Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीलोका सांगे ब्रह्मज्ञान

लोका सांगे ब्रह्मज्ञान

समर्थ कृपा – विलास खानोलकर

स्वतःस सुधारक प्रगत, अत्याधुनिक समजणारे मुंबई-पुण्याकडचे दोघे जण श्री स्वामी समर्थांचे नावलौकिक ऐकून अक्कलकोटला आले. पण संशयी वृत्तीच्या या दोघांना श्री स्वामी समर्थ महाराज दिसत नव्हते. त्याचवेळी दिगंबर अवस्थेत कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास मात्र फार गर्दी उसळली होती. त्या दोघांना श्री स्वामींचे दर्शन घेणारी, ती उसळलेली गर्दी दिसत होती. पण त्यांना श्री स्वामी समर्थ दिसत नव्हते. सर्वांना दिसणारे श्री स्वामी समर्थ आपल्याला का दिसत नाही म्हणून ते दोघे गोंधळले, गडबडले मनोमन चांगलेच चरकलेसुद्धा.

सर्वांना दिसणारा परमात्मा आपणास दिसत नाही, याचा त्यांना पश्चाताप झाला. ते शरणागत होऊन मनोमन श्री स्वामींची क्षमा मागू लागले. वारंवार करुणा भाकू लागले. तेव्हा दयाधन श्री स्वामींनी त्यांना दर्शन दिले. त्या दर्शनाने ते श्री स्वामींचे दास झाले. ज्या दुष्ट, छलक आणि चिकित्सक बुद्धीने ते आले होते. त्याबाबत ते ओशाळले. श्री स्वामींचा पर्दाफाश करून, लगेच माघारी परत येऊ, या उद्देशाने त्यांनी त्यांचे सामानसुमानही स्टेशनवर क्लॉक रूममध्ये ठेवून आले होते. सर्वसाक्षी श्री स्वामी ‘स्टेशनवर सामान ठेवून आलात का?’ म्हणून विचारताच त्यांचाच पर्दाफाश झाला. ते लाजले. त्यांचा देहाभिमान गळाला. नंतर श्री स्वामींचे आशीर्वचन, प्रसाद घेऊन ते प्रसन्न मुद्रेने स्वस्थानी परतले.

अर्थ : स्वतःला बुद्धिवादी, चिकित्सक, सुधारक, प्रगत, अत्याधुनिक वा सुधारणावादी समजणारे अनेकदा ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण’ असतात.

अनेकदा ते स्वतःच्या बुद्धिवादी, सुधारणावादी ताठ्यात समूहमन, संवेदना हरवून बसलेले असतात. आपणच तेवढे शहाणे, विद्वान, प्रगत आणि इतर मात्र अडाणी अशा आचार-विचार-वृत्तीचे लोक तेव्हा होते, सद्धस्थितीतही आहेत. अशा लोकांना सत्यम्-शिवम्-सुंदरम् तत्त्वाचा अनेकदा विसर पडलेला असतो. आपलेच खरे, इतरांचे खोटे असा त्यांचा टोकाचा दुराग्रह असतो. अनेकांच्या बाबतीत त्यंची छिद्रन्वेषी दृष्टी आणि अनाठायी, अनावश्यक चौकसबुद्धी असते, तशी या लीला कथेतील त्या दोघांची होती. खरं तर जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले। तोचि साधू ओळखावा। देव तेथेची जाणावा।। ही दृष्टी, हा बोध घेतला तरी खूप काही पुण्य साध्य केल्यासारखे होईल.

।। तारक मंत्र।।

ॐ हरि निःशंक होई रे मना। निर्भय होई रे मना।।
प्रचंड स्वामीबळ नित्य पाठीशी आहे रे मना।।
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी।
अशक्य ते शक्य करतील स्वामी।। १।।

जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय।
स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय।।
आज्ञे विना काळ ना नेई तयाला।
परलोकीही ना भिती तयाला।। २।।

उगाची भितोसी भय हे पळू दे।
वसे अंतरी हि स्वामीशक्ती कळू दे।।
जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा।
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा।। ३।।

खरा होई जागा श्रध्दे सहित।
कसा होसी त्याविण तु स्वामी भक्त।।
आठव कितीदा दिली त्यांनीच साथ।
नको डगमगू स्वामी देतील हात ।। ४ ।।

विभूती नमननाम ध्यानादी तीर्थ।
स्वामीच या प्राण पंचामृतात।
हे तीर्थ घेई आठवी रे प्रिचती।
न सोडिती तया जया स्वामी घेती हाती।। ५।।

।। श्री स्वामी चरणार अरविंदार्पणम अस्तू।।
।। शुभं भवतू।।

vilaskhanolkarkardo@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -