Monday, May 27, 2024
Homeताज्या घडामोडीसंपूर्ण जग आज भारताकडे एक उज्वल स्थान म्हणून बघत आहे : पीयूष...

संपूर्ण जग आज भारताकडे एक उज्वल स्थान म्हणून बघत आहे : पीयूष गोयल

नवी दिल्‍ली : भारत आज भूतकाळातून बाहेर पडला असून, संपूर्ण जग त्याच्याकडे उज्वल स्थान म्हणून बघत आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.

सीआयआय म्हणजेच, भारतीय उद्योग महासंघाच्या नवी दिल्लीत झालेल्या २०२३ च्या सर्वसाधारण सभेत “भविष्यातील आघाडी: स्पर्धात्मकता, तंत्रज्ञान, शाश्वतता आणि आंतरराष्ट्रीयीकरण” या विषयावर ते बोलत होते. जर आपण नवोन्मेष, उत्तम दर्जा आणि लोकांचे नैपुण्य यावर योग्य भर दिला, तर देशाच्या विकासासाठी आकाशही अपुरे पडेल असे ते म्हणाले. आपल्या लोकसंख्येला शिक्षित आणि प्रबुद्ध करणे आवश्यक आहे, कारण लोकसंख्याशास्त्रीय लाभांश आणि त्याची तांत्रिक आणि व्यवस्थापकीय गुणवत्ता हा देशाचा खजिनाच आहे, असे गोयल यावेळी म्हणाले.

ग्लोबल साउथ देशांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, ‘त्यांचे नेतृत्व’ म्हणून गौरव केला आहे, भारत आज विकसनशील देशाचे जागतिक नेतृत्व म्हणून उदयाला येत आहे. जगभरातील अनेक देश आज भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्यास उत्सुक आहेत. यासंदर्भात भारताच्या, कॅनडा, ईएफटीए, इंग्लंड आणि युरोपीय महासंघ अशा सर्वांशी या कराराबाबत वाटाघाटी सुरु आहेत, अशी माहितीही गोयल यांनी दिली. यातून, जागतिक पातळीवर भारताचे वाढलेले महत्त्वच अधोरेखित होत आहे, असे त्यांनी सांगितले. हा नवा भारत आहे, जो आपल्या क्षमता आणि प्रतिभा यावर विश्वास ठेवून, त्या बळावर जगाशी चर्चा, वाटाघाटी करतो आहे.

गेल्या नऊ वर्षात, देशाची अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार, नियामक आणि सर्वसामान्य लोकांनी योग्य दिशेने यशस्वी प्रवास केला आहे, असे गोयल म्हणाले.

आज भारत जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे, आपला चलनफुगवट्याचा दर कमी आहे, देशात भक्कम गंगाजळी आहे, असे त्यांनी सांगितले. गेल्या नऊ वर्षांच्या काळात, अल्पावधीचा काळ वगळता चलनफुगवट्याचा दर सातत्याने, 4-4.5 टक्के इतका नियंत्रणात राहिला आहे, त्या अर्थाने, हा सगळा काळ अभूतपूर्वच होता, असे म्हणावे लागेल, असेही ते म्हणाले. इतर विकसित देशातील व्याजदर आता जवळपास भारतातील व्याजदरांइतकेच आहेत, असे गोयल यांनी सांगितले.

वस्तू आणि सेवा अशा दोन्ही क्षेत्रातील निर्यात प्रत्येकी एक ट्रिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचवणे, हे आता आवाक्यातील उद्दिष्ट वाटते आहे, असेही गोयल यांनी सांगितले.

वाढीव निर्यातीमुळे भारताला आपला निर्यात कोटा वाढवण्यास आणि तूट कमी करण्यास मदत होईल, असे गोयल म्हणाले. भारतीय व्यवसाय आणि उद्योगांना आता जागतिक व्यापारात नेतृत्व प्रस्थापित करण्याची संधी आहे. व्यावसायिकांनी पुरवठा साखळीतील विश्वासार्ह भागीदार शोधले पाहिजेत, तुलनात्मक लाभांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, तंत्रज्ञान आत्मसात करून सहकार्याच्या भावनेने काम केले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -