Wednesday, June 26, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यटी बी लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन, सांगली

टी बी लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन, सांगली

सेवाव्रती: शिबानी जोशी

स्वातंत्र्यानंतर भारत-पाकिस्तान फाळणीच्या झळा हजारो कुटुंबांना बसल्या. अनेक कुटुंब निराधार झाली. सिंध प्रांतातल्या शिकारपूर येथे राहणारे लुल्ला कुटुंबीय स्वतःचे सर्व उत्पन्न, मालमत्ता तिथेच सोडून भारतात  स्थलांतरित झाले. स्वतःच्या हातात एक पैसा नसताना स्वकर्तृत्वावर कुटुंबान शून्यातून विश्व निर्माण केलं, आर्थिक समृद्धी आली. स्वतः संपन्न झाल्यावर समाजासाठी  काहीतरी करावं असं लुल्ला कुटुंबीयांना वाटू लागलं. केवळ स्वतःच्या कुटुंबाची आर्थिक समृद्धीपुरतंच मर्यादित न राहता लुल्ला कुटुंबीयांनी ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाला सुसंस्कृत, समृद्ध करण्याचं व्रत घेतलं आणि त्यातूनच अन्य सहकार्यासाठी लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशनची स्थापना झाली. टी बी लुल्ला कर आकारणी क्षेत्र होते. त्यांचा प्रवास सिंधू ते कृष्णा झाला. १२ ऑक्टोबर १९३५ रोजी जन्मलेल्या, लुल्लांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

मुंबईतून विक्रीकर निरीक्षक म्हणून त्यांची बदली कोल्हापूर आणि नंतर सांगली येथे झाली, त्यांनी नंतर विक्रीकर विभागाचा राजीनामा दिला व १९५८ मध्ये कर सल्लागार म्हणून स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. त्याच्या शांत, सौम्य, दानशूर स्वभावामुळे ते फक्त स्वतःच्या दोन मुलांचेच नाही तर संपूर्ण समाजाचे “DADDY” झाले. फाळणीच्या वेळी  सिंधी बांधवांना जो संघर्ष करावा लागला होता, तो महाराष्ट्रीय समाजासमोर मांडण्यासाठी ते ७१ वर्षांचे असताना “सिंधू ते कृष्णा” हे पुस्तक प्रकाशित केले. २८ सप्टेंबर २०१० रोजी त्यांचं निधन झालं. आपल्या वडिलांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र किशोर लुल्ला यांनी वडिलांच्या व्यवसायाबरोबरच वडिलांचं समाजकार्यही सुरूच ठेवलं. राष्ट्रीय विचाराच्या, समविचारी संस्थांना मदत करणे सुरूच  होतं; परंतु या कामाला एक संस्थात्मक रूप प्राप्त व्हावं यासाठी २०१० मध्ये सामाजिक आणि धर्मादाय हेतूंसाठी त्यांनी काही समविचारी सहकाऱ्यांसोबत लुल्ला चारिटेबल ट्रस्टची स्थापना केली, नंतर त्याचे फांडेशनमध्ये रूपांतर झाले. २०११ साली एक सामाजिक मेळावा आयोजित केला. ज्यामध्ये १०० हून अधिक NGO आणि देणगीदारांनी सहभाग घेतला.

चांगल्या संस्थांना देणगीदार मिळाले आणि ज्यांना दान करण्याची इच्छा असते त्यांना सतपात्री दान करता आलं. २०१२ मध्ये “कलाविष्कार २०१२” नावाचा एक सामाजिक मेळावा आयोजित केला, ज्यात शंभरहून अधिक कलाकारांना आपली कला सादर करता आली. ती पाहायला प्रमुख पाहुणे आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे उपस्थित होते. त्यानंतर सेवा २०१३ हा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित केला गेला. राज्यस्तरीय सामाजिक संस्था व  देणगीदार संस्थांची  एकाच व्यासपीठावर ओळख होऊन आर्थिक बळ देण्यासाठी हा उपक्रम फांडेशनने आयोजित केला होता. विविध उपक्रमांना, संस्थांना आर्थिक सहाय्य करत असताना संघटनेच्या कार्यकर्त्यांना  समाजातील काही शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्या प्रकर्षाने दिसून आल्या. त्यामुळे याच विषयावर विविध उपक्रमांना मदत करायची असं ठरवण्यात आलं. त्यातून “शिकू आनंदे” हा उपक्रम सुरू झाला. केवळ पुस्तकी शिक्षण न देता संस्कृती, राष्ट्रीय विचाराचं तसेच अनुभवातून मुलांना शिक्षण मिळणे गरजेचे आहे, या दृष्टीने काम सुरू झालं. त्यासाठी केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकांना देखील अद्ययावत होण्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज आहे हे लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर शिक्षकांना प्रशिक्षण दिलं गेलं.

२०१४ मध्ये लुल्ला फाऊंडेशनने ८ शाळा दत्तक घेतल्या आहेत आणि  तिथे ४ ते ६ वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. दत्तक घेतलेल्या शाळांना “ज्ञानरचनावाद” शिकवला जातो. त्याला ‘शिकू आनंदे’ असे नाव देण्यात आले. ज्यामध्ये  केजीचे विद्यार्थी होते. या प्रकल्पासाठी पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी या प्रसिद्ध संस्थेकडे प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी सांगली येथे कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेत २४००० विद्यार्थी, ५००० पालक आणि १००० शिक्षकांनी शंभरहून अधिक शाळांमधून सहभाग घेतला.  ‘शिक्षणाचा रोड मॅप’ या विषयावर अनेक शिक्षण तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. पुण्याचे सुधीर गाडगीळ हे या कार्यक्रमाचे समन्वयक होते. त्यापाठोपाठ २०१५ मध्ये ‘शिक्षणातील बदल आणि शिक्षण जे बदलते’ या विषयावर ३ दिवस राज्यस्तरीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ३०० शिक्षक सहभागी झाले होते.

राज्य शिक्षण विभाग आणि सृजन शिक्षण संस्थेच्या मदतीने लुल्ला फाऊंडेशनने नोव्हेंबर २०१५ रोजी राज्यस्तरीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन केले. “प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र” या शीर्षकाखाली ही परिषद होती.यामध्ये प्रामुख्याने धुळे, नंदुरबार, गडचिरोली या दुर्गम भागातील  व सांगलीसह एकूण ६०० हून अधिक सहभागी होते. फाऊंडेशन त्यांचे विविध उपक्रम राबवण्यासाठी अनेक  सुयोग्य, दर्जेदार संस्थांची मदत घेत असते. सांगली येथे टी बी लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन, शिक्षणविवेक पुणे, जिल्हा परिषद सांगली, सांगली-मिरज-कुपवाड महापालिका आणि DIECPD यांच्या वतीने मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन या विषयावर मोठ्या प्रमाणावर चर्चासत्र २०१८ साली आयोजित करण्यात आले होते. ११५० मुली तसंच  २०० पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. या सर्व सत्रांमध्ये मासिक पाळीतील स्वच्छता व्यवस्थापनाविषयी प्रत्येक तपशील समजावण्यात आला होता. २०१७ पासून शिक्षण विवेक, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिक्षण माझा वसा’ या नावाने मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. असामान्य कार्य करणाऱ्या मुख्याध्यापकांसह सुमारे १० शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अशा कार्यक्रमात ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून बोलावले जातात. ‘शिक्षण माझा वसा २०२०-२१’ या कार्यक्रमात डॉ. शरद कुंटे लिखित नवीन शैक्षणिक धोरणावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते.

२०२३च्या शिक्षण माझा वसा कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रांत कार्यरत सात शिक्षकांना सन्मानित करण्यात आलं तसेच योगेश सोमण दिग्दर्शित “माझ्या जन्माची चित्तरकथा” या नाटकाचं सादरीकरण करण्यात आलं होतं. महिला सक्षम तर समाज सक्षम यावर विश्वास असल्यामुळे महिला सक्षमीकरण उपक्रमासाठी लुल्ला फाऊंडेशनने स्व. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर गाण्यांचे नवीन  गायिकांना वाव देण्यासाठी सुमारे १८ नव्या नावांची निवड केली व स्वर्गीय लता मंगेशकर यांना आदरांजली आणि नवीन मुलींना प्रोत्साहन अशा हेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  संघविचारी असलेल्या संस्कार भारतीच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वरलता’ हा आणखी एक मराठी कार्यक्रम सादर करण्यात आला होता. संस्थेच्या दरवर्षीच्या कार्यक्रमांमध्ये वैविध्य राखलं जातं. या वर्षीही फाऊंडेशनने शिक्षण विवेक, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने  असामान्य कामगिरी करणाऱ्या ५ शिक्षकांना पुरस्कार दिला. या वर्षीची थीम होती ‘सामर्थ्य आहे चळवळ्याचे’.

दासबोध मनाचे श्लोक यावर आधारित सुमारे तेराशे पुस्तिका छापून त्या दहाहून अधिक शाळांमध्ये वितरित करण्यात आल्या होत्या. सुमारे १३०० पुस्तिका छापल्या गेल्या ज्यात दासबोध आणि मनाचे श्लोक यातील काही उतारे आणि सोप्या भाषेतील कथा छापण्यात आल्या. ही पुस्तके १० हून अधिक शाळांमध्ये वितरित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी प्रमुख पाहुणे समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी होते, ज्यांच्या भाषणाला खूप दाद मिळाली. लहान मुलांच्या चौफेर शिक्षणासाठी “शिकू आनंदे” हा एक खूप व्यापक उपक्रम संस्थेनं सुरू केला आहे.  मुलाच्या मूलभूत शिक्षणाची वाढ वयाच्या ६ व्या वर्षांपर्यंत असते. म्हणूनच बालशिक्षण हे अत्यंत नाजूक पण किचकट काम आहे. हे लक्षात घेऊन फाऊंडेशनने सांगली जिल्ह्यासाठी हे आव्हान स्वीकारले असून निवडक ८ शाळांमध्ये पद्धतशीर आणि शास्त्रोक्त पद्धतीने बालकांना शिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. त्यासाठी फाऊंडेशनने केजी आणि इ. पहिलीच्या शिक्षकांना योग्य प्रशिक्षण देण्याचे ठरवले. त्यांना तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देऊन, नवीन कल्पना, शैक्षणिक साधने उपलब्ध करून  दिली जातात. या प्रकलपाला आता सुमारे पाच वर्षे पूर्ण झाली असून रचनावादाच्या मार्गाने शिक्षण घेतल्याने शाळांमधल्या  विद्यार्थ्यांचे निकाल उत्कृष्ट लागले आहेत.

गेल्या ५ वर्षांत शिक्षण क्षेत्रातील विविध तज्ज्ञांना बोलावून शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. सैद्धांतिक शिक्षणाऐवजी व्यावहारिक उपक्रमांवर भर दिला जातो. इथे बाह्य तसंच अंतकरण विकास केला जातो. वर्गखोल्या अतिशय आकर्षक पद्धतीने रंगवल्या आहेत. शाळेचे मैदान, स्वच्छतागृहे आणि हात धुण्याची योग्य काळजी घेतली जाते. सध्या “शिकू आनंदे” हा प्रकल्प फाऊंडेशन अतिशय यशस्वीपणे चालवत आहे. नॉर्मल मुलांच्या शिक्षणाचा विचार केल्यानंतर दिव्यांग मुलांसाठी देखील काहीतरी करावं यासाठी फाऊंडेशनने काही उपक्रम हाती घेतले. समग्र शिक्षा अभियान आणि DIECPD ने लर्निंग डिसॅबिलिटी इंग्लिश लँग्वेज डिसलेक्सिया आणि डिस्ग्राफिया या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आणि त्या आयोजित केल्या होत्या. शिक्षकांना अक्षमता आणि बौद्धिकदृष्ट्या अक्षम विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. संस्थेच्या अनेक चांगल्या उपक्रमांना रोटरी इंटरनॅशनलची मोठ्या प्रमाणावर मदत मिळत असते.

ईशान्यकडील  राज्यांमधल्या मुलांकरिता संघविचारी संस्था अनेक ठिकाणी वसतिगृह चालवतात. सांगलीमध्येही कार्यकर्त्यांनी २०१४ मध्ये ईशान्येकडील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधले. या प्रकल्पासाठी लुल्ला फाऊंडेशनने मोठी देणगी दिली. मेघालयातील १५ ते २० विद्यार्थी दरवर्षी शिक्षणासाठी येथे राहतात. शिकू आनंदे हा नेमका काय उपक्रम आहे हे सर्वांना कळावं यासाठी २०१७ रोजी ‘शिकू आनंदे’ नावाने एक लघुपट बनवला गेला. त्यानंतर बाळासाहेब लिंबकाई लिखित” वाचू लिहू” हे पुस्तक टी बी लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशनद्वारे प्रकाशित करण्यात आलं. या पुस्तकाचे प्रकाशन  जिल्हा परिषद सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दुडी यांच्या हस्ते झाले.  इतर सामाजिक संस्थांना आर्थिक, वैचारिक सहाय्य देण्यासाठी सुरू झालेला ट्रस्ट २०१४ मध्ये फाऊंडेशनमध्ये रूपांतरित होऊन  स्वतः शिक्षण, आरोग्य तसेच महिला सक्षमीकरण या विषयांमध्ये थेट काम करत आहे. भविष्यात देखील शिक्षण क्षेत्रावरच भर देऊन जिल्हा परिषद आणि सरकारी शाळांच्या विद्यार्थ्यांची, शिक्षकांची, पालकांची आणि शाळेची गुणवत्ता कशी वाढेल यासाठी सतत कार्य सुरू राहणार आहे. महिला सक्षमीकरण या देखील विषयाला प्राधान्य दिले जाणार आहे.
joshishibani@yahoo. com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -