Wednesday, May 8, 2024
Homeसाप्ताहिककोलाजटाळूवरचं लोणी

टाळूवरचं लोणी

क्राइम: अ‍ॅड. रिया करंजकर

विजयकुमार धनसंपत्तीने जेवढे श्रीमंत होते, तेवढेच ते मनानेही श्रीमंत होते. अडल्या-नडलेल्या गरजू व्यक्तींना अडी-अडचणीला धावून जात असत. विजय कुमार यांची मैत्री श्रीमंत लोकांबरोबर होती, पण त्याचबरोबर गरजवंतांबरोबरही होती. विजयकुमार यांना माणसातील देव असं म्हटलं तरी काय वावगं नव्हतं. त्याचा व्यवसाय उभा करणाऱ्या होतकरू तरुणांना ते आवर्जून अर्थसहाय्य करायचे. या विजयकुमार यांना तीन बहिणी व दोन भाऊ होते. पण विजयकुमार हे अविवाहित होते.

विजयकुमार आपले केस कापण्यासाठी एका सलूनमध्ये जात असत. त्यामुळे त्यांची ओळख तेथील सुरेश या व्यक्तीशी झाली. सुरेश हा त्या सलूनमध्ये एक कामगार म्हणून काम करत होता. पण, त्याचं काम विजयकुमार यांना खूप आवडायचं कारण सुरेश याचं काम एकदम व्यवस्थित होतं आणि ज्या प्रकारे त्याला सांगितलं जात होतं, त्याच प्रकारे तो केस कापायचा. त्यामुळे विजयकुमार यांनी सुरेशला सल्ला दिला की, स्वतःचे तू सलून सुरू कर. त्यावेळी सुरेशने आपल्याकडे एवढं भांडवल नाही, असं त्यांनी विजयकुमार यांना सांगितलं. त्यावेळी विजयकुमार यांनी माणुसकीच्या नात्याने सुरेश याला अर्थसाह्य करायचं ठरवलं आणि त्याला स्वतःच सलून उभं करण्यासाठी एक ठरावीक रक्कम दिली. त्यामध्ये सुरेशने आपलं नवीन सलून सुरू केलं. हळूहळू तो विजयकुमार यांची रक्कम फेडू लागला. सुरेश विजयकुमार यांना त्यांनी दिलेली रक्कम देत होता. त्यावेळी जेवढी रक्कम दिली जात होती, ती तारखेनुसार घेताना दोघांच्या सह्या त्यावर होत होत्या. त्यामुळे दोघांमध्ये एक मैत्रीपूर्ण नातं निर्माण झालेलं होतं. कारण विजयकुमार यांनाही स्वतःचं असं मूलबाळ नव्हतं कारण ते अविवाहित होते. त्यामुळे ते सुरेशलाच आपलं असं मानत होते आणि सुरेशला आतापर्यंत विजयकुमार यांनी १६ लाखपर्यंत मदत केलेली होती. त्यामध्ये १४ लाख सुरेश यांनी विजयकुमार यांना परत केलेले होते. तसं त्यांनी स्वतःच्या आणि विजयकुमार यांच्या नोंदवहीमध्ये सह्या करून घेतलेल्या होत्या.

फक्त शेवटचे दोन लाख परत करायचे शिल्लक राहिलेले होते आणि एक दिवस अचानक सुरेश यांना विजयकुमार यांचे निधन झाले अशी बातमी मिळाली. सुरेश याला या घटनेचा धक्का बसला कारण त्याला स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी विजयकुमार यांनी अर्थसाह्य केलेलं होतं. काही दिवस निघून गेल्यावर सुरेश आपल्या सहकार्यासोबत विजयकुमार यांच्या नातलगांना भेटायला गेला व त्यांच्यातील व्यवहार त्याने विजयकुमार यांच्या बहिणींना सांगितला आणि त्यांनी तशी नोंदवही त्यांना दाखवली तशीच नोंदवही विजयकुमार यांची घरी पडलेली होती. त्या दोन्ही नोंदवही यांच्या व्यवस्थित तारखा जुळून आल्या हे दिसत होतं आणि शेवटचे दोन लाख रुपये राहिलेले आहेत, असं सुरेशने सांगून ते दोन लाखांचा चेक विजयकुमार यांच्या बहिणी व त्यांचा एक भाऊ यांना दिला. पण, त्यावेळी त्यांचा एक भाऊ तिथे नव्हता. तो दोन लाखांचा चेक वटवला गेला व सुरेश याच्या अकाऊंटमधून दोन लाख रुपये विजयकुमार यांच्या बहिणींना आणि भावाला मिळाले. पण ते दोन लाख रुपये तीन बहिणी व एका भावानेच आपल्यामध्ये विभागून घेतले. ही गोष्ट त्यांच्या एका भावाला त्यांनी सांगितली नाही आणि काही दिवसांनंतर विजयकुमार यांच्या त्या भावाला समजल्यानंतर त्याने सुरेश याला आपल्या घरी बोलून घेतले. त्याने सांगितलं की, माझ्या भावाकडून तू सोळा लाख रुपये घेतलेले आहेस, ते तू मला सगळेच्या सगळे पूर्ण करायचे आहेत. याने आपल्याकडील असलेली नोंद त्यांना दाखवली तरी विजयकुमार यांचा भाऊ ऐकायला तयार नव्हता. सुरेश याने सांगितलं की, शेवटचे दोन लाख रुपये उरले होते तेही मी पूर्ण केलेले आहेत. तसाच चेक मी तुमच्या भावंडांना दिलेला आहे. तशी माझ्याकडे नोंद आहे. पण, विजयकुमार यांचा भाऊ ऐकायला तयार नव्हता, तो सरळ बोलायला लागला की, माझ्या भावाला तू एकही रुपया परत केलेला नाहीस. त्यामुळे तू १६ लाख रुपये आणि वरती व्याज मला दिले पाहिजे. सुरेश याने ही गोष्ट विजयकुमार यांच्या तीन बहिणी व एका भावाला सांगितली. ती भावंड म्हणाली की, तो आमचेही ऐकत नाही. त्याला आम्ही काय करणार? तुम्ही दोघं काय ते बघून घ्या. विजयकुमार यांच्या भावाने सुरेश याला धमकीवजा फोन करायला सुरुवात केली. तसेच जिथे सुरेश याचे सलून होते तिथे त्याने काही गुंडांना पाठवले. सुरेशच्या विरुद्ध पोलीस तक्रारही केली. पोलिसांनी सुरेशला तक्रारीनुसार बोलवलं, तेव्हा सुरेश याने आपल्याकडे असलेल्या सर्व नोंदी पोलिसांना दाखवल्या तरीही विजयकुमार यांचा भाऊ ऐकायला तयार नव्हता. माझ्या भावाला यांनी एकही रुपया दिला नाही, असं सतत तो पोलिसांना सांगत होता. माझ्या भावाने तसं मला सांगितलेलं आहे की, याच्याकडून एवढी रक्कम वसूल करायची. विजयकुमार यांचा भाऊ सुरेशलाच नाही, तर विजयकुमार यांनी ज्या ज्या व्यक्तींना मदत केली होती, त्या त्या सर्व व्यक्तींना अशाच प्रकारे त्रास देऊन माझ्या भावाने दिलेले पैसे मला परत करा, असं सांगत होता. पण, बहुतेक सगळ्या लोकांनी विजयकुमार यांनी जी मदत केलेली होती, ती परत केलेली होती. तरीही विजय कुमार यांचा भाऊ नाहक त्रास त्या लोकांना देत होता आणि त्याच्यातील एक सुरेश हा सुद्धा होता. म्हणून सुरेश याने विजयकुमार यांच्या भावाविरुद्ध पोलीस तक्रार केली तसेच पुढील कारवाईसाठी त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले.

ज्यावेळी विजयकुमार जिवंत होते, त्यावेळी हा भाऊ त्यांना ढुंकूनही बघत नव्हता. पण, आज ते गेल्यानंतर त्यांच्या टाळूवरील लोणी खायला मात्र तयार झाला होता. विजयकुमार यांनी माणुसकीने जी नाती जोडलेली होती त्याच नात्यांना विनाकारण त्रास देत होता.

(सत्य घटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -