Friday, May 10, 2024
Homeताज्या घडामोडी5 Star Hotel:अनिल परबांनंतर आता रवींद्र वायकरांवर किरीट सोमय्यांचा आरोप; म्हणाले '५००...

5 Star Hotel:अनिल परबांनंतर आता रवींद्र वायकरांवर किरीट सोमय्यांचा आरोप; म्हणाले ‘५०० कोटींचे हॉटेल…

मालमत्तेची सीबीआयने चौकशी करावी अशी सोमय्यांची मागणी

मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रवींद्र वायकर (Ravindra Vaikar) यांच्या ५०० कोटी रुपयांचे ५ स्टार हॉटेल उभारण्यासाठी दिलेली परवानगी महानगरपालिकेने रद्द केल्यानंतर आता रवींद्र वायकर यांच्या मालमत्तांची सीबीआयने (CBI) चौकशी करावी अशी मागणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांनी केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांच्या हात धुवून मागे लागलेले किरीट सोमय्या हे मिलिंद नार्वेकर, अनिल परबांनंतर आता रवींद्र वायकर यांच्यावर कारवाईसाठी प्रयत्न करत आहेत. जोगेश्वरीत खेळाचे मैदान म्हणून आरक्षित असलेल्या जागेत उद्धव ठाकरेंचे खास मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांनी ५०० कोटींच्या किंमतीचे हॉटेल उभारण्याचे काम हाती घेतले आहे, असा आरोप सोमय्या यांनी फेब्रुवारीमध्ये केला होता.

मुंबई महापालिकेची फसवणूक

या जागेवर ९ फेब्रुवारी २००४ रोजी खेळाच्या मैदानाचा १५% भाग स्पोर्ट्स एज्युकेशन सेंटर (Sports education centre) म्हणून विकसित करण्यासाठी रवींद्र वायकर यांनी परवानगी मागितली होती. त्यासमोरच्या जमिनीवर कायमचे मैदान आरक्षित ठेवण्यात येणार असून रिक्रिएशन ग्राऊंड (Recreation Ground) म्हणून त्याचा वापर केला जाईल असे वायकरांनी पालिकेला वचन दिले होते. या भागावर भविष्यात कधीही रवींद्र वायकर आणि त्यांची कंपनी हक्क सांगणार नाही, बांधकाम, डेव्हलपमेंट राईट मागणार नाही, अशा प्रकारचा करार महापालिका, वायकर आणि महल पिक्चर्स प्रा. लि. कंपनीसोबत करण्यात आला होता. म्हणजेच उर्वरित मैदान हे महानगरपालिकेचे मैदान झाले होते. २०२१ मध्ये रवींद्र वायकर यांनी ही गोष्ट लपवली, मुंबई महापालिकेची फसवणूक केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंना माहित असून दिली होती परवानगी

मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट माहित असूनही ५०० कोटी रुपयांचे ५ स्टार हॉटेल उभारण्यासाठी त्यांनी ही जागा वापरण्याची परवानगी दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. गेली २ वर्षे या विषयावर मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र सरकार यांच्याशी आम्ही पाठपुरावा करीत होतो. सप्टेंबर २०२२ नंतर या विषयावर चौकशी सुरु झाली आणि मुंबई महानगरपालिकेने २१ फेब्रुवारी २०२३ रोजी या संबंधात रवींद्र वायकर यांना नोटीस दिली व स्पष्टीकरण मागविले असल्याचे सोमय्या म्हणाले.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार नगरविकास मंत्रालयाने मुंबई महानगरपालिकेला या संबंधी कारवाई करण्यासाठी निर्देश दिले. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने १५ जून २०२३ रोजी वायकर यांना या हॉटेलची परवानगी रद्द केली आहे, अशी माहिती सोमय्या यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -