Tuesday, May 7, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनमहाराष्ट्राच्या संस्कृतीचे अंतरंग

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे अंतरंग

  • मायभाषा : डॉ. वीणा सानेकर

एखाद्या प्रदेशाची संस्कृती समजून घेताना तेथील सण, उत्सव, लोकभाषा, दैवते, श्रद्धा, परंपरा, खाद्यपदार्थ, एकूण जीवनशैली, विचारप्रवाह असे अनेक आयाम लक्षात घेणे गरजेचे ठरते.

महाराष्ट्र दिनाचे स्वागत करताना या भूमीच्या सांस्कृतिक जीवनाचा प्रदीर्घ पटाविषयीचा नितांत आदर मनात आहे. या संस्कृतीचे विविध पैलू अनेक विचारवंतांनी, अभ्यासकांनी उलगडले आहेत. अशा पुस्तकांपैकी निवडक पुस्तकांविषयीची चर्चा या लेखात करूया.

पु. ग. सहस्त्रबुद्धे यांचे महाराष्ट्र संस्कृती हे जवळपास ८३५ पृष्ठांचे पुस्तक. सातवाहन ते यादव काल, बहामनी व मराठा काल आणि ब्रिटिश काल अशा तीन भागांमध्ये या पुस्तकाची रचना झाली आहे. त्या त्या काळातील कला, साहित्य, संस्कृतीचे ठसे यांचा विस्तृत मागोवा हे पुस्तक घेते. स्वातंत्र्यानंतर येथील सांस्कृतिक वैभवाला घरघर लागली. तरुणांमधील ऊर्जाच या भूमीचा उत्कर्ष घडवून आणेल, असे सहस्त्रबुद्धे म्हणतात.

महाराष्ट्राच्या संस्कृतीसंदर्भातील चिंतन व मांडणी करणाऱ्या लेखकांमध्ये स्त्री लेखिकांची नावे उद्धृत करणे महत्त्वाचे आहे. इरावती कर्वे आणि दुर्गाबाई भागवत यांनी सखोल चिंतनातून संस्कृतीविषयक मांडणी केली. एखाद्या प्रदेशाची संस्कृती समजून घेताना तेथील सण, उत्सव, लोकभाषा, दैवते, श्रद्धा, परंपरा, खाद्यपदार्थ, एकूण जीवनशैली, विचारप्रवाह असे अनेक आयाम लक्षात घेणे गरजेचे ठरते.

प्र. न. जोशी यांचे १८९२ साली प्रकाशित एक पुस्तक हाती लागले. या पुस्तकाचे नाव लक्षवेधी आहे. ‘जुने दोरे नवे धागे’ असे त्याचे नाव आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत असे म्हटले आहे की, नव्याचे स्वागत मनाने होत असले तरी जुन्याचे संबंध एकदम सोडावेत, असे घडत नाही.
वर्तमान काळातील अनेक पारंब्या भूतकाळात रुजलेल्या असतात. काळाच्या विविध टप्प्यांवर बदलत गेलेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा समजून घेण्याचा प्रयत्न आज नि उद्याच्याही संदर्भात मौलिक आहे. ‘लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा’ हे डॉ. तारा भवाळकर यांचे पुस्तक. या पुस्तकात त्या म्हणतात की, वस्तुरूप पसारा म्हणजे संस्कृती नव्हे. मानवी संस्कृतीत भावना व विचारांचे स्थान मोठे आहे.

द. ता. भोसले यांनी त्यांच्या ‘संस्कृतीच्या पाऊलखुणा’ या पुस्तकातून महाराष्ट्राच्या लोकमानसाचा वेध घेतला आहे. हा वेध घेताना ग्रामसंस्कृतीचे पैलू त्यांनी विशेषत्त्वाने उलगडले आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीला अनेक अंगानी उलगडण्याचा प्रयत्न राजारामशास्त्री भागवत, ज्ञानकोशकार केतकर, इतिहासाचार्य राजवाडे, श्री. म. माटे, य. दि. फडके अशा दिग्गजांनी केला.
हे सर्व ज्ञानसंचित समजून घेण्याचा प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे, असे मी मानते. महाराष्ट्राला केवळ भूगोल नाही, तर लखलखीत इतिहास आहे. त्याच्या अंतरंगात डोकवल्याखेरीज महाराष्ट्र समजून घेता येणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -