Saturday, April 27, 2024
Homeताज्या घडामोडीRam Satpute : हिंदूंना भगवा दहशतवाद म्हणणारे आता हिंदूंच्या मंदिरांना भेटी देतायत!

Ram Satpute : हिंदूंना भगवा दहशतवाद म्हणणारे आता हिंदूंच्या मंदिरांना भेटी देतायत!

‘बात निकलेगी तो दूर तक जायेगी’ राम सातपुते यांची काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंवर खोचक टीका

सोलापूर : काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) आणि प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या मंदिर भेटीवरून भाजपचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांनी खोचक टीका केली. ‘काँग्रेसची (Congress) सत्ता असताना यांनीच भगवा दहशतवाद हा शब्द आणला, हिंदूंना दहशतवादी म्हटलं आणि आता हे मंदिरांना भेटी देतायत हे वीट आणणारं आहे’, अशी टीका राम सातपुते यांनी केली. काँग्रेसच्या ७० वर्षांच्या तुलनेत भाजपच्या १० वर्षांत काय झालं हे आम्ही सांगू, ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवू असंही ते म्हणाले.

राम सातपुते म्हणाले की, आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलू, सोलापूरच्या युवकाला हाताला काम मिळालं पाहिजे, आयटी पार्क झालं पाहिजे, उद्योग आले पाहिजेत, टेक्सटाईल पार्क झाले पाहिजेत. सोलापुरात मोठ्या प्रमाणात सोलापूरला जोडणारे ४० हजार कोटींचे रस्ते आमच्या सरकारच्या काळात झाले. काँग्रेसने मागच्या ७० वर्षात काहीच दिले नाही. त्यामुळे आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलूया, मी विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहे आणि हेच माझं त्यांना उत्तर आहे, असं राम सातपुते म्हणाले.

यांनी हिंदूंना भगवा आतंकवाद म्हटलं

सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्या मंदिर भेटीवरून राम सातपुते यांनी खोचक टीका केली. ते म्हणाले की, मंदिरांना विरोधकांनी भेटी देणं हे सॉफ्ट हिंदुत्व नसून डिसगस्टिंग प्रकार आहे. मुळात हिंदूंना दहशतवादी यांनीच म्हटले होते. हे गृहमंत्री असताना त्यांनी जी अॅक्टिव्हिटी राबवली ती हिंदूंना टार्गेट करण्याची होती. मी आता विकासाच्याच मुद्द्यावर बोलणार आहे. ‘बात निकलेगी तो दूर तक जायेगी’.

राम सापपुते म्हणाले की, हिंदूंना दहशतवादी आणि भगवा आतंकवाद म्हणणं हा यांचा खरा चेहरा आहे. भगवा दहशतवाद म्हणणारे हेच लोक आता भगवे वस्त्र परिधान करणाऱ्या आमच्या संतांचे दर्शन घेत आहेत. पण इथले हिंदू त्यांचा खरा चेहरा जाणून आहेत. त्यामुळे आगामी काळात इथला हिंदू पूर्णपणे ताकदीने आमच्या सोबत आहे.

संपूर्ण राजकीय कारकिर्दीत तुम्ही काय केले?

सोलापुरातील काँग्रेसने जे काही केलं त्याची तुलना आमच्या विकासकामांसोबत करावी. राम सातपुते इथे उमेदवार नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच उमेदवार आहेत. त्यामुळे सोलापूरची जनता मोदींच्या विकासकामावर विश्वास ठेऊन मतदान करेल. ही निवडणूक विकासाची, सोलापूरच्या भविष्याची आहे. सोलापूरची जनता सुशीलकुमार शिंदेंना विचारत आहे की, संपूर्ण राजकीय कारकिर्दीत तुम्ही काय केले? मोदींनी काय केलं याचा हिशोब आम्ही देतो. तुमचं आडनाव शिंदे आहे म्हणून तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे, असाही टोला राम सातपुते यांनी लगावला.

आम्हाला विरोधकांना भिडायचं नाही तर…

ज्या मतदारसंघात प्रणिती शिंदे आमदार आहेत तिथून देखील भाजपला लीड आहे असं सांगत राम सातपुते म्हणाले की, तुम्ही वारसा चालवता आणि अनुकंपा तत्वावर तुम्हाला तिकीट मिळाले आहे. २०१४ ला ४८ हजार लीड आणि २०१९ च्या लोकसभेला ३७ हजाराची लीड प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघात भाजपला मिळाली आहे. सोलापूर शहर मध्य मधील जनता यांना कंटाळली आहे. विरोधक हे फार धनाढ्य आणि मोठे लोक आहेत. मी सामान्य परिवारातून आलेला कार्यकर्ता आहे. मी त्यांना नाही भिडू शकत नाही. आम्हाला भिडायचं नाही तर सोलापूरचा विकास करायचा आहे. विरोधक हे माजी मुख्यमंत्र्याच्या परिवारातील आहेत, त्यामुळे मी भिडणार नाही. सोलापूरच्या युवकाला काम मिळालं पाहिजे यासाठी मी जीवाचं रान करेन, प्रसंगी खासदारकी पणाला लावेन, असं राम सातपुते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -