Saturday, February 14, 2026

सिंधुदुर्गतील वाघांची विधानसभेत डरकाळी...!

सिंधुदुर्गतील वाघांची विधानसभेत डरकाळी...!

महाराष्ट्रनामा

कोकण हा पूर्वीपासूनच सर्वार्थाने सरकारी यंत्रणेच्या स्तरावर दुर्लक्षित असलेला प्रांत. कोकणी माणूस स्वाभिमानी आणि कष्ट करून घाम गाळून शेती करणारा.. त्यामुळे कोकणातील शेतकरी हा कधीही कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे... आणि अंथरुण पाहून पाय पसरावेत.. या म्हणींप्रमाणे कोकणी माणूस स्वतःच्या चौकटीत आणि मर्यादित जे होऊ शकते तेवढेच करतो. तो चाकोरी बाहेर विचार देखील करत नाही आणि चौकटी बाहेर कधी पाऊलही टाकत नाही. त्यामुळेच कोकणातील माणसाच्या समस्या, प्रश्न हे सरकार दरबारी पोहोचवणारे जे लोकप्रतिनिधी असतात त्यांच्यावर ही जबाबदारी सर्वाधिक असते. कोकणात गोव्याला लागून असलेला सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्राचे आणि कोकणचे टोक आहे. भव्य समुद्रकिनारे, आंबा, काजू, नारळ, सुपारी बागा, भातशेती, त्याचबरोबर मासेमारी हे या जिल्ह्यातील पारंपरिक व्यवसाय आहेत. गोव्यालाही मागे टाकेल अशी निसर्गाची संपन्नता, समृद्धी आणि वैभव हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खास वैशिष्ट्य आहे. यामुळेच कोकणातील शेतकरी हा कधीही सरकारकडे हात पसरत नाही. सरकारकडे मागणाऱ्यांची संख्या आधीच मोठ्या प्रमाणावर असते, त्यामुळे जो मागत नाही तो सरकार दरबारी सक्षम अथवा श्रीमंत गणला जातो. अर्थात यामुळे सरकारी मदतीच्या घोषणा तसेच पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प अथवा जलसिंचनाचे प्रकल्प हे कोकणच्या वाट्याला दुर्मीळतेनेच येतात. सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्य सरकारने महाराष्ट्रातील विशेष पर्यटन जिल्हा म्हणून यापूर्वी जाहीर केला आहे. तथापि पर्यटन जिल्हा म्हणून या जिल्ह्याला ज्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळणे अपेक्षित होते, तो मात्र सिंधुदुर्गला देण्यात आजवर हात आखडता घेण्यात आला. अर्थात राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे तसेच शिवसेना कुडाळचे आमदार निलेश राणे या दोन्ही राणे बंधूंनी विकासाच्या बाबतीत आजवर कोकणवर होत असलेला अन्याय त्याचप्रमाणे कोकणच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी सरकार पातळीवर जोमदार प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा तीन भक्कम पक्षांच्या महायुतीचे सरकार असल्यामुळे आणि या सरकारमध्ये नितेश राणे हे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे या खात्याचे कॅबिनेट मंत्री असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असे सारेच महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते हे सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत झुकते माप देऊ लागले आहेत. राज्यात मंत्रीपद सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे असल्यामुळे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नितेश राणे यांच्याकडे असल्यामुळे या जिल्ह्याला विविध विकास कामांसाठी राज्य सरकारकडून अधिकाधिक निधी कसा उपलब्ध होऊ शकेल आणि या निधीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्यांना भेडसावणारे प्रश्न, त्यांच्या समस्या यावर तातडीने कसा तोडगा काढता येईल या दृष्टीने मंत्री नितेश राणे यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात आणि महायुतीचे सरकार असल्यामुळे नितेश राणे यांच्या या प्रयत्नांना चांगल्यापैकी यश येताना देखील दिसत आहे. याबरोबरच नितेश राणे हे राजकीय वर्तुळात हिंदुत्वाची भाजपाची बुलंद तोफ म्हणून ओळखले जातात. भाजपाची सभा असो की कार्यकर्त्यांचा मेळावा, विधिमंडळातील सभागृह असो की विधिमंडळाच्या आवारातील प्रसार माध्यमांचा कक्ष, मंत्री नितेश राणे यांचे हिंदुत्व बाबतचे कडवट आणि कट्टर विचार हे सातत्याने राज्यातील आणि देशातील जनतेसमोर प्रखरपणे मांडण्याचे काम ते अखंडपणे करत असतात. सर्वसाधारणपणे राजकीय कारकीर्दीमध्ये एकदा का मंत्रीपदाची झूल अंगावर चढली की नेत्यांमधील वैचारिक अधिष्ठान हे कमी होत जाते. तथापि याला मंत्री नितेश राणे हे अपवाद म्हणावे लागतील. कारण मंत्री होण्यापूर्वी ते भाजपाचे आमदार असतानाही जहाल आणि कडवट हिंदुत्ववादी होतेच मात्र त्यानंतरही त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आल्यानंतरही त्यांच्यातील कडवट हिंदुत्ववादी आणि हिंदुनिष्ठ कार्यकर्ता हा अधिक परखड आणि रोखठोक बोलणारा आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात कोठेही हिंदुत्वावर हल्ला झाला, तर त्यावर साहजिकच पहिली प्रतिक्रिया ही मंत्री नितेश राणे यांच्याकडून त्याच त्वेषात उमटत असते. कुडाळचे शिवसेनेचे आमदार निलेश राणे हे तर विधानसभेत कोकण आणि सिंधुदुर्गची बुलंद तोफ म्हणूनच ओळखले जातात. कोकणातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला अधिकाधिक न्याय कसा देता येईल आणि विकासाची कामे, विकासाचे प्रकल्प हे कोकणात अधिकाधिक प्रमाणात कसे आणता येतील या दृष्टीने निलेश राणे हे विधानसभेत कोकणच्या हितासाठी सातत्याने येथील मूलभूत प्रश्न मांडत असतात. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशन आमदार निलेश राणे यांनी कोकणला मिळणाऱ्या अपुऱ्या निधीवरून गाजवून सोडले होते, तर आता मुंबईत गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजमधील दुरवस्थेबाबत वैद्यकीय शिक्षण खात्याची आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजेच्या प्रश्नावर त्यांनी ऊर्जा खात्याला धारेवर धरत सिंधुदुर्ग ऊर्जा विभागाची लक्तरेच वेशीवर टांगली. आमदार निलेश राणे यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा खर्डा, परखड, निर्भीड, धारदार आणि हुकुमी आवाज. प्रश्नाची योग्य सांगड घालत समस्येच्या मुळाशी जाण्याचा स्वभाव आणि त्याचबरोबर केवळ प्रश्न न मांडता त्यावरील उपाययोजना देखील अत्यंत प्रभावी भाषेत मांडण्याचे आमदार निलेश राणे यांचे कसब हे खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. ते ज्या तळमळीने कोकणच्या समस्यांना विधानसभेत मांडतात ते ऐकल्यावर अगदी भास्कर जाधव यांच्यासारखा त्यांचा राजकीय शत्रू देखील निलेश राणे यांच्या भाषणाच्या प्रेमात पडतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारी मेडिकल कॉलेजमधील सुविधांचा उडालेला बोजवारा, जिल्हा रुग्णालयातील दुरवस्था आणि त्यामुळे कोकणातील सर्वसामान्य रुग्णांची होणारी परवड ही ज्या आक्रमकतेने आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत मांडली त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची विदारक परिस्थिती प्रथमच प्रकर्षाने राज्यासमोर आली. यातील निलेश राणे यांचा अभ्यास एवढा सखोल आणि गाढा होता की, अखेरीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना निलेश राणे यांना शांत करण्यासाठी स्वतः सिंधुदुर्ग जिल्हा सरकारी रुग्णालयाला तसेच सरकारी मेडिकल कॉलेजला भेट देण्याचे, तेथील समस्यांची पाहणी करण्याचे आणि त्या बाबत तातडीने बैठक घेऊन निलेश राणे यांनी मांडलेल्या समस्यांचे पूर्णतः निराकरण करण्याचे स्पष्ट आश्वासन द्यावे लागले. कोकणातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजेच्या प्रश्नावर तर आमदार निलेश राणे यांनी विधानसभा अक्षरशः गाजवून सोडली. सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा असताना देखील जिल्ह्यात चार-चार दिवस वीज पुरवठा खंडित होणे, महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांचे विजेच्या बाबतीतील सविस्तर प्रकल्प अहवाल अद्ययावत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मात्र २००८ सालचा जुनाच प्रकल्प अहवाल अद्यापही प्रलंबित असणे, जिल्ह्यातील वीज पुरवठा कार्यालयातील अत्यंत तुटपुंजा आणि तोही ९०% कंत्राटी कामगार वर्ग, मे महिन्यात राज्यात सर्वाधिक पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडल्यामुळे येथील वीज पुरवठा यंत्रणेची झालेली मोठी हानी आणि त्या मोबदल्यात ऊर्जा विभागाकडून देण्यात येत असलेली अत्यंत तुटपुंजी आणि तोकडी मदत यावरून आमदार निलेश राणे यांनी ऊर्जा खाते गदागदा हलवून सोडले. कोकणातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकरता लढणाऱ्या आमदार निलेश राणेंचा तो रुद्रावतार पाहून त्यांचे राजकीय वैरी असलेले ठाकरे सेना नेते आमदार भास्कर जाधव आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार हे दोघेही सर्व राजकीय मतभेद विसरून, बाजूला ठेवून आमदार निलेश राणे यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यामुळे अखेरीस या प्रश्न उत्तर देत असलेल्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजेच्या प्रश्नांवर तत्काळ तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावण्याचे जाहीर करावे लागले. महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ आमदार आहेत. प्रत्येक मतदारसंघातील प्रश्न समस्या तेवढ्याच गंभीर असतात. सर्वच आमदाराना बोलायचे असते. त्यामुळे संधीची आणि वेळेची मारामार असते. त्यातही अधिवेशनामध्ये दोन, पाच मिनिटांमध्ये आपल्या मतदारसंघातील समस्या तडफेने, सफाईदारपणे आणि परखडपणे मुद्देसूद मांडून त्या संबंधित मंत्र्यांकडून सोडवून घेणे यासाठी खरे तर तारेवरील कसरती पेक्षाही अधिक कसब आमदारांकडे असावे लागते. तरच विधानसभेत समस्या सुटतात आणि जनतेचे प्रश्न मार्गी लागतात. आमदार म्हणून निलेश राणे यांच्याकडे हे कसब ठासून भरलेले आहे. त्यामुळेच कोकणातील मग रत्नागिरी असो व सिंधुदुर्ग जिल्हा असो की रायगड असो तेथील समस्यांना आणि जनतेच्या प्रश्नांना परखडपणे वाचा फोडण्याचे आणि त्या समस्या तत्काळ सोडवून घेण्याचे मंत्री नितेश राणे आणि त्याचबरोबर आमदार निलेश राणे या दोघाही राणे बंधूंचे हे कसब कौतुकास्पदच आहे. विशेष म्हणजे याचे संस्कार या दोघेही बंधूंना त्यांचे वडील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांच्याकडून मिळालेले आहेत. त्यामुळेच कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कोकणातील जनतेचे प्रश्न सुटण्यासाठी कोकणचे हे दोन्ही वाघ विधिमंडळात लोकशाहीने दिलेल्या आयुधांचा पुरेपूर वापर करत कोकणला अधिकाधिक न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. - सुनील जावडेकर
Comments
Add Comment