म गुहागरचा. तिचं शालेय शिक्षण डोबवलीत झालं. तिचं कॉलेजचं शिक्षण सोमैया कॉलेज, केळकर कॉलेज येथे झालं. तिचं सायकॉलॉजीमध्ये पदवीपर्यंत शिक्षण झालं. शरण बिराजदार तेव्हा दूरदर्शनवर कार्यरत होते, सोनालीची आई तेव्हा तिथे कार्यरत होती, त्यांना दूरदर्शनवरील एका मालिकेमध्ये पासिंग शॉटसाठी एक मुलगी हवी होती जी नायकाच्या स्वप्नामध्ये येते. त्यांनी त्या वेळेला सोनालीची निवड केली. संजय गढवी दिग्दर्शित ‘तेरे लिये’ हा तिचा पहिला चित्रपट होता. हा तिच्या जीवनातला टर्निंग पॉईंट ठरला.

‘तेरे लिये’ या चित्रपटाचे गाणे खूप गाजले. या चित्रपटांमध्ये तीन जोड्या होत्या, यामध्ये सोनालीची भूमिका ड्रमरची होती, तिला टॉम बाय लूक होता. या चित्रपटाची गाणी अब्बास टायरवाला यांनी लिहिली होती आणि या चित्रपटाला संगीत प्रीतम यांनी दिले होते. या चित्रपटानंतर तिने बंदिनी, आभाळमाया, दामिनी, किमयागार या मालिका केल्या, त्यानंतर तिची अभिनयाची गाडी वेगाने धावत सुटली. चेकमेट, सावरखेड एक गाव अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने अभिनयाची मोहोर उमटवली आहे.

सोनालीचा ‘मायलेक’ चित्रपट येत आहे. या चित्रपटाची सुरुवात कशी झाली असे विचारले असता ती म्हणाली की, या चित्रपटाच्या दिग्दर्शिका प्रियांका तन्वर या चित्रपटाची कथा घेऊन माझ्याकडे आल्या होत्या, त्या चित्रपटाचे कथानक मला खूप आवडले आणि त्या कथानाकाशी मी जोडले गेले. त्या मला म्हणाल्या या चित्रपटांमध्ये मला तुझ्या मुलीनेच काम करावेसे वाटते; परंतु मी त्यांना म्हणाले की, माझ्या मुलीने या अगोदर कुठेही काम केलेले नाही, तर त्या म्हणाल्या तू घाबरू नकोस ते तू माझ्यावर सोड, त्यानंतर या चित्रपटाची निर्मिती करण्याचे मी ठरविले. या चित्रपटाच्या शूटिंगच्या अगोदर वर्कशॉप घेण्यात आले होते. या चित्रपटांमध्ये माझ्या मुलीचे नाव आहे माहेरा आणि माझं नाव आहे शर्वरी. या चित्रपटातील तिचे काम खरोखरच खूप छान झालेले आहे. ती प्रथमच काम करीत आहे असे वाटत नाही.

या चित्रपटातील तिच्या भूमिकेविषयी विचारले असता ती म्हणाली की, या चित्रपटामध्ये माझ्या व्यक्तिरेखेचे नाव शर्वरी आहे. माझ्या मुलीचं नाव मायरा आहे. मी लंडनमध्ये कार्यरत असते. मला महाराष्ट्रीय हॉटेल उघडायचं असतं आणि माझ्या मुलीला ऍथलिट व्हायचं असतं. आमच्यात खूप चांगलं मैत्रीचं नात असतं. आम्ही दोघेही आपापले स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामध्ये कधी आमच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो, आम्ही एकमेकांपासून दुरावतो. त्या संघर्षातून आम्ही कसं बाहेर पडतो, हे सार तुम्हाला या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल. या चित्रपटाच्या दिग्दर्शिका प्रियांका तन्वर यांच्यासोबत सोनालीने अगोदर ‘वेल्डन बेबी’ हा मराठी चित्रपट केला होता. त्यामध्ये तिची पाहुण्या कलाकाराची भूमिका होती. त्यामुळे त्यांच्या काम करण्याची पद्धत सोनालीला माहिती होती. या चित्रपटामध्ये देखील त्यांच्याकडून खूप चांगला अनुभव मिळाला असं, तिचं म्हणणं आहे. या चित्रपटाचे संगीत श्रवणीय झालेले आहे. त्याला आधुनिक साज चढविला आहे. संजय मोने आणि शुभांगी लाटकर यांनी सोनालीच्या आई-वडिलांची भूमिका केलेली आहे.

संजय मोने यांनी या अगोदर ‘दामिनी ‘मालिकेमध्ये सोनालीच्या वडिलांची भूमिका केली होती, त्यामुळे त्यांच्यासोबत तिचा खूप चांगला रेपो तयार झाला होता. शुभांगी लाटकर सोबत प्रथमच तिने काम केले होते, असे असले तरी त्यांच्यासोबत काम करण्याचा तिला चांगला अनुभव प्राप्त झाला. लंडन येथे काम करण्याचा त्यांचा अनुभव खूपच चांगला होता. तिथे कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही आणि एकूणच २२ दिवसांत त्यांनी ही फिल्म कम्प्लीट केली. ‘माय लेक’ हा चित्रपट प्रेक्षकांनी थिएटरमध्ये येऊन पहावा असं आवर्जून तिने म्हटले आहे, कारण आई व मुलगी याच्यातील मैत्रीचं नातं, एक वेगळाच विषय यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाला कसा प्रतिसाद देतील हे लवकरच कळेल. सोनालीला या चित्रपटासाठी व तिच्या भावी आयुष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -