Friday, April 26, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यसेनेतील बेदिली; मातोश्रीच्या प्रांगणात

सेनेतील बेदिली; मातोश्रीच्या प्रांगणात

संतोष वायंगणकर

महाराष्ट्रात दोन वर्षांपूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार सत्तेवर आले. शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. उद्धव ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आरूढ झाल्यानंतरच एका आदेशावर शिवसेना चालते, असे पूर्वी म्हटले जायचे. त्या शिवसेनेत शह-काटशहाचे राजकारण जोरदार सुरू झाले. शह-काटशह, गटबाजी या गोष्टी कोणत्याच राजकीय पक्षांना अपवाद नाहीत. तो गृहीत धरण्याचाच विषय आहे; परंतु शिवसेनेत किमान वरकरणी तरी तसा ‘सब कुछ आलबेल’ आहे, असा आभास निर्माण केला जायचा; परंतु हा फुगा गेल्या वर्षभरात अनेक वेळा फुटला आहे. याचे कारणही तसेच झाले आहे. शिवसेनेतील दरबारी काहीसे बदललेले नेते ते शाखाप्रमुख या बांधणीत असलेली शिवसेना मधल्या काळात काँग्रेसी अनेक जण सेनेत आले आणि कडवट शिवसैनिक कुठल्या कुठे फेकला गेला. त्यातच शिवसेना नेते असलेले मनोहर जोशी, गजानन कीर्तीकर, लीलाधर डाके असे अनेक दिग्गज आज ज्येष्ठत्वाच्या नावाखाली अडगळीत गेले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर रामदास कदम, सुभाष देसाई असे काही चेहरे नेतेगिरी करत होते. त्यातही गेल्या दोन ते तीन वर्षांत मिलिंद नार्वेकर, विद्यमान परिवहन मंत्री अनिल परब हे सेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय झाले. त्यातच माजी राज्यमंत्री, विधान परिषद सदस्य रामदास कदम यांना वयोवृद्ध म्हणून मंत्रीपद नाकारले गेले. त्याचवेळी सत्तरी पार केलेले सुभाष देसाई यांना उद्योगमंत्रीपद दिले गेले. याची खंत आणि खदखद माजी आमदार रामदास कदम यांच्या मनात होतीच. त्यातच गेले वर्षभर परिवहन मंत्री अनिल परब हे मातोश्रीत उद्धव ठाकरे यांच्या अधिक जवळ गेले, त्याची कारणेही सर्वश्रुत आहेत. त्यामुळे साहजिकच शिवसेनेतील निष्ठावंत समजणारे सारेच नाराज होते. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी शिवसेनेत कोकणची चालायची;

परंतु आता शिवसेनेत कोकण दखलपात्र नाही, ही वस्तुस्थिती आहे. यामुळेच रामदास कदम आणि अनिल परब यांच्यात वाद निर्माण झाले. निमित्त दापोलीतील रिसॉर्टचा विषय आहे. काही तरी निमित्त हवं होतं, ते निमित्त दापोलीतील अनिल परब यांच्या बेकायदा रिसॉर्ट बांधकामावरून मिळाले आणि तो ‘इश्श्यू’ कदम-परब यांच्यातील वादातील कळीचा मुद्दा झाला. मातोश्रीची मर्जी संपादन करण्याचे ‘कसब’ परिवहन मंत्री अनिल परब यांनी चांगलेच अवगत केले. त्यातच मातोश्रीची मर्जी संपादन करण्याचे आणखी एक मोठे परिमाण म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विरोध करणे. त्यांच्यावर टीका करत राहण्याने मातोश्रीत महत्त्व मिळते, असे शिवसेनेत म्हटले जाते.

यामुळेच कोकणातील खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, आ. भास्कर जाधव, आ. दीपक केसरकर असे सेनेतील हे आमदार आणि संदेश पारकर, सतीश सावंत असे सारेजण नामदार नारायण राणे यांच्या विरोधातील सूर आळवत असतात, ही वस्तुस्थिती आहे. रामदास कदम आणि अनिल परब यांच्या वादातून शिवसेनेत नेमके काय चाललंय, हे समोर आले आहे. शिवसेनेचा कारभार मंत्री अनिल परबच चालवत आहेत, असा आरोपच रामदास कदम यांनी करतानाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत की अनिल परब, या एका प्रश्नामुळे निष्ठावंत शिवसैनिकांच्याही भुवया उंचावल्या आहेत. राजकीय पक्षांमध्ये मतभेद आणि गट-तट हे काही नवीन नाहीत; परंतु आजवर स्वत:ला कडवट शिवसैनिक म्हणवून घेणारे रामदास कदम यांनी या पद्धतीने टीका-टिपणी केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अगदी काल-परवापर्यंत कोकणात नारायण राणे यांच्या विरोधात बोलण्यासाठी रामदास कदम यांना बोलावले जायचे. त्यावेळी रामदास कदम अनेक निष्ठेच्या ‘गोष्टी’ समोरील शिवसैनिकांना सांगायचे. आता मात्र अनिल परब यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत रामदास कदम यांनी थेट मातोश्रीवरच निशाणा साधला आहे.

वकील असलेल्या अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या कडवट टीकेनंतर मौन बाळगणे पसंत केले. शांत राहून रामदास कदम यांच्या निकटवर्तीय असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना शिवसेनेतून बेदखल केले आहे. यामुळे खेड, दापोली शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. रामदास कदम आणि अनिल परब यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत ‘बॅकफूट’वर गेलेले माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना सेनेत बळ मिळाले आहे. माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या निकटवर्तीयांना दापोलीत पदाधिकारी करण्यात आले आहे. कोकणातील शिवसेनेतील हा सुप्त आणि उघड असणारा संघर्ष थेट मातोश्रीच्या प्रांगणात पोहोचला आहे. कोकणातील शिवसेनेतील वादाचे परिणाम आगामी काळात निश्चितच दिसून येतील, असे म्हटले जात आहे.
santoshw2601@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -