नवी दिल्ली : हरियाणा सरकारने देशातील पहिले ‘डिस्नीलँड-शैली’चे थीम पार्क गुरुग्रामजवळ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असून, हे उद्यान मानेसरजवळील पचगाव चौकाजवळ ५०० एकर जागेवर उभारण्यात येणार आहे. हे स्थान कुंडली-मानेसर-पलवल एक्स्प्रेस-वे आणि हरियाणा ऑर्बिटल रेल कॉरिडोरजवळ असल्यामुळे महत्त्वाचे मानले जात आहे.
मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी ही महत्त्वाची घोषणा दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन व संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर केली होती. हा प्रकल्प हरियाणाच्या अर्थव्यवस्था, रोजगार व पर्यटनाला वाढदायी ठरेल, असे ते म्हणाले होते. या ‘गेम चेंजिंग’ थीम पार्कद्वारे हरियाणाला जागतिक पर्यटन केंद्र बनवण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकल्प गुरुग्रामच्या ‘ग्लोबल सिटी’ या १००० एकरच्या आगामी प्रकल्पाजवळ असल्यामुळे या परिसराचे महत्त्व आणखी वाढणार आहे. हा प्रकल्प दिल्ली-गुरुग्राम आणि द्वारका एक्स्प्रेस-वे यांना जोडणाऱ्या मार्गांनी सज्ज असणार असून 'वॉक टू वर्क' संकल्पनेवर आधारित राहणार आहे.






