रोहा (वार्ताहर) : गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईला जाण्यासाठी ट्रेनची सोय करण्यात यावी, अशी मागणी रोहेकरांची (Roha-Diva Memu) होती. त्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. लवकरच सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी रोहा स्थानकावरून दिवापर्यंत सोमवार ते शुक्रवारी ही मेमू धावणार असून शनिवार, रविवार या दिवशी सेवा बंद राहणार आहे.

रोहा रेल्वे स्थानकावरील आधीच अपुरी, त्यामध्ये कोरोना काळात बदललेल्या वेळापत्रकामुळे रेल्वे सेवा ही रोहेकरांसाठी गैरसोयीची ठरत होती. यामुळे रोह्यासह निडी, नागोठणे, कासू या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

रोहेकरांसाठी वाढीव गाडी उपलब्ध व्हावी, यासाठी सह्यांच्या मोहिमेद्वारे सप्टेंबर महिन्यात मनसे प्रत्यक्ष मैदानात उतरल्यानंतर महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला बळ मिळाले. यासोबतच सुराज्य, सिटिझन फोरम या सामाजिक संघटनांच्या मागणीला जनाधार मिळत गेला. अखेर प्रवाशांची एकजूट लक्षात घेत मध्य रेल्वे प्रशासनाने रोहा-दिवा गाडीला हिरवा सिग्नल दिला. या गाडीचा निश्चितच रोहेकरांसाठी फायदा होणार आहे.

नेत्रावती, दिवा-सावंतवाडी या गाड्यांचे रद्द झालेले थांबे पूर्ववत करत दैनंदिन धावणाऱ्या जलद गाड्यांचे थांबे दिल्यास रोहेकरांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकारक व आर्थिकदृष्ट्या परवडणारा होईल. रोहा-दिवा गाड्यांना कोरोना काळात दिलेला विशेष दर्जा रद्द करून तिचे तिकीट पूर्ववत करणे व अन्य गाड्यांचे थांबे मिळावेत, यासाठी प्रयत्न आहेत.- अमोल पेणकर, रायगड जिल्हा सचिव, मनसे

गाडी क्रमांक ०१३५२ (रोहा-दिवा)

रोह्यावरून सुटण्याची वेळ – सकाळी ६.४० वाजता
दिव्यामध्ये पोहोचण्याची वेळ – सकाळी ९.१५ वाजता

गाडी क्रमांक ०१३५१ (दिवा-रोहा)

दिव्यावरून सुटण्याची वेळ – सायंकाळी ६.४५ वाजता
रोह्यामध्ये पोहोचण्याची वेळ – रात्री ९.१५ वाजता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here