Sunday, May 19, 2024
Homeसाप्ताहिककोलाजमाणसाची सोबत...

माणसाची सोबत…

  • प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ

बँकेच्या दारात पोहोचायला आणि शटर बंद व्हायला एकच वेळ झाली. हे नेमके माझ्याच बाबतीत का घडते, कळत नाही. मी बस स्टॉपवर जाते तेव्हा मला हवी असलेली बस सुटत असते. मला ज्या मार्गावर जायचं नसतं त्या मार्गावरच्या बस एकामागून एक येत असतात. मी ज्या दिवशी रिक्षाने जायचे ठरवते त्यादिवशी समोरून बस येतात. मी वैतागले. अर्धे शटर खाली जात असताना मी त्या सिक्युरिटी गार्डवर ओरडले,
‘अहो मला आत येऊ द्या,’ तो म्हणाला, आता बँक बंद झाली आहे. ‘उद्या या.’
मी तर शटरच्या खाली हात धरून म्हटले,
‘अहो इथे तर बँकेचे टाइमिंग सकाळी दहा ते पाच लिहिले आहे. आता दुपारचा एक वाजला आहे.’
‘मी तेच म्हणतोय की बँक बंद झाली आहे.’
‘हो पण…’
‘अहो लंच ब्रेक आहे. मग तुम्ही उद्या यायला का
सांगत आहात?’
‘मग काय करणार? मला काय माहीत तुमच्याकडे किती वेळ आहे? आता एक तासाने बँक उघडणार आहे तोपर्यंत थोडीच कोणी थांबतं?’
‘माझे फार महत्त्वाचे काम आहे.’
‘क्याय? त्यांनी चिडून चिरक्या आवाजात विचारले. लांबट चेहऱ्याच्या नाकावरचा त्याचा काळा लोंबणारा मास बोलताना मस्तपैकी गदागदा हलत होता. आता माणसाच्या मसाकडे पाहायचे की आपल्या बोलण्याकडे लक्ष ठेवायचे, या भ्रमात माझा हात शटरच्या आणखी पुढे नेला.
‘अहो ताई शटरखालचा हात काढा नाहीतर हा चिरडेल.’
‘पण माझं ऐकून तर घ्या ना…’
‘ठीक आहे बोला.’
‘माझ्या हातात सोने आहे. हे मला बँकेच्या लॉकरमध्ये टाकायचे आहे. आता हे सोने घेऊन मी परत जाऊ शकत नाही आणि बँकेच्या बाहेरही बसू शकत नाही.’ इकडे-तिकडे पाहत पुढे म्हटले,
‘तशी बसायला जागाही नाही आणि प्रशस्तही होणार नाही.’
‘हो पण मी काय करणार?’ तो वैतागून म्हणाला.
‘तुम्ही एक करू शकता काय? तुम्ही मला आत येऊ द्या. मी आपल्या नेहमीच्या कस्टमर वेटिंगरूममध्ये बसते.’
‘थांबा विचारून येतो.’
असं तो म्हणताच मी शटर खालून हात काढला आणि त्यांनी पटकन खेचून शटर बंद केले. काही तरी चूक झाल्याचे माझ्या लक्षात आले पण कदाचित बाईमाणूस (आणि शिवाय तरुण आणि सुंदर) त्यामुळे तो आज जाऊन कोणाशी तरी बोलून आला आणि त्याने शटर उघडले. त्या आवाजाने माझी विचारांची तंद्री भंगली आणि म्हणाला, ‘चला.’

मी आत गेले आणि त्याने काहीही न सांगता त्या वेटिंगरूमच्या सोफ्यावर टेकले. भर उन्हाळ्याच्या दिवसांत रिक्षातून प्रवास केल्यामुळे घामाने टपटपत होते. या पार्श्वभूमीवर मस्तपैकी एसीमध्ये विसावले. पुढचा तासभर माझ्या हातातल्या मोबाइलने मला साथ दिली. खूप दिवस राहून गेलेले व्हीडिओ पाहत राहिले आणि कर्मचाऱ्यांची सगळी लगबग डोळ्यांसमोर दिसत होती. ते गोल करून एका टेबलाभोवती माझ्यासमोरच जेवत होते. नेहमी एका विशिष्ट खुर्चीवर बसलेली माणसे मी आजमावून पाहत होते –

हा पांढरा शर्टवाला लॉकरची चावी घेऊन आपल्यासोबत येतो. हा अति उंच माणूस इथे बसतो आणि नेहमी आपले पासबुक अपडेट करून देतो. हा कॅश काऊंटरवाला. हा इथे बसतो. आपले फिक्स डिपॉझिटचे काम करून देतो. ती निळ्या साडीवाली गरज नसताना सगळ्यांना ओरडत असते वगैरे वगैरे. घरातून व्यवस्थित जेऊनच मी निघाले होते. तिथे बसून काय करणार म्हणून मी हळूहळू करत पूर्ण एक लिटर पाण्याची बाटली संपवली. त्याच्यात कसा वेळ गेला तेच कळले नाही. त्यांनी भराभर सगळे दिवे पेटवले. पंखे सुरू केले तशी मीच आत गेले. फिकट जांभळ्या रंगाचा शर्ट घातलेला तो क्लार्क मला म्हणाला, ‘या मॅडम.’

मगाशी तो इतर कोणाशी तरी अगदी जेवतानासुद्धा जोराजोराने वाद घालत होता. तेव्हाचा त्याचा आवाज आणि आताचा त्याचा आवाज यात फरक होता. हो, बसल्या-बसल्या मी निरीक्षण करत होते. तेव्हा बँकेच्या दारात एक डबा लावलेला होता आणि कोणतीही तक्रार असेल तर या डब्यात कागद टाका, असे लिहिलेले होते. मी काहीच न बोलता परत एकदा सांगितले की, मला लवकर उघडायचे आहे. त्यात मी आणलेले सोने ठेवायचे आहे. त्याने समोरच्या स्क्रीनवर पाहत माझा लॉकर नंबर चेक केला आणि एका रजिस्टरवर मला सही करायला लावली. त्याने वेळ टाकली दोन वाजून तीन मिनिटं. तो उठला. त्याने हातात चाव्यांचा गठ्ठा घेतला आणि चालू लागला. खरंतर त्याच्या बाजूलाच ती लॉकरची रूम होती पण तो आज वेगळ्याच दिशेकडे चालू लागला. मला आणि नवल वाटले. मी विचारले,
‘इकडे कुठे?’
‘आम्ही रिनोव्हेशन करतोय. म्हणून बँकने जागा बदलली आहे.’
मी काय करणार बापडी? त्याच्या मागे मागे चालत गेले. त्याने एका दाराचे कुलूप काढले. त्या खोलीमध्ये नवीन कन्स्ट्रक्शनचे काम चालू होते. मग ती संपल्यावर समोरच्या दाराचे कुलूप काढले. ती खोलीसुद्धा अस्तावस्त होती. अजून पुढे जाऊन त्याने एक दार उघडले तर डाव्या हाताला वॉशरूम होते. अगदी बँकेतून पूर्ण बाहेर पडल्यास ते माझ्या लक्षात आले आणि उजव्या बाजूला जिना होता. त्या जिन्याच्या पायऱ्या तो भराभर उतरला. मी घाबरत घाबरत उतरत होते. मला कळेचना की मी कुठे जात आहे? तो वळला आणि अजून काही पायऱ्या उतरला पायऱ्या संपल्या तिथे एक मजबूत लोखंडी दार होते. त्या दाराचे कुलूप त्याने उघडले. मग आतमध्ये असलेले शटरवर केले. शटर वर गेल्यावर आणखी एक दार होते. मी इकडे तिकडे पाहिले तर समोर एक लांबलचक बोळ होती. त्याच्या डाव्या हाताला पूर्ण भिंत होती तर उजव्या हाताकडून काही उजेड येत होता. बहुधा संपूर्ण काचेचे केलेले छोटेखानी दुकानाचे ब्लॉक्स असावेत. तो उजेड पाहून जीवात जीव आला. तोपर्यंत त्याने तिसरे दार उघडले होते. आत सगळे लॉकर असल्यामुळे कुणीच नव्हते. थोडसे काळोखी होते. मी म्हटले
‘दिवे नाहीत का?’ म्हणाला, ‘लावतो.’
मग त्यांने दिवे लावले. जीव गुदमरत होता. मी विचारले, ‘पंखा नाही का?’
‘आहे पण…’
मी म्हटले, ‘राहू द्या.’
आणि मग त्यांने आणि मी दोघांनीही चाव्या लावून माझे लॉकर उघडले. तो बाहेर जाऊ लागला तशी मी परत घाबरले आणि म्हटले, ‘तुम्ही इथेच थांबा.’
तर म्हणाला, ‘नाही तुम्ही येईपर्यंत मी बाहेर थांबतो. मला काय एक पिशवी आत टाकायची आहे तितकंच
काम आहे.’
ते काम अर्ध्या मिनिटात झाले. मी त्याला आवाज दिला. तो आत आला. त्याने चेक करून दाखवलं की लवकर बंद झाला आहे. आता याला तीन दरवाजे लावायचे आहेत तोपर्यंत आपण वॉशरूमला जाऊन येऊ असा विचार केला. कारण तासभर वेटिंग रूममध्ये एकमेव व्यक्ती असल्यामुळे एसीची अति थंड हवा आणि एक लिटर पाण्याने हालत खराब झाली होती.
त्याला म्हटले, ‘तुम्ही दार लावता तोपर्यंत मी पटकन वॉशरूमला जाते.’
तो ‘होय’ म्हणाला. मी भराभर पायऱ्या चढून वर गेले. मी वॉशरूममधून बाहेर आले तर हा माणूस तिथे नव्हता. तिकडे मी पायऱ्या खाली उतरले. हा तिथेही नव्हताच. मनात आले मी थांबायला हवे होते अगदीच चाळीस-पंचेचाळीस किलोचा माणूस. हवेनीही उडू शकेल! कोणी एखादा ठोसा तर दिला नसेल? क्षणात गायब केला असेल. त्या तीन दारांच्या आत काय चाललं असेल माहीत नाही. मी घाबरले. मी परत वर चढून आले. मग मी दार उघडायचा प्रयत्न केला तर दाराला बहुधा आतून कुलूप असावे. पाहिले तर कुठेही तिकडे बेल नव्हती. मी दार वाजवायला सुरुवात केली, तर दार उघडायला कोणीच आलं नाही. दार वाजवून वाजवून माझे हात लालबुंद झाले. मी घाबरले होतेच. आडवाटेने कोणत्या तरी गुहेत गेल्यानंतर एखादा किल्ला उघडावा तसं त्यांनी ते लॉकरचे खोली उघडली होती. आता मला भोवळ आल्यासारखं वाटू लागले. कसे कोणास ठाऊक सुचले की, मोबाइलवर कोणाशी तरी बोलावे पण त्या भागात मोबाइलची रेंज नव्हती. त्यात मोबाइल तासभर व्हीडिओ बघण्यासाठी वापरल्यामुळे बॅटरी एक आकडा दाखवत होती. म्हणजे मी हार्ट अॅटॅकने मरायच्या आत हा मोबाइल डेड होऊ शकत होता. हृदयाचे ठोके मिनिटाला एकशे ऐंशीच्या वर गेले होते. मी खूप घाबरले. तिथे बसायलाही जागा नव्हती, आता काय करावे? त्यात दहा-पंधरा मिनिटे निघून गेली असावीत. कोणीच मला शोधायला आले नाही. काय करावे? शेवटी मी पायऱ्या उतरले आणि त्या उजेडाच्या दिशेने पुढे पुढे जाऊ लागले. अचानक एका ब्लॉकमध्ये मला दोन माणसं करवतीने काहीतरी कराकरा कापताना दिसले. मी त्या काचेवर टकटक करून त्यांना मदत मागितली, पण माझ्या बाजूला येणारा उजेड हा फक्त काचेमुळे येत होता. त्याला माझ्या बाजूने दार नव्हते. मी काय बोलत होते, त्यांना कळत नव्हते. ते काय सांगत होते, मला कळत नव्हते. पण, ते कुठेतरी ते ज्या दिशेकडे बोट दाखवत होते मी त्या दिशेकडे चालू लागले. एका जागी उजवीकडे तो रस्ता वळला आणि डावीकडे मला काही पायऱ्या दिसल्या. मी भराभर त्या पायऱ्या चढले आणि बघते तर बँकेच्या दारात पोहोचले. माझ्या जीवात जीव आला. मी चिडलेले होते. मी बँकेच्या आत गेले तर तेथील कर्मचारी म्हणाले की, तुम्ही इथे सही न करता कशाला निघून गेलात?

मी सांगितले की, मी निघून गेलेच नाही. त्यात ते म्हणाले की, तुम्ही तर आता बँकेत बाहेरून आत आलात. मी सांगितले की, मी वॉशरूममध्ये गेले होते, तर त्यांनी मला तिथेच ठेवून निघून गेले. मला बाहेर काय काय सोसावे लागले. माझे लालबुंद झालेले हातसुद्धा मी त्यांना दाखवले, तर ते म्हणाले की, फोन करायचा होता. आता त्यांना काय सांगू तिथे रेंज येत नव्हती म्हणून! इतक्यात मी बराच वेळ आली नाही म्हणून तो माणूस जो माझ्यासोबत खालच्या लॉकरपर्यंत आला होता तो समोरून येताना दिसला. तो माझ्यावर चिडला म्हणाला,

‘तुम्ही असे कसे सही न करता निघून जाता? मला संशय आला की तुम्ही कदाचित वॉशरूममध्ये असाल म्हणून मी परत शोधण्यासाठी बाहेर पडलो, तर तुम्ही इथे समोर उभे!’
त्याच्या आवाजाची पातळी इतकी वाढली होती की, जेवतानाचा त्याचा पाहिलेला अवतार परत एकदा पासण्याची संधी मला मिळाली.
मग परत त्याला त्याच्या माझ्या शेवटच्या भेटीपासून ते आत्तापर्यंतच्या भेटीचा वृत्तांत सांगितला. त्याला दया
आली. तो खुर्चीकडे बोट दाखवून मला ‘थोडा वेळ शांत बसा’ म्हणाला.
‘पाणी हवे का?’ विचारले. माझी तहान-भूक हरपली होती. डोळ्यांसमोर अंधार दाटलेला होता. त्याने जिथे बोट टेकवले तिथे मी शांतपणे सही केली. वेटिंग रूममध्ये येऊन एक खरमरीत पत्र लिहिले ते तक्रार बॉक्सपर्यंत घेऊन गेले आणि मला त्याने ‘बसायला सांगितले आणि पाणी विचारले’ ते प्रकर्षाने आठवले. मी तो कागद टराटरा फाडून कचऱ्याच्या बादलीत टाकला आणि बँकेतून बाहेर पडले. आता मात्र एक गोष्ट मी माझ्या मनावर कोरून ठेवली की, या बँकेत येताना कायम कोणालातरी सोबत घेऊन यायचे, नाहीतर लॉकरसाठी बँक बदलायची म्हणून!
pratibha.saraph@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -