Wednesday, July 24, 2024
Homeमहाराष्ट्रPune News : फर्ग्युसन रस्त्यावरील अनधिकृत हॉटेल, पबवर बुलडोझर कारवाई

Pune News : फर्ग्युसन रस्त्यावरील अनधिकृत हॉटेल, पबवर बुलडोझर कारवाई

मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर पुणे पोलिसांसह महापालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर

पुणे : पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील ‘एल ३ लिक्विड लिजर लाऊज’ या पबमधील बाथरूममध्ये मुले ड्रग्स घेतानाचा व्हीडिओ दोन सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षातील नेतेमंडळी अधिक आक्रमक होऊन, महायुती सरकारच्या कारभारावर टीका करण्यास सुरुवात झाली. त्याच दरम्यान पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पबवर कठोर कारवाई करावी, अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले. त्यानंतर पुणे पोलीस, महापालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे पाहण्यास मिळत असून मंगळवारी सकाळपासून फर्ग्युसन रोडवरील अनधिकृत हॉटेल, पब विरोधात बुलडोझरच्या माध्यमातून कारवाई सुरू केली आहे.

पबमध्ये प्रवेश देण्यापूर्वी वयाची शहानिशा करण्यात यावी. अल्पवयीन मुलांना पबमध्ये प्रवेश देऊ नये, तसेच त्यांना मद्य विक्री करण्यात येऊ नये. रात्री दीड वाजेनंतर पब सुरू ठेऊ नयेत. नागरिकांना त्रास झाल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल, अशा सूचना पब चालकांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही मात्र या आदेश आणि नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे या व्हीडिओमध्ये असलेल्या वेळेवरून स्पष्ट होत आहे. त्यानंतर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईला सुरुवात झाली.

आरोपींना २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी

ललित पाटील ड्रग्स प्रकरणानंतर पुणे शहरात कोट्यवधींचे ड्रग्स पकडण्यात आले होते. पोलिसांनी कडक कारवाई करत शहर पिंजून काढले होते. त्यानंतर कल्याणीनगर अपघात प्रकरण घडले. त्यामध्ये अल्पवयीन मुलांना सर्रासपणे दारू, ड्रग्स देतानाचे व्हीडिओ समोर आले. त्यावरून पोलिसांनी पुन्हा पब, बारबाबत कडक नियमावली जाहीर केली; परंतु रविवारच्या ड्रग्स फर्ग्युसन रस्त्यावरील ड्रग्स प्रकरणाने पुन्हा प्रशासन थंड झाले आहे का? असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. त्यावरून आता पोलीस, महापालिका यांनी कडक कारवाईला सुरुवात केली आहे.

त्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील आणि दोन बीट मार्शल यांना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी काढले आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पुणे पोलिसांनी एल ३ लिक्विड लिजर लाऊज हे पब सील करीत या प्रकरणी रवी माहेश्वरी, उत्कर्ष देशमाने, योगेंद्र गिरासे, मानस मलिक, अक्षय कामठे यासह अन्य तिघांना असे एकूण आठ जणांना अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -