Tuesday, April 30, 2024
Homeक्रीडाइंग्लंडला उशीरा गवसला सूर

इंग्लंडला उशीरा गवसला सूर

रूट-मॅलनची नाबाद शतकी भागीदारी

ब्रिस्बेन :कर्णधार ज्यो रूटसह (खेळत आहे ८६ धावा) ‘वनडाऊन’ डॅविड मॅलनच्या (खेळत आहे ८० धावा) रूपाने इंग्लंडला उशीरा का होईना, सूर गवसला. आघाडी फळी बहरल्याने इंग्लंडने अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात २ बाद २२० धावा करताना ‘कमबॅक’ केले.

पहिल्या डावातील २७८ धावांच्या मोठ्या पिछाडीमुळे इंग्लंडचा दुसऱ्या डावात कस लागणार होता. शुक्रवारी दोन सत्रे खेळून काढताना त्यांनी सामन्यातील आव्हान कायम ठेवले. कर्णधार रूटने मॅलनसह तिसऱ्या विकेटसाठी १५९ धावांची भागीदारी करताना यजमानांचे वर्चस्व कमी केले. पाहुणे अद्याप ५८ धावांनी पिछाडीवर असले तरी रूट आणि मॅलनने दाखवलेला संयम पाहता ऑस्ट्रेलियाला विजयाची तितकी संधी नाही. दुसऱ्या डावात रूटचे सर्वाधिक योगदान आहे. तो ८६ धावांवर खेळत आहे. त्याच्या १५८ चेंडूंतील नाबाद खेळीत १० चौकारांचा समावेश आहे. मॅलनने ११७ चेंडूंत नाबाद ८० धावा काढताना कॅप्टन इतकेच चौकार मारलेत.

हसीब हमीदने (२७ धावा) सावध सुरुवात केली तरी अन्य सलामीवीर रॉरी बर्न्सला (१३ धावा) लवकर बाद करण्यात कर्णधार, वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला यश आले. मॅलनने हमीदसह दुसऱ्या विकेटसाठी ३८ धावा जोडताना संघाला सारवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मिचेल स्टार्कने जोडी फोडली. हमीदसह बर्न्सचे झेल यष्टिरक्षक अलेक्स कॅरीने टिपले. चहापानापर्यंत दोन विकेट मिळाल्या तरी तिसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना यश मिळाले नाही. रूट आणि मॅलनने केवळ यजमान गोलंदाजांना खेळून काढले नाही तर ३.२४च्या सरासरीने धावा केल्या.

तत्पूर्वी, ७ बाद ३४३ धावांवरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाने ४२५ धावांची मजल मारली. त्याचे क्रेडिट मधल्या फळीतील ट्रॅव्हिस हेडसह (१५२ धावा) सलामीवीर डेव्हिड वॉर्नरसह (९४ धावा) वनडाऊन मॅर्नस लॅबुशेनला (७४ धावा) जाते. हेडने तिसऱ्या दिवशी वैयक्तिक धावसंख्येत आणखी ४० धावांची भर घातली. त्याला मिचेल स्टार्कची (३५ धावा) चांगली साथ लाभली. हेडच्या १४८ चेंडूंतील दीडशतकी खेळीत १४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. यजमानांचा डाव १०४.३ षटके चालला. ४२५ धावांचा डोंगर उभा करताना त्यांनी पहिल्या डावात २७८ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. इंग्लंडकडून मध्यमगती गोलंदाज ऑली रॉबिन्सन आणि मार्क वुडने प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. ख्रिस वोक्सला दोन विकेट मिळाल्या.

पावसाने घेतला ‘ब्रेक’
पहिल्या दिवशी गोंधळ घालणाऱ्या पावसाने पुढील दोन दिवस ‘ब्रेक’ घेतला. पहिल्या दिवशी पावसासह अंधुक प्रकाशामुळे ४० षटकांचा खेळ वाया गेला तरी दुसऱ्या दिवशी ब्रिस्बेनमध्ये विना व्यत्यय ८४ षटकांचा खेळ झाला. तिसऱ्या दिवशी, शुक्रवारी ८६.३ षटके टाकण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -