Friday, April 26, 2024
Homeक्रीडारोहितची फटकेबाजी

रोहितची फटकेबाजी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव परीक्षेतही भारत पास

दुबई (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियाला ८ विकेट आणि १३ चेंडू राखून हरवताना भारताने टी-ट्वेन्टी वर्ल्डकपआधीच्या दोन्ही सराव सामन्यांत बाजी मारली. हंगामी कर्णधार रोहित शर्माची (४१ चेंडूंत ६० धावा) फटकेबाजी माजी विजेत्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडवर मात केली आहे.

भारताची आघाडी फळी बहरली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे १५४ धावांचे आव्हान पार करायला १७.५ षटके पुरेशी ठरली. रोहितच्या ६० धावांच्या खेळीत ५ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. त्याने लोकेश राहुलसह ९.२ षटकांत ६८ धावांची सलामी दिली. राहुलने ३१ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३९ धावा केल्या.

रोहितने स्वेच्छेने फलंदाजी सोडताना अन्य फलंदाजांना संधी दिली. संधीचा फायदा उठवत सूर्यकुमार यादवने २७ चेंडूंत ३८ धावांची नाबाद खेळी केली. त्याने त्याच्या खेळीत ५ चौकार आणि एक षटकार मारला. हार्दिक पंड्याने ८ चेंडूंत एका षटकारासह नाबाद १४ धावा केल्या. भारताची फलंदाजी बहरल्याने ऑस्ट्रेलियाला आठ गोलंदाज वापरावे लागले.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी १५३ धावांचे आव्हान ठेवले. त्यांच्या चार फलंदाजानी दोन आकडी धावा केल्या. त्यात माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या सर्वाधिक ५७ धावा आहेत. त्याला मार्कस स्टॉइनिस (नाबाद ४१ धावा) तसेच अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलची (३७ धावा) चांगली साथ लाभली.

स्मिथ, स्टॉइनिस आणि मॅक्सवेलमुळे ऑस्ट्रेलियाला (५ बाद १५२ धावा) दीडशेपार मजल मारता आली तरी ऑफस्पिनर आर. अश्विन आणि डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने त्यांची आघाडी फळी मोडीत काढली. अश्विनने वैयक्तिक पहिल्या आणि डावातील दुसऱ्या षटकात सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला (१) पायचीत केले. तो जेमतेम खाते उघडू शकला. त्यानंतर जडेजाने दुसरा सलामीवीर आणि कर्णधार आरोन फिंचला (८) त्याच्या जाळ्यात अडकवले. वनडाऊन मिचेल मार्शला (०) आल्यापावली माघारी धाडताना अश्विनने चौथ्या षटकात कांगारुंची अवस्था ३ बाद ११ धावा अशी केली.

आघाडी फळी कोसळल्यानंतर स्मिथ आणि मॅक्सवेल या अनुभवी जोडीने चौथ्या विकेटसाठी ५० धावा जोडताना संघाला सावरले. स्मिथने ४८ चेंडूत ५७ धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने त्याचा त्रिफळा उडवत भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर मॅक्सवेलने स्टॉइनिससह पाचव्या विकेटसाठी ७६ धावा जोडताना ऑस्ट्रेलियाला १५२ धावांची मजल मारून दिली.

विराट कोहलीची बॉलिंग प्रॅक्टिस

विराट कोहलीने बॉलिंग प्रॅक्टिस केली. त्याने दोन षटके टाकताना १२ धावा दिल्या. त्याने आजवर १२ आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी सामन्यांत गोलंदाजी केली आहे. त्यात १९८ धावा देत ४ विकेट घेतल्यात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -