Thursday, April 25, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबादेवी आणि पंढरपूरचा कायापालट होणार

मुंबादेवी आणि पंढरपूरचा कायापालट होणार

मुंबई : देशात ‘महाकाल कॉरिडोर’ आणि इतर धार्मिक ‘कॉरिडोर’च्या धर्तीवर मुंबईतील मुंबादेवी आणि पंढरपूर येथे ‘कॉरिडोर’ची निर्मिती करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यानुसार मुंबईतील मुंबादेवी आणि पंढरपूर या दोन्ही देवळांचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. या परिसराचा विकासही होणार असून दोन्ही देवस्थानांच्या स्थळी भाविकांना व पर्यटकांना पोहोचण्यासाठी चांगल्या दर्जाच्या दळणवळणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात येणार आहे.

दिवाळीच्या निमित्ताने फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम ठेवला होता. या वेळी त्यांनी महाराष्ट्रातील दोन प्रमुख देवस्थानांबाबत माहिती दिली. कॉरिडोरच्या माध्यमातून मुंबादेवी आणि पंढरपूरच्या देवळांच्या भव्य जीर्णोद्धारासह विस्तीर्ण उद्याने, मोकळ्या जागा, परिसराचे सुशोभीकरण, मूलभूत सोयीसुविधा तयार केल्या जाणार आहेत. या दोन्ही परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या रखडलेल्या मंत्रीमंडळाच्या विस्ताराचे संकेत देऊन लवकरच राज्यमंत्र्यांची घोषणा करण्यात येणार असल्याचे नमूद केले.

‘नुकत्याच झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. त्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे, तर इतकेच नव्हे तर काही दिवसांचा पाऊस वगळता आतापर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व नुकसानीची मदत राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांना मदत मिळाली असून सात हजार कोटींची मदत आतापर्यंत देण्यात आली आहे. आमचे सरकार मदत करणारे आहे,’ असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. मुंबई महानगरपालिका निवडणुका केव्हा होतील, याबाबत पत्रकारांनी विचारला असता, ‘याबाबत आपण काहीच भाष्य करू शकत नाही. पालिका निवडणूक केव्हा होतील हे एक तर देव सांगू शकतो किंवा न्यायालय सांगू शकतो,’ असे उत्तर फडणवीस यांनी दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -