अनुराधा दीक्षित

आईने मूल मोठं झाल्यावर त्याच्यावर नकळत बारीक लक्ष ठेवलं पाहिजे, पण त्याचे निर्णय त्याला घेऊ देण्याचं स्वातंत्र्यही दिलं पाहिजे. त्याची एखादी चूक त्याला न दुखावता लक्षात आणून दिली पाहिजे. तो योग्य मार्गाने जातोय ना, यावरही लक्ष ठेवायला हवं.

‘मातृत्व’ एक अमूल्य गोष्ट! ज्यामुळे स्त्रीच्या आयुष्याला पूर्णत्व प्राप्त होते. माता, आई, माऊली, माय सर्व समानार्थी शब्द. कोणताही उच्चारला तरी त्यातून जाणवते सुरक्षितता, निरपेक्ष प्रेम, अलोट माया, नि:स्वार्थ ममता! आई आणि मुलाचं नातं हे जगातलं सर्वात सुंदर नातं.

प्रत्येक आईला आपलं मूल आपल्या जीवापेक्षाही जास्त प्रिय असतं. कारण, तिचं विश्वच बदलून जातं. मूल जन्मल्यावर त्याचा पहिला ‘टय़ांहा’ ऐकून ती आपली सर्व दु:ख, वेदना विसरून जाते. मग ती आई श्रीमंत असो वा गरीब असो, सुशिक्षित असो वा अशिक्षित, कुरूप असो वा स्वरूप सुंदर.. आई होण्याची भावना सर्व स्तरातील स्त्रियांना परमोच्च सुख देणारी असते. अपत्यजन्मापासूनच तिच्यासाठी तो आनंदसोहळा असतो. भविष्यात त्याच्यासाठी काय काय करायचं याचं स्वप्न ती पाहत असते आणि आपल्या परिस्थितीनुसार त्याला वाढवण्याचा, घडवण्याचा प्रयत्न करते.

मुलांना भावी आयुष्यासाठी सक्षम करणं, त्याच्या मनात काहीतरी चांगलं बनण्याची, माणूस म्हणून घडण्याची जी ज्योत पेटावी लागते, ते काम आईकडूनच घडू शकतं. म्हणूनच मोठमोठय़ा विभूतींची चरित्रं वाचली तरी आपल्या हे लक्षात येतं.

शिवाजी महाराजांना घडवलं त्यांच्या आऊसाहेब जिजाऊनीच. साने गुरुजींच्या आयुष्यावर आईचाच प्रभाव होता. म्हणूनच ‘श्यामची आई’ पुस्तक निर्माण झालं. गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यावर बालपणीची काही वर्षे वडिलांच्या सांगीतिक संस्कारांचा पगडा असला, तरी त्या व त्यांच्या भावंडांना माई मंगेशकरांनीच घडवलं. म्हणूनच ती सर्व भावंडं संगीत क्षेत्रात आपलं भक्कम स्थान निर्माण करू शकली.

आज एखादी झोपडीत राहणारी मुलगी आयएएस होण्याची स्वप्न पाहू शकते, एखादी पोलीस ऑफिसर बनू शकते, एखादा मुलगा खडतर परिस्थितीतून वाट काढत बुद्धिमत्तेच्या जोरावर डॉक्टर, इंजिनीयर बनू शकतो. मग ज्यांना सर्व प्रकारची सुबत्ता आहे, अनुकूलता आहे, त्या स्त्रियांना तर आपल्या एक किंवा दोनच अपत्यांना घडवतानासुद्धा नाकी नऊ येताना दिसतात.

काहीवेळा पैसा, खानदानाबद्दलच्या कल्पना, अहंपणा इ. कारणांमुळे मुलांवर योग्य संस्कार करण्याचे राहून जातात. परिणामी मुलं बहकताना दिसतात. ती चुकीच्या मार्गाने जाताना दिसतात. अर्थात हे सरसकट सर्वाच्या बाबतीत होतं असं नाही. काही गर्भश्रीमंतांच्या घरीही ‘साधी राहणी उच्च विचारसरणी’ची प्रचिती येते.

आईने मूल मोठं झाल्यावर त्याच्यावर नकळत बारीक लक्ष ठेवलं पाहिजे, पण त्याचे निर्णय त्याला घेऊ देण्याचं स्वातंत्र्यही दिलं पाहिजे. त्याची एखादी चूक त्याला न दुखावता लक्षात आणून दिली पाहिजे. तो योग्य मार्गाने जातोय ना, यावरही लक्ष ठेवायला हवं. कारण, उमलत्या वयातच पाल्यावर केलेले सुसंस्कार आयुष्यभर त्याची साथ देणारे असतात.

बालपणापासूनच स्त्री-पुरुष समानता, स्वावलंबन, घरातील मोठय़ा माणसांबद्दल आदर ठेवणं, एखादी वस्तू घरातील माणसांबरोबर वाटून घेणं, दुस-यांच्या उपयोगी पडणं, जात-पात, गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वाशी चांगलेपणानं वागणं, साधं पण नीटनेटकं राहणं, वागणं या मूल्यांची जोपासना घरातील आई-वडील व इतर सा-यांकडून केली जात असेल, तर मुलांना ते वेगळं शिकवावं लागत नाही. आपसूकच त्यांच्याकडून त्याचं अनुकरण होतं.

या सा-या गोष्टी एक चांगला माणूस म्हणून त्याला घडवतील. मग भले तो मोठा हायफाय अधिकारी, नोकरदार नाही झाला तरी चालेल. पण, वरील गुणांमुळे समाजात त्याच्याबद्दल आदराचं स्थान नक्कीच निर्माण होईल. असं मूल घडवणं हे एखाद्या स्त्रीचं फार मोठं कर्तृत्व मानलं पाहिजे.

पुरुषांमध्येही वात्सल्य असतेच. म्हणूनच कितीतरी आईवेगळ्या अपत्यांना वडीलच वाढवतात, घडवतात. काही आई-वडिलांनी स्वत:ची मुलं असूनही दत्तक मुलं घेतलेली मी पाहिली आहेत. त्यांचंही पालन-पोषण, शिक्षण इ. स्वत:च्या मुलासारखंच करून आपल्या कृतीतून त्यांनी अनेकांना अशी प्रेरणा दिली आहे.

..तर स्वाती जाधवसारख्या शहीद पत्नीने पतीच्या निधनानंतर खचून न जाता स्वत:ही देशसेवेचा मार्ग चोखाळला आणि कर्तृत्व दाखवलं. मुलांना देखील आपल्या वागण्यातून प्रेरणा दिली.

अशा कितीतरी महिला आहेत की, ज्यांचे पती नाहीत, कुटुंबाची साथ नाही, तरी मनोधैर्य खचू न देता स्वत: कष्ट करून मुलांना नावारूपाला आणलं. आजच्या काळात सिंधुताई सकपाळांचं ठसठशीत उदाहरण आपल्यासमोर आहेच. आपल्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यातही आपलं कर्तृत्व दाखवलं. आपल्या आजूबाजूला नजर टाकली, तर अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील.

आज कोणतंही क्षेत्र असं नाही की, स्त्रिया आपलं कर्तृत्व दाखवत नाहीत. अशांपुढे आपले कर नक्कीच जुळतील. म्हणूनच म्हटलंय ना, ‘न मातृ: परमदैवतम।’ आईसारखे दैवत सा-या जगतावर नाही..!