Tuesday, May 7, 2024
Homeमनोरंजनमिसेस उपमुख्यमंत्र्यांची ‘अमृतवाणी’ बॉलिवूडमध्ये

मिसेस उपमुख्यमंत्र्यांची ‘अमृतवाणी’ बॉलिवूडमध्ये

दीपक परब

अमृता देवेंद्र फडणवीस म्हणजे माजी मुख्यमंत्री किंवा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी इतकीच अमृता फडणवीस यांची ओळख नसून त्यापलीकडे एक गायिका म्हणूनही त्यांची ओळख सर्वांना झाली आहे. त्या बँकर असल्या तरी त्यांच्यातील गाण्याची हौस त्यांना काही गप्प बसू देत नाही. त्यामुळेच त्या कधी स्वत:चा अल्बम प्रदर्शित करत असतात, तर कधी सोशल मीडियावर गाण्याचे व्हीडिओ शेअर करत असतात. त्यांचे संगीतावरील असलेल्या प्रेमातून हे सारे घडत आहे. आता अमृता यांच्याविषयी आणखी एक बातमी पुढे आली असून सोशल मीडियाचे पेज, टीव्ही स्क्रिन यांतून त्यांनी एक पाऊल पुढे टाकत बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे.

सध्या त्या अभिनय करणार नसून त्यांनी नव्या सिनेमात एक रोमँटिक गाणे गायले आहे. अलीकडेच त्यांचे सिनेमातील गाणे रिलीज झाले आहे. प्रख्यात गायक शान याच्यासोबत अमृता यांनी सूर लावला आहे. ‘यू लोकतंत्र’ हा सिनेमा १४ ऑक्टोबरला प्रदर्शित झालाय. या सिनेमाच्या नावावरून अंदाज येईल की, लोकतंत्रासारख्या राजकीय विषयावर हा सिनेमा बनलेला आहे. पण सिनेमाचा विषय काहीही असो, त्यात एक ‘लव्हस्टोरी’ आहेच व ती असल्यास रोमँटिक गाणेही हवेच आणि त्याच रोमँटिक गाण्याला आवाज देत अमृता फडणवीस यांनी बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली आहे. ‘ना जाने क्यू धडका ये दिल’ असे या नव्या गाण्याचे बोल आहेत. गाणे रिलीज होताच अमृता यांचे काही नेटकऱ्यांनी कौतुक केले, तर काही यूजर्सनी नेहमीप्रमाणे त्यांची चेष्टा केली आहे. पण अमृता यांनी त्याकडे कानाडोळा केला आहे. अमृता फडणवीस यांनी यापूर्वी अनेक गाणी गायली आहेत आणि अल्बम रिलीज केले आहेत. बॉलिवूड गायक सोनू निगमसोबत एका अल्बमसाठीही त्यांनी गाणे रेकॉर्ड केले होते. वो तेरे प्यार का नाम, शिव तांडव, तेरी मेरी फिर से, बेटिया ही त्यांची गाणी गाजली आहेत.

येतोय छत्रपतींचा ‘सुभेदार’

संवेदनशील अभिनेता, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर याने नुकतीच शिवराज अष्टकातील पाचव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित चार चित्रपट यापूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता शिवराज अष्टकातील पाचव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचं दर्शन घडवणाऱ्या चित्रपटांचा बोलबाला आहे. नुकताच डॉ. अमोल कोल्हे यांचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सुबोध भावेचा ‘हर हर महादेव’ देखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. आता लोकप्रिय दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट शिवरायांच्या जीवनावर आधारलेल्या शिवराज अष्टकातील पाचवा चित्रपट असणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.

दिग्पाल लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाचं नाव ‘सुभेदार’ असून हा चित्रपट महाराजांचे बालपणीचे सवंगडी, शूर मावळे सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर आधारलेला असणार आहे. तानाजी मालुसरे यांनी महाराजांना कोंढाणा किल्ला जिंकून देण्यासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावली. शेवटपर्यंत प्राणपणाने लढणाऱ्या या मावळ्यांच्या पराक्रमाची गाथा आता ‘सुभेदार’ या चित्रपटातून दिसणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट जून २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या पूर्वी शिवराज अष्टकमधील शिवरायांचा पराक्रम दाखवणारे चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आलेत. त्यात ‘फर्जंद’ , ‘फतेशिकस्त’, ‘शेर शिवराज’ आणि ‘पावनखिंड’ या चित्रपटांचा समावेश आहे. आता ‘सुभेदार’ हा पाचवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटात चिन्मय मांडलेकर शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर आता तानाजीची भूमिका कोण करणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी अजय देवगण याच्या ‘तानाजी’ चित्रपटातून हा इतिहास प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला होता. त्यामुळे छत्रपतींच्या या पराक्रमी निष्ठावान सरदारावरील चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत हे निश्चित.

स्पृहाचीही स्वप्नपूर्ती… मराठी काय तेलुगूमध्येही केले काम

अभिनेत्री स्पृहा जोशीने नुकताच ३३ वा वाढदिवस साजरा केला आहे. मराठी टेलिव्हिजन आणि सिनेविश्वात स्पृहाने तिची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्पृहा तिच्या कवितांसाठी, सूत्रसंचालनासाठीही चाहत्यांची आवडती आहे. ‘उंच माझा झोक’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या तिच्या मालिका आजही आवडीने पाहिल्या जातात. तिने नाट्य क्षेत्रातही उल्लेखनीय काम केले आहे. पण स्पृहाने तेलुगूमध्येही काम केले आहे. स्पृहाने एका तेलुगू जाहिरातीत काम केले आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात तिने याविषयी इन्स्टाग्राम पोस्टही शेअर केली होती. यावेळी तिने तिला दाक्षिणेत काम करण्याची किती इच्छा होती आणि तिचे स्वप्न कसे पूर्ण झाले याविषयी सांगितले आहे.

कोणतीही पहिली गोष्ट खास असते असे म्हणत. स्पृहाने आनंद व्यक्त केला व या जाहिरातीच्या सेटवरील काही फोटोही शेअर केले आहेत. स्पृहाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिने तिचा या जाहिरातीतील सहकलाकार निशांक वर्मा आणि दिग्दर्शक रोशनी चंद्रा यांच्यासोबतचेही फोटो पोस्ट केले आहेत. तेलुगू जाहिरातीतील पदार्पणाविषयी स्पृहाने म्हटले की, ‘स्वप्न सत्यात उतरताना, मला दक्षिणेकडे काम करायचे होते. कामाच्या नीतिमत्तेविषयी ऐकले होते आणि मग ही संधी आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -