Friday, May 10, 2024
Homeसाप्ताहिककोलाजCrime : चेक की कॅश?

Crime : चेक की कॅश?

  • क्राइम : अ‍ॅड. रिया करंजकर

बरेचदा पैशाचे व्यवहार करताना पावलोपावली अनेक धोके माणसाला मिळत असतात. कधी कधी आर्थिक गरज भागवण्यासाठी मनुष्य नातेवाइक किंवा मित्रांकडून पैसे उसनवारी किंवा व्याजावर उचलतो. पण अनेकदा देणेकरी-घेणेकरी याचा गैरफायदाही घेऊ शकतात. त्यामुळे देण्याचे असो वा घेण्याचे आर्थिक व्यवहार करताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगायला हवीच.

पैसा हा व्यवहारासाठी आवश्यक असलेली प्राथमिक गरज आहे. ज्यावेळी व्यक्तीला आणि अडचणी निर्माण होतात त्यावेळी तो आपली आर्थिक गरज भागवण्यासाठी आपल्या नातेवाइकांकडे किंवा मैत्रीमध्ये पैशाची तात्पुरती मागणी करतो. हे पैसे तो उसनवारी किंवा व्याजावर उचलतो आणि आपली गरज पूर्ण करतो आणि ज्यावेळी वेळ येते, त्यावेळी तो पैसे देतो किंवा त्याच्या अगोदरही पैसे पूर्ण करतो. नाही जमल्यास दर महिन्याला ठरलेलं व्याज देत राहतो.

सुरेंद्र याला आर्थिक अडचण निर्माण झाल्यामुळे काही रकमेची गरज होती. तो व्याजाने हे पैसे उचलायला तयार होता. त्याने नातेवाइकांकडे तशी विचारणा केली. पण महिना वगैरे असल्यामुळे एवढी मोठी रक्कम कोणाकडे नव्हती. म्हणून त्याने आपल्या मित्र-परिवारामध्ये आपली आर्थिक अडचण सांगितली. व त्यामधील एका मित्राने म्हणजेच भरतने त्याला मदत करायचं ठरवलं आणि त्या ऐवजी दर महिन्याला तो व्याज घेणार, असे त्याने सांगितलं. रक्कम होती एक लाखापर्यंत. सुरेंद्र यांनीही दर महिन्याला व्याज देईन व लवकरात लवकर पैसे परत करेल, असं आश्वासन भरतला दिले. दहा टक्के व्याजाने भरतने सुरेंद्रला पैसे दिले. पहिली एक लाखाची रक्कम देताना त्यामधील १०००० व्याज त्या महिन्याचे कापून घेऊन ९० हजार रुपये सुरेंद्रला दिले गेले. सुरेंद्रने दोन महिने वेळेवर व्याज दिले. दोन महिन्यांत लगेच भरतने पैशाची मागणी केली. म्हणून सुरेंद्रने त्याला एक लाख रुपयाचा चेक दिला व लवकर टाक असे सांगितले. पण भरतने काही दिवसांनंतर चेकवरची रक्कम ही पाण्याने भिजली असं सांगून पुन्हा नवीन चेक मागून घेतला. सुरेंद्रने पुन्हा नवीन चेक त्याला दिला.

चेक देऊन महिना झाला तरी भरतने तो चेक बँकेमध्ये टाकला नाही. काही दिवसांनी भरत सुरेंद्रकडे पैशाची मागणी करू लागला. सुरेंद्रने सरळ सांगितलं की, “पहिला चेक दिला त्याची रक्कम तू पाण्यात भिजली अशी सांगितली म्हणून मी परत तुला चेक दिला त्याला आता एक महिना झाला आणि आता परत चेक देऊनही तू माझ्याकडे पैशाची मागणी करतो कसा?” भरत म्हणाला, “चेक नको, पैसे हवेत.” सुरेंद्र म्हणाला, “तू अगोदरच सांगायचं होतं चेक देताना. पहिला चेक दिला त्याला महिना झाला. दुसरा चेक दिला महिना झाला. दोन महिने तू चेक स्वतःकडेच ठेवले आणि आता तू दोन महिन्यांचे व्याज मागत आहेत. मी तुला चेक देऊन केव्हाच मोकळा झालेलो होतो. तू चेक बँकेत टाकणार नाही आणि माझ्याकडे व्याज मागत बसणार, ही कितपत योग्य गोष्ट आहे.”

दुसऱ्या दिवशी भरतने सुरेंद्रला फोन करून सांगितलं, “मला जर पैसे दिले नाहीस, तर मी तुझ्याविरुद्ध कोर्टात केस दाखल करेल.” सुरेंद्र यांनी सरळ सांगितलं की, “मी तुला जे दोन चेक दिले. त्या दोन्ही चेकची कॉपी माझ्याकडे आहे आणि मी साक्षी-पुराव्यानुसार तुला ते चेक दिलेले आहेत. चेक देताना तू कॅश हवी, असं सांगितलं नव्हतं. आता दोन महिन्यांनंतर तू मला कॅश दे आणि व्याजासकट दे असे म्हणतोय ते कितपत योग्य आहे?” आणि या गोष्टीवरून सतत भरत सुरेंद्र याला धमकी देण्याचे फोन करू लागला. धमकीचे फोन येऊ लागले म्हणून सुरेंद्र यांनी भारत विरुद्ध पोलीस तक्रार नोंदवली.

चेक देऊनही भरत सुरेंद्रकडे पैशाची मागणी करत होता. तीही लालसेपोटी… कारण दोन महिने त्याने चेक टाकले नव्हते. दोन महिन्यांचे व्याज वीस हजार आपल्याला मिळतील, यासाठी तो सुरेंद्रला सतवत होता. भरतने वेळेवर सुरेंद्रला मदत केलेली होती. सुरेंद्रनेही वेळेच्या अगोदरच त्याला पैशांचे चेक दिले होते. पण चेक वटवण्यात हलगर्जीपणा भरत करत होता. जेवढं लेट होईल, तेवढे आपल्याला व्याज मिळेल हा चुकीचा विचार भरतच्या डोक्यात होता. पैशाचे व्यवहार करताना असेही धोके माणसाला पावलोपावली मिळत असतात.

(सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -