Thursday, May 9, 2024
Homeताज्या घडामोडीMaratha and Dhangar Reservation : मराठा समाज धनगरांच्या पाठीशी; आरक्षण घेतल्याशिवाय गप्प...

Maratha and Dhangar Reservation : मराठा समाज धनगरांच्या पाठीशी; आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही

धनगरांच्या दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंचा निर्धार

अहमदनगर : दसर्‍यानिमित्त आज राज्यभरात राजकारण्यांचे मेळावे (Dasara Melava) तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारला दिलेल्या मुदतीचा शेवटचा दिवस यामुळे आजचा दिवस राजकारण आणि आरक्षणाच्या दृष्टीने राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याचं राजकारण प्रचंड तापलं असून आता मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) शेवटच्या दिवशी काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. मराठ्यांसोबतच आरक्षणासाठी धनगर (Dhangar), ओबीसी (OBC) समाजही पेटून उठले आहेत. दरम्यान, आज दसरा मेळाव्यानिमित्त मनोज जरांगे अहमदनगरमधील चौंडी येथील धनगर समाजाच्या मेळाव्यात सहभागी झाले होते. यावेळेस मराठा समाज धनगरांच्या पाठीशी आहे, आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही, असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलं.

धनगर मेळाव्यात केलेल्या भाषणादरम्यान मनोज जरांगे म्हणाले, सरकारने आम्हाला ४० आणि तुम्हाला ५० दिवस दिले, पण आता तुमच्या पायाला हात लावून सांगतो की आपल्या बाळाला न्याय द्यायचा असेल तर सामान्य धनगरांनी पेटून उठलं पाहिजे. मी देखील आता सोडणार नाही, छाताडावर बसून आरक्षण घेईन असा निर्धार जरांगे पाटलांनी केला. मी शब्द देतो आम्ही ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुढे ते म्हणाले, तुम्हाला सावध व्हावं लागेल, मराठा बांधव धनगर समाजाच्या मागे उभा राहील. मला माझ्या जातीशी दगाफटका करता आला असता, पण मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे. आता सरकारला दिलेली मुदत संपत आली आहे. त्यांचे फोन येत आहेत की अभ्यासाला वेळ पाहिजे पण आम्ही नकार दिला. अभ्यास खूप झाला, काय वाचतायत कुणास ठाऊक. त्यामुळे आता काहीही होऊ दे आता आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही, असं मनोज जरांगे यांनी या दसरा मेळाव्यात म्हटलं.

मुलगा म्हणून माझी तुम्हाला विनंती

सरकारला आरक्षण द्यावंच लागेल. पण त्यासाठी तुम्हाला एकत्र यावं लागेल. तुम्ही घराघरांतून एकत्र या मग आपण एकत्र येऊन पाहू आरक्षण कसं मिळत नाही. आपलं दुखणं एकच, पडलेलं सरकार म्हणत की आमचं सरकार आलं की आरक्षण देऊ. म्हणून मी तुम्हाला मुलगा म्हणून सांगतो, विनंती करतो तुम्ही उद्यापासून एकत्र आलात तर सरकारचं डोकं ठिकाणावर येईल. ५० दिवस वाट पाहू नका. आम्हाला पण ४० दिवस दिले आणि शेवटाला आले. तुम्ही जर आम्हाला आरक्षण देत नाही, तर आम्ही पण तुमच्या दारात येणार नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.

लेकरांसाठी आपल्याला लढा उभारायचा आहे

आपल्यासाठी नाही तर आपल्या लेकरांसाठी आपल्याला लढा उभारायचा आहे, त्यासाठी आरक्षण हवंय. म्हणून आता आम्ही शांततेत लढा उभारण्याचं निश्चित केलं आहे. तर आज दसऱ्याची शपथ घेऊ, की आरक्षणाशिवाय आता दुसरा विषय बोलायचाच नाही, असा निर्धार जरांगे पाटलांनी केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -