Friday, May 10, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलखेळ आला रंगात...

खेळ आला रंगात…

  • काव्यकोडी: एकनाथ आव्हाड

खेळ आला रंगात…
एकदा म्हणाले बाबा
नवा खेळ खेळूया…
कोडी घालतो तुम्हाला
गाण्यात तुम्ही उत्तर द्या…
‘पुढचे पाय छोटे छोटे
मागचे लांब पाय,
उंच उड्या मारून कोण
क्षणात दूर जाय?’
‘पोटाला पिशवी, त्याच्या
पिशवीत पिल्लू बसे
अशा रूपात बाबा अहो,
कांगारूच दिसे…!’
‘शाकाहारी आहे तो,
खादाडही आहे खूप,
सांगा कान कुणाचे
भले मोठ्ठे सूप?’
“नाक एवढे लांब की,
जमिनीवर लोळे
हत्तीच तो ना बाबा
त्याचे चिमुकले डोळे…!”
“रंग करडा-राखाडी,
शेपटी झुपकेदार,
जरा खुट्ट वाजले की,
कोण होई पसार?”
“इकडून तिकडे तिकडून इकडे
टुणटुण उड्या मारी
खारंच ती ना बाबा
सरसर चढे झाडावरी…!”
कोडी घालण्याचा खेळ
आला खूपच रंगात,
कोड्याचेही उत्तर आम्ही
देतो सुरेल ढंगात…

१) गुलाबी शहर म्हणून
हे नावारूपास आले
हवामहल, जय महल
हे राजवाडे येथले.
जंतरमंतर वेधशाळेची
आहे मोठी ख्याती
राजस्थानची राजधानी
आहे बरं कोणती?

२) यमुना नदीच्या काठावर
आहे वसलेले,
प्राचीन परंपरेचे वरदान
त्यास लाभलेले.
उत्तर प्रदेशातील हे शहर
पर्यटन केंद्र झाले,
ताजमहाल वास्तूचे जतन
कोणत्या शहरात झाले?

३) संसद भवन, राष्ट्रपती भवन
सर्वोच्च न्यायालय येथे
भारताच्या राज्यकारभाराचे
मुख्य केंद्रच आहे ते.
आपल्या देशाची राजधानी
हे शहर आहे मोठे,
कुतूब मिनार, बिडला मंदिर
जामा मज्जित कोठे?

-उत्तर –
१)दिल्ली
२)आग्रा
३)जयपूर

eknathavhad23 @gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -