Friday, April 26, 2024

दयाळू रघू

एका डोंगराशेजारी हेरंबपूर नावाचे एक छोटेसे गाव होते. गावाच्या शेजारी एक बारमाही पाणी असणारी नदी वाहत असल्याने गावशिवाराच्या विहिरींना भरपूर पाणी असायचे. त्यामुळे गावात भाजीपाला भरपूर व चांगला पिकायचा. खेडेगाव असल्याने त्याचा गावात पाहिजे तेवढा खप होत नव्हता.

याच गावात रघू नावाचा एक अतिशय गरीब, होतकरू नि कष्टाळू व अभ्यासू मुलगा राहायचा. तो अत्यंत गरीब असल्याने बालपणापासूनच दररोज सकाळी गावातील भाजीपाला विकत घेऊन, आपल्या जवळच्या एका हा­ऱ्यात टाकून तो त्याच्या गावाला लागूनच जवळच असलेल्या बाजूच्या जबलपूर शहरात नेऊन विकून आलेल्या पैशांवर आपला शाळेचा खर्च भागवायचा. लोकांनाही ताजा ताजा हिरवागार भाजीपाला रास्त भावात मिळायचा. त्यामुळे लोक त्याच्यावर नेहमी खूश असायचे. सकाळी भाजीपाला विकणे, दिवसा शाळा करणे नि रात्री अभ्यास करणे, असा त्याचा नित्यनेम असायचा.

तो २६ जानेवारी गणराज्य दिनाचा दिवस होता. त्याच्या आदल्या दिवशी रघूने सा­ऱ्यांना मी उद्या झेंडावंदन व प्रभातफेरी झाल्यानंतर भाजीपाला घेऊन येईन असे सांगितले होते. त्यामुळे २६ जानेवारीला तो झेंडावंदन व प्रभातफेरी झाल्यानंतर ताबडतोब त्याने भाजीपाला विकत घेतला व नंतर तो आपला हारा घेऊन त्वरित आनंदपूरला गेला. तो जबलपुरात पोहोचला तेव्हा तेथील प्रमुख शहीद स्मारकावरील झेंडावंदन आटोपून सगळ्या शाळांचे विद्यार्थी आपापल्या घरांकडे परतत होते.

तो शहरातील मुख्य रस्ता होता. सारे विद्यार्थी शिस्तीने, व्यवस्थित रांगेत परत येत होते. त्यांच्यासोबत त्यांचे शिक्षक, शिक्षिका चालत होते. त्यांचे आपापल्या विद्यार्थ्यांकडे जातीने बारीक लक्ष होते. सारे आपापल्या विद्यार्थ्यांची काळजी घेत होते. रघूचा शहरात भाजीपाला वाटायला जाण्याचा रस्ताही तेथूनच जात होता. आपापल्या शाळांमधील झेंडावंदन आटोपल्यानंतर शहरातील सगळ्या शाळांचे विद्यार्थी त्या ठिकाणी झेंडावंदनासाठी आलेले असल्याने आता तेथील झेंडावंदन आटोपून परतताना त्या रस्त्यावर खूपच गर्दी झाली होती. त्यातही लहान मुलांना घरी परतण्याची खूपच घाई झालेली असल्याने ते गडबड-गोंधळ करीत होते, धावपळ करीत होते. तरीही त्यांना सांभाळण्याचे काम त्यांचे शिक्षक करीत होते व रहदारीला शिस्त लावण्याचे काम पोलीस करीतच होते.

रघूला त्या गर्दीतून वाट काढणेही खूप कठीण असल्याने तो तेथेच त्या चौकात रस्त्याच्या एका बाजूला उभा राहून त्यांची गंमत बघू लागला. एवढ्यात त्याचे लक्ष एका मुलाकडे गेले. तो काही या गर्दीतील शाळकरी दिसत नव्हता; परंतु तो अपंग दिसत होता. त्याच्या दोन्ही काखेत कुबड्या होत्या. त्यांच्या आधाराने तो कसाबसा चालत होता. त्याला बहुधा रस्ता पार करायचा होता. तो तसा प्रयत्नही करत होता. कारण इतकी मुले जाऊन रस्ता मोकळा व्हायला बराच वेळ लागला असता. पण रस्त्यावरील गर्दीमुळे त्याला काही ते जमत नव्हते. रघूने आपला भाजीपाल्याचा हारा तेथेच रस्त्याच्या बाजूला खाली नीट झाकून ठेवला नि त्याला रस्ता पार करण्यासाठी मदत करायला त्याच्याकडे जाऊ लागला. एवढ्यात त्याला गर्दीत कुणाचा तरी धक्का लागला व तो खाली पडला. त्याच्या हातातील कुबड्या बाजूला फेकल्या गेल्या. अपंगत्वामुळे व कुबड्या नसल्याने त्याला काही लवकर उठता येत नव्हते. रघू धावतच त्याच्याकडे गेला. रघूने प्रथम तेथील गर्दी थोडी बाजूला केली व त्याला हात देऊन उठविले. त्याला तसाच धरून ठेवले. त्याच्या पडलेल्या दोन्ही कुबड्या उचलल्या. त्याला एका हाताने धरून आधार देत एकेक कुबडी त्याच्या बगलेत दिली. दोन्ही कुबड्या त्याच्या बगलांत पक्क्या ठेवल्यानंतर त्याचा हात धरून, रस्ता पार करून त्याला दुस­ऱ्या कडेला पोहोचविले.

रस्ता पार केल्यावर रघूने त्याची महिती विचारली. तो मुलगा जबलपूरमधीलच एका अपंग विद्यालयाचा विद्यार्थी होता नि त्या शाळेच्याच वसतिगृहात राहत होता. त्याच्या खोलीतील मित्राचे अचानक पोट दुखत असल्याने औषधी घेण्यासाठी तो डॉक्टरकडे आला होता नि डॉक्टरकडून परत जात असताना या इतर शाळांच्या मुलांच्या गर्दीमुळे अडकला होता. रघूने त्याला त्याच्या शाळेतील वसतिगृहापर्यंत पोहोचवले. तो परत मुख्य चौकात वापस आला. त्याचा हारा तेथे जसाच्या तसा होताच. त्याने ईश्वराचे आभार मानले नि आपला हारा घेतला आणि आपला भाजीपाला वाटायला निघून गेला.

रघूने त्या अपंग मुलाला मदत केल्याने भाजीपाला वाटायला त्याला त्याने सांगितलेल्या वेळेपेक्षाही बराच उशीर झाला. त्यामुळे त्याच्यावर विसंबून राहणारे त्याचे नेहमीचे गिऱ्हाईक नाराज झाले, काहीजण त्याच्यावर रागावलेसुद्धा. पण त्यातील एकाने चौकात रघूला त्या अपंग मुलाचा हात धरून रस्ता पार करताना बघितले होते. त्याने त्या

गि­ऱ्हाईकांना जेव्हा रघूची ही परोपकारची सत्य घटना सांगितली, तेव्हा त्यांनी सगळ्यांनी उलट रघूचे कौतुक केले. रघूलाही त्यांचा गैरसमज दूर झाल्याने आनंद झाला. त्याने त्या सद्गृस्थाचे आभार मानले व भाजीपाला वाटून आपल्या गावी परत आला.

– प्रा. देवबा पाटील

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -