Thursday, May 9, 2024
Homeदेशकोरोना परत आला, पण घाबरु नका; मास्क वापरा!

कोरोना परत आला, पण घाबरु नका; मास्क वापरा!

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची राज्यात एंट्री; मुंबईतही कोरोनाचे वाढते रुग्ण, पालिका प्रशासन सतर्क

मुंबई : राज्यासह देशात कोरोना व्हायरसने (Coronavirus Cases) पुन्हा एकदा एंट्री केली आहे. कोरोना (Corona) व्हायरसच्या जेएन १ (JN.1) या नव्या व्हेरियंटमुळे गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. अमेरिका, सिंगापूर, चीननंतर आता भारतातही जेएन १ व्हेरियंटने शिरकाव केला आहे. देशातील पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आल्यानंतर काल सिंधुदुर्गमध्येही जेएन १ चा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे.

मुंबई महापालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी दक्षा शाह यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत सूचना दिल्या आहेत. दक्षा शाह यांनी कोरोनाच्या नवीन व्हेरियंटसंदर्भात माहिती देताना सांगितले की, कोरोनाचा जेएन १ नावाचा हा नवा व्हेरीयंट सौम्य स्वरुपाचा आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नका. मुंबई महानगरपालिकेकडून रुग्णांच्या उपचारा संदर्भात सर्व उपाययोजना आणि तयारी करण्यात आली आहे.

मुंबईत पालिका प्रशासनाने या आजाराविरोधात लढण्यासाठी सर्व तयारी केली आहे. या तयारीचा काल पालिका आयुक्तांनी देखील आढावा घेतला आहे. रुग्णालयांमध्ये खाटा, औषध सगळं किती आहे? याचा आढावा घेतला आहे, असे शाह यांनी सांगितले.

शाह म्हणाल्या, सध्या भारत सरकारकडून जे निर्देश आले आहेत, तसेच काम केले जाईल. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आरटीपीसीआर टेस्ट सुद्धा वाढवायच्या आहेत. चाचण्या करून नव्या व्हेरियंटचे संक्रमण तपासण्यात येणार आहे, असे शाह म्हणाल्या.

मास्क सक्ती करणार का? असे विचारले असता शाह म्हणाल्या, हा व्हेरियंट सौम्य आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र, काळजी घेणे गरजेचे आहे. स्वच्छतेचे पालन करायचे आहे. सर्दी, खोकला, ताप असल्यास नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. मास्क घालण्याबाबत सध्या सक्ती नाही. मात्र, काळजी म्हणून नागरिक स्वतः इच्छेने मास्क वापरू शकतात. ज्यांना लक्षण जाणवतात त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये. खोकला, सर्दी ही लक्षण असल्यास जवळच्या महानगरपालिका रुग्णालयात जाऊन टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन शाह यांनी केले आहे.

दरम्यान, केरळ, दिल्ली, गोवा, महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून बैठक देखील घेण्यात आली. या बैठकीमध्ये केंद्राकडून राज्यांना अलर्ट मोडवर राहण्यास सांगितले आहे. रुग्णालयाची तयारी, देखरेख आणि मॉक ड्रिलसह तयार राहण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -