Monday, May 27, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यमिरगाची तयारी

मिरगाची तयारी

रवींद्र तांबे

भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने मिरगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही शेतकऱ्याला मिरग किती तारखेला आहे असे विचारल्यास न अडखळता किंवा दिनदर्शिका न पाहता उत्तर मिळते ७ जूनला. म्हणजे शेतकऱ्यांची भात पेरणीची वेळ आली आहे. तेव्हा भात पेरून घ्यावे. त्यानंतर पावसाळ्यातील शेतीचा हंगाम सुरू होतो. आजही आपल्या देशात पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असते किंवा पावसाच्या पाण्यावर शेती केली जाते. अनियमित पाऊस लागल्यास शेतीचे फार मोठे नुकसान होते. याचा फटका देशातील शेतकरी दादाला होतो.

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना अवकाळी संकटाला सामोरे जावे लागते. ही नैसर्गिक आपत्ती असली तरी यात शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त होतो. त्यानंतर सरकारी मदतीचा हात पुढे केला जातो. मिरगाच्या दरम्यान पाऊसही सुरू होतो. मागील काही वर्षांत पाऊस कधीही पडतो. असे असले तरी मिरग जवळ येण्यापूर्वी शेतकऱ्यांची कामाची लगबग सुरू होते. मिरगा दिवशी भात पेरले म्हणजे वेळेवर लावणी करता येते, असे शेतकरीदादा सांगतात. त्या दरम्यान भात शेतीला मदत करण्यासाठी दहा ते पंधरा दिवसांची रजा काढून चाकरमानी आपल्या गावी येतात. तेव्हा काही चाकरमानी उन्हाळ्याच्या सुट्टीत न येता पावसाळ्यात येतात. तेवढीच शेतीच्या कामकाजासाठी मदतीस मदत. तसे सध्या वाढत्या महागाईमुळे गडी माणसे शेतीचे काम करण्यासाठी परवडत नाहीत. तसेच शेताची राखण करावी लागते. सध्या बऱ्याच ठिकाणी माकडे शेतीची नासधूस करतात. इतकेच काय एक वेळ वस्तीत न दिसणारी माकडे आता बंद असणाऱ्या घरात रात्री मुक्कामाला असतात. अशा परिस्थितीत धोका पत्करून शेतकऱ्यांना शेती करावी लागते. तेव्हा माकडांचा बंदोबस्त शासन स्तरावर करणे शेतकरी दादांच्या दृष्टीने जास्त हिताचे आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, मिरग येण्यापूर्वी शेतकरी आपल्या जोताच्या सर्जाराजाची सोय करतो. गोठ्याची जमीन करून गोठा दुरुस्त करतो. त्यानंतर शेती कालावधीत लागणारे वैरण अर्थात भातयान गवत वाड्याच्या माळ्यावर व्यवस्थित रचून ठेवले जाते. तसेच वाड्याजवळ गवताची तनस करून ठेवतात. आपल्याला पावसाळ्यात जळावू लाकूड वाड्याच्या एका कोपऱ्यात माच घालून रचून ठेवतात. त्याच बाजूला शेणी ठेवल्या जातात. आठवडा बाजाराला जाऊन आवश्यक किराणा माल आणतात. शेतीची अवजारे दुरुस्त करून घेतात. बी-बियाणे व रासायनिक खत आणले जाते. नांगर गावच्या सुताराकडून व्यवस्थित करून घेतात. जे भात कोपऱ्यात पेरायचे असते ते बिवळ्यात बांधून ठेवलेले असते. भातयान गवताने बिवळो बांधल्याने आतमध्ये भात उबदार राहते. ते पहिल्या पावसाक पेरल्यानंतर सर्व रुजून येतात. जमीन थंड झाल्यावर सर्वच गोठे रुजून येत नाहीत. असे स्थानिक वयोवृद्ध माणसे सांगतात. शेवटी कोणत्याही कामाला अनुभव महत्त्वाचा असतो. तो अनुभव शेतकऱ्यांकडे असतो. म्हणून खेडोपाडी आजही शेती टिकून आहे. इतकेच नव्हे तर स्थानिक लोकांना शेतीच्या हंगामात कामधंदा मिळतो. तेव्हा शेतीप्रधान देशात मिरग म्हणजे शेतकरी दादांना भात पेरणीचा जणू काय संदेशच देतात असे म्हणावे लागेल.

सध्या अनेक ठिकाणी सुपीक जमिनीवर सिमेंटची जंगले उभारली गेलेली आहेत तसेच जातही आहेत. तेव्हा देशातील जगाचा पोशिंदा समजला जाणारा शेतकरी वाचवण्यासाठी शेत जमिनीवर निर्माण होणारी सिमेंटची मैदाने यांना विरोध केला पाहिजे. शेतकरी राजा आपल्याकडे असलेल्या जमिनीचे सुपीक, मध्यम व नापीक अशा प्रकारे वर्गीकरण करीत असतात. त्यात तो प्रथम सुपीक जमीन, मध्यम जमीन आणि नंतर नापीक जमीन लागवडीखाली हाणीत असतो. प्रथम सुपीक जमीन नंतर मध्यम प्रतीची जमीन लागवडीखाली आणतो. तेव्हा सिमेंटची मैदाने किंवा इमारती उभारायच्या असतील, तर नापीक जमिनीवर जरून उभाराव्यात. यामुळे सुपीक व मध्यम प्रतीची जमीन अबाधित राहते. यातून शेतकरी दादा तारू शकतो. सुपीक जमीन म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणता येईल. ही वाचविणे सर्वांच्या हिताचे आहे. तरच शेतकरीदादा वाचू शकतो. अन्यथा शेतकरी दादांचे जीवन धोक्यात आहे. सध्या तर विविध प्रकल्पांच्या नावाखाली उद्योजक गरिबांच्या जमिनी गिळंकृत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याला पण आपण संघटित राहून विरोध केला पाहिजे.

प्रकल्प व्हायला पाहिजेत मात्र लोकांचे स्थलांतर करून चालणार नाही, त्यातून स्थानिक नागरिकांना रोजगार मिळाला पाहिजे. तेवढा हातभार शेतकरी राजाला होऊन मिरगाच्या तयारीला लागेल. त्याचा शेतीला आधार मिळाल्याने अधिक जोमाने शेतीची लागवड करेल. त्यासाठी अधिक आत्मविश्वासाने मिरगाच्या तयारीला लागेल. ते सुद्धा मागील वर्षाच्या तुलनेने अधिक पीक कसे घेता येईल त्या अानुषंगाने प्रयत्न करेल. त्यासाठी वरुणराजाचे आगमन वेळेवर झाले पाहिजे. मिरगाचो दिवस सुखा जाता काम नये अशी शेतकऱ्यांची इच्छा असते. तेव्हा शेतकऱ्याची मिरगाची तयारी झालेली असून कधी पाऊस पडता आणि भात पेरतय असा त्यांका झाला आसा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -