Friday, May 10, 2024
Homeताज्या घडामोडीMHADA : गिरणी कामगार, त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीच्या म्हाडातर्फे आयोजित अभियानाला १५...

MHADA : गिरणी कामगार, त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीच्या म्हाडातर्फे आयोजित अभियानाला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ

मुंबई : बृहन्मुंबईतील ५८ बंद/आजारी गिरण्यांमधील म्हाडाकडे (MHADA) नोंदणीकृत व यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’तर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कालबद्ध विशेष अभियानाला दिनांक १५ मार्च, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

म्हाडाचा विभागीय घटक मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे गिरणी कामगार व त्यांच्या वारसांसाठी दि. १४ सप्टेंबर, २०२३ पासून राबविण्यात येत असलेल्या या विशेष अभियानाअंतर्गत अद्यापि गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकडून ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने एकूण १,०८,४९२ अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यांपैकी ८९,६४८ अर्जदार पात्र ठरले असून, उर्वरीत अर्जांची छाननी करून पात्र/अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे.

गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी गिरणीमध्ये काम केले असल्याचा पुरावा दर्शविणारी कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने सादर करता यावीत याकरिता म्हाडाच्या मुंबईतील वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्रिकेट क्लबजवळील समाज मंदिर हॉल येथे तात्पुरते स्वरूपाचे मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्यासाठी Mill workers eligibility हे मोबाइल ॲप तयार करण्यात आले असून, सदर ॲप Google Play Store वर उपलब्ध आहे. तसेच https://millworkereligibility.mhada.gov.in या संकेतस्थळावरही ऑनलाइन कागदपत्रे सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांपैकी ज्या गिरणी कामगार वारसांनी पात्रतेसंबंधीची कागदपत्रे सादर केलेली नाहीत, अशा गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने सादर करावी. सदर प्रक्रियेदरम्यान काही अडचण उद्भविल्यास मार्गदर्शनाकरिता ९७१११९४१९१ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

राज्य शासन गिरणी कामगारांच्या हक्काच्या घराविषयी अत्यंत संवेदनशील असून, त्यांना हक्काचे घर मिळवून देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचाविण्याकरिता कटिबद्ध आहे, म्हणूनच या अभियानाचा लाभ अधिकाधिक गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना घेता यावा याकरिता सदरील मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती मंडळाचे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी गुरुवारी दिली. यापूर्वी कागदपत्रे सादर केलेल्या वारसांना नव्याने कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नसल्याचे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -