Wednesday, June 26, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखNeelam Rane : नाती जपणाऱ्या ताई... वहिनी!

Neelam Rane : नाती जपणाऱ्या ताई… वहिनी!

संतोष वायंगणकर

कोणतेही नाते हे आपलेपणाने, प्रेमळ स्वभावाने आणि परस्परांतील विश्वासाच्या भावनिकतेवर तयार होते; परंतु जर त्या नात्याला नि:स्वार्थ भावनेची जोड असेल, तर ते आपसूकच दृढ होत जाते. अशाच कोणाच्या तरी ताई असलेल्या, अनेकांच्या वहिनी असलेल्या आणि निलेश सर, आ. नितेश सर यांच्या आई असलेल्या सौ. निलम नारायण राणे यांचा आज वाढदिवस आहे. आजच्या वाढदिवसानिमित्ताने सौ. निलम वहिनींना भरभरून शुभेच्छा!

कोकणाच्या राजकारणात १९९० पासून दादांची एन्ट्री झाली आणि त्यावेळेपासून माझ्यासारखे राणे परिवाराचे हितचिंतक, पक्षीय कार्यकर्ते आपोआपच सौ. निलम वहिनींशी जोडले गेले. सुरुवातीच्या काळात दादांची सावली असलेल्या सौ. निलम वहिनी राजकारणात फार लक्ष घालत नसत. एक यशस्वी गृहिणी म्हणूनच काम करत राहिल्या; परंतु नंतरच्या काळात सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष झाल्या. तत्पूर्वी विशेषत: महिलांसाठी कार्यरत असणाऱ्या जिजाऊ महिला संस्थेच्या अध्यक्षा अशा संस्थांवर त्या कार्यरत राहिल्या. मग पडवे येथील हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज अशा संस्थांचा कारभार त्यांच्या मार्गदर्शनाखाली होऊ लागला. एखाद्या वेळी कार्यकर्त्यांवर साहेब रागावले तरी तो कार्यकर्ता अगदी आपला भाऊ आपल्यावर रागावला तरीही ज्या नात्याने वहिनींशी बोलतो त्याच नात्याने सौ. निलम वहिनी यांच्याशी बोलणारे हजारो कार्यकर्ते आहेत.

उच्चपदावर असलेल्या दादांची पत्नी म्हणून कोणताही गर्व नाही की कोणताही अहंभाव नाही. कोणाही सर्वसामान्यांशी त्यांचा थेट संवाद असतो. त्याचं स्वत:चं असं नेटवर्क आहे. एखादा कार्यकर्ता रुसलेला असेल, नाराज असेल तर त्याच्याशी स्वत: बोलून ‘काय हो, अलीकडे कुठे दिसत नाहीत, काय बिनसलंय?’ असं थेट विचारल्यावर तो कार्यकर्ताही ‘नाय हो वहिनीनू तसा काय नाय. दादा ह्याच आमचा जग’ असं आपलेपणाने सांगणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही कमी नाही. दादांचा राग हा क्षणिक असतो हे सर्वांनाच माहिती असते. दादा रागावतील तेवढंच प्रेमही देतील याची पक्की खात्री त्यांच्या कार्यकर्त्यांना असते. यामुळे कोणताही कार्यकर्ता त्यांच्यापासून फार दूर जात नाही. खरं तर साहेबांसारख्या वादळी स्वभावगुणांच्या व्यक्तिमत्त्वासोबत संसाराचा सारीपाट मांडणे, तो डाव यशस्वी करणे तसं म्हटलं तर कठीण; परंतु सौ. निलम वहिनींनी हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. दादांच्या यशस्वितेत आणि राजकीय पराभवाच्या काळातही सौ. निलम वहिनी ठामपणाने सोबत राहिल्या. त्यावेळीही त्यांचं म्हणणं होतं, प्रत्येकवेळी प्रत्येकाला यशच मिळेल असं नाही. एखाद्या विषयात अपयशही त्याच ताकदीने स्वीकारता आलं पाहिजे. परमेश्वराने आजवर भरभरून दिलंय, देत आलाय, असं सौ. निलम वहिनी सहज बोलून जातात. खरं तर सौ. निलम वहिनी व्यासपीठावर नसतात.

व्यासपीठासमोरील सर्वसामान्यांमध्ये बसणं, त्यांच्याशी संवाद साधणं हे त्यांना अधिक आवडतं. कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी असताना नियमितपणे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या सौ. निलम वहिनींना पाहिलं की, अनेकजण सहजतेने म्हणतात, किती साधेपणा आहे. घरात श्रीमंती असताना साधेपणाने राहणं हे सोप्प नसतं. चार पैसे जवळ आले की, श्रीमंतीचं प्रदर्शन मांडणाऱ्यांची या समाजात कमी नाही. लक्ष्मीच्या सहवासात असतानाही कोणताही माज न करता अगदी सामान्यांपर्यंत आनंदी, समाधानी राहाता येतं. हे सौ. निलम वहिनींकडे पाहिल्यावर समजून येते. अगदी जमिनीवर पाय ठेवून जगणं कशाला म्हणतात हे त्यांच्याकडे पाहिल्यावर समजते. गेल्या दहा वर्षांत निवडणुकांमध्ये किंवा अन्य महिला संस्थांच्या कार्यक्रमात सौ. निलम वहिनी भाषण करतात. त्यांना येणारे अनुभव, समाजासाठी काही करण्याची त्यांची असणारी मनस्वी भावना त्या अशा भाषणातून व्यक्त करतात. राजकारण्यांच्या घरात राहून राजकारणापासून फार लांबही नाही; परंतु त्याचबरोबर एकदम जवळही नाही. या पद्धतीने राहणं तसं सोप नसतं; परंतु आजपर्यंत सौ. निलम वहिनी यांनी ही तटस्थता फार लीलया जपली आहे.

ताई, माई, वहिनी, आई या नावांमध्येच एक वेगळा गोडवा, आपलेपणा, जिव्हाळा आहे. या नात्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. सौ. निलम वहिनींना या नात्यातील ताई, वहिनी, आई ही सर्व नावं एखाद्या आभूषणासारखी शोभून दिसतात. सौ. निलम वहिनींनीही ही नाती सर्वांशीच तितक्याच सात्त्विकतेने आणि सहृदयतेने जपली आहेत. सौ. निलम वहिनी भेटल्यावर ज्या आस्थेवाईकपणे एखाद्याशी संवाद साधतात, विचारपूस करतात तेव्हा ज्याची विचारपूस होते तो देखील मनोमन सुखावलेला असतो. आपल्याच कुटुंबातील नात्यातील ताई, वहिनी आपल्याशी बोलतेय असं वाटतं.

यामुळेच एखाद्याला व्यथा मांडायची असली किंवा कौटुंबिक त्याच्या त्याच्या जीवनातील आनंदाचे क्षण सौ. निलम वहिनींशी शेअर करताना निश्चितच मनाचा मोकळेपणा असतो. सर्वसामान्यांच्या कुणाच्याही मदतीला धावणारी ही माऊली राणे परिवाराची सावली सौ. निलम वहिनींना श्री देव रामेश्वराने उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य द्यावे..अशी प्रार्थना!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -