Wednesday, March 11, 2026

असंतुष्ट आत्म्यांचे स्वार्थमिलन

असंतुष्ट आत्म्यांचे स्वार्थमिलन

शनिवारी वरळी येथील सभागृहात उबाठाचे नेते उद्धव ठाकरे आणि त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे यांचे मनोमिलन झाले. म्हणजे तसे भासवले तरी. पण वास्तवात हे खरोखरच मनोमिलन होते की दोन असंतुष्ट आत्म्यांनी सत्तेसाठी एकत्र येण्यासाठी केलेली तडजोड होती हा प्रश्नच आहे.

फडणवीस यांनी मराठी सक्तीचे करणारा अध्यादेश रद्द केला आणि या दोघांना संधीच मिळाली. त्यात त्यांनी सीनिअर ठाकरे यांनी नेहमीची मळमळ बाहेर काढली आणि आपल्याला सत्तेवरून कसे जावे लागले असा पाढा वाचला, पण त्यात त्यांनी काँग्रेसबरोबर जाऊन सत्ता पटकावली आणि मुख्यमंत्रीपद बळकावले हे याचा त्यांना विसर पडला. शिवसैनिकातील मुख्यमंत्री देऊ, असे म्हणत स्वतःच टुणकन उडी मारून मुख्यनमंत्री पदावर ते जाऊन बसले. हिंदी सक्तीचा करणारा अध्यादेश ठाकरे सरकारनेच काढला होता आणि आता त्याच अध्यादेशाविरुद्ध ते बोंबा मारत आहेत. सत्तेपासून दूर हाकलून काढल्यामुळे त्यांची भाषणे ही केवळ शिव्याशाप आणि तळतळाटाने भरलेली होती. त्यामानाने राज ठाकरे यांचे भाषण बरेच संयमी झाले, पण उद्धव ठाकरे यांच्या भाषणात रडगाणे आणि नेहमीचे रटाळ भाषणाखेरीज काहीही नव्हते. सत्तेसाठी आणि त्यातही मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या लोण्याच्या गोळ्यासाठी हे दोघे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत याशिवाय दुसरे काहीही नव्हते.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तर जनतेने पार पिटाळून लावले आहे, पण ठाकरेंना त्यातल्या त्यात सीनिअर ठाकरे यांना मुंबई महापालिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. कारण तेथूनच ३१ हजार कोटी रुपयांचा निधी येतो. त्यामुळे ही सोन्याची कोंबडी कशी जाऊ द्यायची म्हणून ठाकरे अस्वस्थ झाले. मराठी हे निमित्त आहे कारण मुळचा अध्यादेश जो पहिली ते बारावीपर्यंत हिंदी भाषा सक्ती करणारा ठाकरे यांनीच २०२१ मध्ये लागू केला होता, पण मराठी लोकांची द्रोह केल्याप्रकरणी ठाकरे माफी मागतील अशी अपेक्षा होती. पण त्याऐवजी त्यांनी थेट फडणवीस आणि भाजपावर टीकास्त्र सोडले. दोघेही ठाकरे बंधू हे संपलेले आहेत.

त्यामुळे त्यांच्याकडून यापेक्षा दुसरी काही अपेक्षा करता येणार नाही. आता मुंबई महापालिका तरी वाचवता येते का ते पाहण्यासाठी दोघांचाही अखेरचा प्रयत्न आहे. पण त्यात दोघेही यशस्वी होणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ आहे. वास्तविक मराठीच्या नावाने गळे काढत आहेत त्या मराठीला अभिजात दर्जा मोदी यांनी दिला आणि त्यासाठी भाजपाच्या स्थानिक सरकारने प्रयत्न केले, पण त्यासाठी कुठलीही कृतज्ञता व्यक्त न करता मोदी यांच्यावर आरोप करून ठाकरे यांनी आपण किती खाल्ल्या घरचे वासे मोजणारे आहोत हेच दाखवून दिले आहे.

मुंबईतील मराठी टक्का कमी झाला आहे आणि मराठी माणूस आज बदलापूर ते पार वांगणीपर्यंत फेकला गेला आहे. त्यासाठी कोण जबाबदार आहे आणि गुजरातीवर ठाकरे हे नेहमीच टीका करतात ते ठाकरे अंबानीच्या विवाहात कसे उपस्थित राहतात, हे किरकोळ वाटत असले तरीही प्रश्न आहेतच. मुंबई महापालिकेचे जाऊ द्या, पण ज्या विधानसभेत एकेकाळी शिवसेनेची सत्ता होती त्यांची अवस्था आज काय आहे ते पाहिले, तर ठाकरे यांना लक्षात येईल की, त्यांच्या हातून कधीच सत्ता गेली आहे आणि कोअर व्होटर निघून गेला आहे. उरलेला कोअर व्होटर शिंदे आणि भाजपाकडे आहे.

ठाकरे यांनी बाळासाहेब यांच्या वारसाशी बेईमानी केली आणि आज त्यांना त्यांच्या दारी जावे लागत आहे. पण हे त्यांच्याच कर्माचे फळ आहे. कालच्या समारंभाला फक्त ठाकरे बंधूच होते. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे वगैरे उपस्थित होत्या पण त्यांचा रोल अगदीच लिंबू-टिंबू होता. त्यामुळे ठाकरे बंधूंकडे सत्ता आलीच, तर इतरांना ते कसे वागवणार याची झलक पाहायला मिळाली. वास्तविक ही रॅली होती, मराठी माणसाच्या भल्यासाठी... पण मराठी माणसाचा एक शब्द उच्चारण्यात आला नाही.

मराठी माणसाचे जास्त नुकसान ठाकरे यांनीच केले आहे. शिवसेनेच्या सत्ता काळात मराठी माणूस मुंबईच्या हद्दीबाहेर गेला आहे. मुंबईत मराठी टक्का का कमी झाला, याचे उत्तर ठाकरे यांनी अगोदर द्यायला हवे. नंतर मग बाकीची बकवास करावी. जरी कालचा ठाकरे बंधू पुनर्मिलनचा होता तरीही त्यात राजकीय वासच जास्त होता आणि केवळ स्वतःचे भवितव्य निश्चित करण्यासाठी दोघे एकत्र आले आहेत हे लक्षात येत होते. चाय बिस्कूट पत्रकारांना ठाकरे यांच्या पुनर्मिलनाचा आनंद झाला असेल पण त्यांच्यासाठी काही पक्ष चालत नसतात. त्यामुळे चाय बिस्कूट पत्रकारांनी आनंद मानला तरी चालेल, पण त्यामुळे महाराष्ट्राला दोघाही ठाकरे बंधूंचे ग्रहण पुन्हा लागू नये. कारण तसे झाले तर, महाराष्ट्र अनेक वर्षे मागे जाईल.

ठाकरे बंधूंचे पुनर्मिलन झाले तरीही त्यात मराठी जनतेला आणि मराठी माणसाला काय मिळाले हे काहीही सांगता येणार नाही. त्याबाबतीत तर सारा आनंदीआनंद आहे. २० वर्षांनंतर दोघे ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि त्यामुळे काही पत्रकारांना अत्यंत आनंद झाला आहे. ठाकरे बंधू स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत आणि हे कुणापासूनच लपून राहिलेले नाही. त्यामुळे सारा फार्स होता आणि त्याचे काही फार काही महत्त्व नाही इतकेच. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जो टोला लगावला तो अत्यंत समर्पक आहे. ते म्हणाले की हा मराठीचा विजयोत्सव नव्हे, तर रुदालीचा कार्यक्रम होता. इतके समर्पक वर्णन या ठाकरे बंधूंच्या पुनर्मिलनाचे दुसरे काहीही करता येणार नाही.

Comments
Add Comment