Wednesday, May 8, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलChild story : अनोखी भेट

Child story : अनोखी भेट

  • कथा : रमेश तांबे

प्रिया म्हणाली, “नेहा मला दोन चॉकलेट दे ना!” आजूबाजूच्या मुलींना ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात ती म्हणाली. नेहाला तिच्या हावरटपणाचा खूप राग आला. इतर मुलीदेखील अचंबित झाल्या. पण नाईलाजाने नेहाने प्रियाला दोन चॉकलेट्स दिली. प्रियाचं वागणं तिला अजिबात आवडलं नव्हतं.

आज नेहाचा दहावा वाढदिवस होता. नवे कपडे घालून अगदी नटून थटूनच ती शाळेत पोहोचली. हसत हसत साऱ्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव घेत ती वर्गात पोहोचली आणि “हॅप्पी बर्थ डे”चा गजर झाला. तेवढ्यात बाई वर्गात आल्या. वर्गात शांतता पसरली. नेहा लगेचच बाईंकडे गेली. त्यांंना वाकून नमस्कार केला आणि त्यांना एक कॅडबरी चॉकलेट दिले. बाईंनी शुभेच्छा देताच पुन्हा एकदा साऱ्या वर्गाने “हॅपी बर्थ डे टू यू नेहा”चा गजर केला. साऱ्याजणी तिचा ड्रेस पाहत होत्या. कुठून घेतला, किती किमतीचा, खूप छान… साऱ्या प्रश्नांची उत्तरे देता देतात तिची चांगलीच दमछाक झाली. या साऱ्या गोंधळात प्रिया मात्र लांबच होती. एका वेगळ्या नजरेने ती आपल्याकडे पाहते आहे, असं नेहाला वाटले. प्रिया गरीब घरातली मुलगी होती. थोडी बुजरी होती. वर्गातल्या मुलींशी बोलताना थोडी चाचरायची. पण का कोणास ठाऊक नेहाला मात्र तिच्या नजरेत असूया वाटली. पण लगेेचच प्रियाला विसरून ती इतर मैत्रिणींच्या गप्पांमध्ये सामील झाली.

थोड्या वेळातच नेहा सगळ्यांना चाॅकलेट वाटू लागली. भले मोठे चॉकलेट पाहून साऱ्या वर्गाचे डोळे विस्फारले. नेहा ते प्रत्येक मुलीला देऊ लागली. चॉकलेट वाटताना तिची मान गर्वाने अधिकच ताठ झाली. आपण कोणीतरी मोठ्या आहोत, असं तिला वाटू लागले. आता ती चॉकलेट वाटता वाटता प्रियाच्या जवळ आली. अन् तिला चॉकलेट देऊ लागली. तशी प्रिया म्हणाली, “नेहा मला दोन चॉकलेट दे ना!” आजूबाजूच्या मुलींना ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात ती म्हणाली. नेहाला तिच्या हावरटपणाचा खूप राग आला. इतर मुलीदेखील अचंबित झाल्या. पण नाईलाजाने नेहाने प्रियाला दोन चॉकलेट्स दिली. पुढच्या मुलींना चॉकलेट देताना मात्र तिचं मन थाऱ्यावर नव्हतं. प्रियाचं वागणं तिला अजिबात आवडलं नव्हतं. मनातल्या मनात ती प्रियाचा उद्धार करू लागली. तिला चारचौघात कसं वागायचं हे कसं कळत नाही. अशी एकदम दोन चॉकलेट कशी काय मागते! नेहाला आता तिचा खूप राग आला होता. तिचा आनंदी मूड एकदम बदलून गेला. साऱ्याजणी चॉकलेट खाण्यात मग्न असताना प्रियाने मात्र दोन्ही चॉकलेट्स पटकन दप्तरात ठेवून दिली. नेहा मात्र सारा आनंद विसरून प्रियाचं वागणं कसं चुकीचं आहे यावरच विचार करू लागली.

शाळा संपेपर्यंत प्रिया तिच्या डोक्यातून जात नव्हती. शाळेबाहेर पडल्यावर तिला चांगलेच खडसावले पाहिजे, असे नेहाला वाटू लागले. शाळा सुटताना तिला कितीतरी जणांनी शुभेच्छा दिल्या. पण तिच्या डोक्यात होती फक्त प्रिया! शाळेबाहेर पडल्यावर प्रिया विशेष गर्दी नसलेल्या रस्त्याने चालू लागली. नेहादेखील तिच्या मागून चालू लागली. दहा बारा पावले चालली असतील तोच प्रियाच्या भावाने तिला “ताई” अशी हाक मारली. प्रियाने धावत जाऊन त्याला मिठी मारली. तिने चटकन दप्तरातली दोन चॉकलेट्स बाहेर काढली. त्यातलं एक भावाला दिलं आणि दुसरं आईला दिलं. दोघेही चॉकलेट खाऊ लागले.

“ताई तू खा ना गं” असं तिचा भाऊ म्हणू लागला. तशी प्रिया म्हणाली, “नको रे, आज मला तीन चॉकलेट्स मिळाली होती. मी एक खाल्लं, दोन तुमच्यासाठी ठेवली.” ते समोरचं दृश्य बघून नेहाच्या डोळ्यांत पाणी तरळले. प्रियाचं आपल्या आई-भावावरचं प्रेम बघून नेेहाला अगदी गदगदून आलं. आता तर नेहाला स्वतःचीच लाज वाटू लागली. केवळ एक चॉकलेट जास्त मागितलं म्हणून प्रियाला आपण मनातल्या मनात किती बोललो. तिच्या गरिबीची चेष्टा उडवली. तीन चॉकलेट्स मिळाली, असं तिनं खोटंच सांगितलं. असं चॉकलेट तिने कधीच खाल्लं नव्हतं. तरीही प्रियाने ते स्वतः न खाता आई आणि भावाला दिलं.

प्रियाच्या या कृतीने नेहा तर अगदी भारावूनच गेली. ती धावतच प्रियाकडे गेली आणि तिला गच्च मिठी मारली. नेहाच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. प्रियाला मात्र काहीच कळेना. ती म्हणाली, “अगं ए नेहा, काय झालं? अशी मिठी काय मारतेस? आणि रडतेस कशाला?” पण नेहा काहीच बोलली नाही. तिने दप्तरातलं आणखीन एक चॉकलेट काढलं आणि प्रियाच्या हातावर ठेवलं. प्रियाने चॉकलेटचा पहिला घास नेहाला भरवला आणि मग स्वतः खाल्ला. त्यावेळी नेहा डबडबलेल्या डोळ्यांनी प्रियाकडे पाहत होती. नेहाच्या गालावर ओघळणारा अश्रू प्रियाने स्वतःच्या हाताने पुसला आणि म्हणाली, “अगं नेहा वाईट वाटून घेऊ नकोस. ही गरिबी खूप वाईट असते बघ! तुझं काहीच चुकलं नाही. खरं तर माझंच चुकलं!” नेहा आवाक होऊन प्रियाकडे बघतच राहिली. तिच्या मनाची खरी श्रीमंती, गरिबीनं शिकवलेलं शहाणपण, तो समंजसपणा हे सारं विस्मय होऊन नेहा पाहत होती. अनुभवत होती. प्रियाच्या रूपाने वाढदिवसाची एक आगळी-वेगळी भेट आज नेहाला मिळाली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -