आता हळूहळू लगीनघाई सुरू झाली आहे. त्यामुळे हनिमूनला कोठे जायचे, याचे प्लॅनिंगही सुरू आहे. यासाठी महाराष्ट्राबाहेरच्याच ठिकाणांचा आवर्जून विचार केला जातो. वास्तविक आपल्या राज्यात, आपल्या जवळपासदेखील आपल्या सहजीवनाची सुरुवात मधुर होईल, अशी अनेक ठिकाणं आहेत.

लोणावळा, खंडाळा,
कोल्हापूरचा पन्हाळा,
बेंगलोर-गोवा नि काश्मीरला,
कुठं कुठं जायाचं हनिमूनला?

ऐंशीच्या दशकात धम्माल लोकप्रिय झालेले हे गीत. हनिमूनची संकल्पना आपल्याकडे ब-यापैकी रुळू लागली तो काळ. त्या काळानुसार फेमस असणा-या या पर्यटन स्थळांचा उल्लेख आणि तिकडे जाण्याची इच्छा. कालांतराने बेंगलोर, गोवा आणि काश्मीर ही महाराष्ट्राबाहेरची ठिकाणे चांगलीच विकसित झाली. त्याच जोडीने अनेक नवीन ठिकाणेदेखील आली. यातील काही ठिकाणे केवळ नावापुरतीच उरली. पण त्याच वेळी महाराष्ट्रात मात्र हा ट्रेण्ड वाढला का? लोणावळा, खंडाळाच्या पुढे काही नवीन ठिकाणे आलीत की नाही? अगदी खरे सांगायचे तर ही यादी काही फार वाढलीच नाही. महाबळेश्वर, माथेरान अशा काही हिल स्टेशन्सची त्यात भर पडली, पण ती तेवढीच. द-याखो-यांचा समृद्ध सह्याद्री, नीतळ समुद्रकिना-यांचा कोकण, विदर्भ वन्यजीव अभयारण्यांची रेलचेल असे बरेच काही असणा-या या निसर्गसौंदर्याने नटलेल्या महाराष्ट्रात मात्र आजदेखील कुठं कुठं जायाचं हनिमूनला हा प्रश्न विचारला की उत्तर महाराष्ट्राबाहेरचेच येते, असे का?

खरे तर महाराष्ट्रातील प्रत्येक पर्यटनस्थळे वीकेण्डला दुथडी भरून वाहत असते. महाबळेश्वर, खंडाळा अशा ठिकाणी तर पंचतारांकित दर्जाच्या सुविधा आहेत. पण हनिमूनर्स मात्र याकडे पाठ फिरवून बाहेर जाताना दिसतात. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ही सर्व पर्यटन स्थळे विकसित झाली ती मुख्यत: कुटुंबीयांचे, तसेच मित्रमैत्रिणींचे ग्रुप डोळ्यांसमोर ठेवून. त्यामुळे हनिमूनससाठी जशी पॅकेज इतर ठिकाणी असतात तशी पॅकेजेसची कमतरता आहे. अगदी ठरावीक ठिकाणे सोडली तर त्या त्या पर्यटन स्थळाच्या रेल्वे स्टेशनपासून ते पुन्हा रेल्वे स्टेशनपर्यंत येणारी खासगी वाहतूक सुविधा सहजपणे उपलब्ध होतेच असे नाही.

असो. मात्र तरीदेखील जगभरातील हनिमून डेस्टिनेशन्सची माहिती देताना महाराष्ट्राचा विचार करावा लागतो तो मात्र कमी काळासाठी, कमी खर्चातील ठिकाणे म्हणून. गेल्या पाच वर्षात पर्यटन विकासाचे जे काही प्रयत्न झाले त्यामुळे काही प्रमाणात का होईना येथे हनिमूनर्सना वाव आहे. अशांपैकी उल्लेख करावा अशी ठिकाणे म्हणजे चिखलदरा, तारकर्ली, गणपतीपुळे, दापोली परिसर आणि तोरणमाळ. मुख्यत: कोकणात झालेला पर्यटनाचा विकास तारकर्ली आणि दापोली परिसरासाठी फायद्याचा ठरताना दिसतो. तीन-चार दिवसांसाठी कमी खर्चात (साधारण पंधरा ते वीस हजार रुपये) हवा तसा एकांत देणारी ठिकाणे म्हणून यांचा विचार करायला काहीच हरकत नाही.

लोणावळा, खंडाळा, पन्हाळा पैकी पन्हाळा तर आता कोणत्याच प्रकारच्या पर्यटनाला पूरक राहिलेला नाही, तर लोणावळा, खंडाळ्याने सर्वच प्रकारच्या पर्यटकांना सामावून घेतले आहे. महाबळेश्वर, माथेरान या हिलस्टेशन्सचा विकास भरपूर झाला, पण त्यांनीदेखील खर्चाची उड्डाणे घेतली आहेत. तरीदेखील माथेरान, खंडाळा, लोणावळा, महाबळेश्वर या हिलस्टेशन्सचा विचारदेखील हनिमूनर्स नक्कीच करू शकतात. अर्थात या सर्वच ठिकाणी वीकेण्ड पर्यटनाचा ताण खूप असल्यामुळे शक्यतो ते दिवस टाळून इतर पाच दिवसांना प्राधान्य द्यावे. अशा वेळी हॉटेल्सदेखील उपलब्ध असतात आणि खर्चदेखील आटोपशीर होऊ शकतो. दुसरे महत्त्वाचे म्हणजे या सर्व ठिकाणी तुलनेने सर्व सुविधा उपलब्ध आहेत. ही ठिकाणे मुख्य रस्त्यांना जोडलेली आहेत, निसर्गसौंदर्यात कसलीच उणीव नाही, भटकण्यासाठी अनेक स्पॉट्स आहेत, त्यासाठी गाडीची व्यवस्था होऊ शकते. त्यामुळे या चारही ठिकाणी वीकेण्ड सोडून गेल्यास नक्कीच छान एकांत लाभू शकेल. मुंबई-पुणेकरांसाठी माथेरान हा सर्वात उत्तम आणि स्वस्त पर्याय खूप आनंद देणारा आहे.

हिलस्टेशनमध्ये आणखीन दोन चांगल्या ठिकाणांची भर पडली आहे, ती म्हणजे विदर्भातील चिखलदरा आणि सातपुडय़ातील तोरणमाळची. चिखलदराची ओळख हल्ली नागपूरकरांचे महाबळेश्वर अशीच झाली आहे. वन्यजीव अभयारण्य, तसेच गावीलगडसारखा अक्राळविक्राळ किल्ला आणि मुख्य म्हणजे अतिशय शांत अशा ठिकाणी असलेले एमटीडीसीचे निवासस्थान. येथे अगदी पुरेपूर एकांत मिळतो. फक्त तुम्हाला माणसांच्या गर्दीपासून दूर राहायची सवय नसेल, तर थोडे अवघड आहे. इतर प्रसिद्ध पर्यटन स्थळांप्रमाणे सर्व सुविधा हात जोडून उभ्या असतील अशी अपेक्षा येथे करू नये. चिखलद-याला जोडून शेगावलादेखील जाता येऊ शकते.

कोकणातील पर्यटनाला गेल्या काही वर्षात चांगलीच चालना मिळाली आहे. त्यामुळे तारकर्ली, गणपतीपुळे आणि दापोली परिसर ही उत्तम ठिकाणे आहेत. मालवण-तारकर्ली येथे हॉटेलची सुविधा चांगली आहेच, पण त्याचबरोबर अंतर्गत प्रवासाची सुविधादेखील उपलब्ध आहे. भोगवे आणि निवती हे नितांतसुदर समुद्रकिनारे आपल्या एकूणच वातावरणातील रोमांचकतेत भर घालतात. दापोली आणि परिसरात हर्णे, मुरूड हे बीच डॉल्फीनसाठी प्रसिद्ध आहेत. दापोलीत उत्तम सुविधा देणारी काही रिसॉर्टसदेखील आहेत, तर गणपतीपुळे येथील एमटीडीसीचे रिसॉर्ट एकदम झकास आहे.

हिल स्टेशन म्हणून नाही पण निसर्गाच्या कुशीत वसलेले एक टुमदार ठिकाण म्हणून कोयनेचा पर्यायदेखील उत्तम आहे. पण त्या ठिकाणी आपले स्वत:चे वाहन असेल तरच योग्य ठरेल. कोयनानगरमध्ये थेट धरणाच्या वरच्या अंगाला असणा-या डोंगरावर काही उत्तम हॉटेल्स सध्या उपलब्ध आहेत. कोयनेचे घनदाट खोरे आणि अथांग जलाशय हे दृश्य हे नक्कीच रोमँटिक म्हणावे लागेल.

दुसरा एक चांगला पर्याय म्हणजे हल्ली घाटवाटांच्या परिसरात छोटीमोठी रिसॉर्ट्स आहेत. अर्थात तेथे यापूर्वी जाऊन आलेल्या व्यक्तीच्या सल्ल्यानुसारच त्यांची निवड करावी. महाराष्ट्रातील काही पर्यटनस्थळांवर एक ठरावीक असा शिक्का बसलेला आहे. त्यामुळे दुस-या राज्यातल्या अशाच स्वरूपाच्या पर्यटनस्थळी आपण जातो, पण महाराष्ट्राचा विचार करत नाही. ताडोबा म्हटले की तेथील गरम वातावरण आणि वाघच पाहायचा असतो असा आपला ठाम समज. खरे तर विदर्भातील जंगले ही हिवाळी पर्यटनासाठीदेखील उत्तम पर्याय आहेत. तेव्हा हिवाळ्यातील हनिमूनसाठी अशा ठिकाणांचा विचार करायला हरकत नाही. अशा ठिकाणी थोडय़ा सोयीसुविधा कमी असू शकतात. पण हिवाळ्यात जंगलातली शांतता अनुभवण्यासाठी आणि खराखुरा एकांत मिळवण्यासाठी हे पर्याय तपासून पाहायला हरकत नाही. एमटीडीसीच्या निवासव्यवस्था अनेक पर्यटनस्थळावर अगदी मोक्याच्या जागी आहेत. त्यांचे शुल्क तुलनेने कमी असते.

केव्हा जाल : माथेरान, महाबळेश्वर, लोणावळा, खंडाळा, चिखलदरा, तोरणमाळ या ठिकाणी वर्षभर केव्हाही जाता येते. कोयनानगरला पावसाळा आणि हिवाळ्यात जावे. फक्त अतिपर्जन्यमानाच्या काळात टाळावे. वन्यजीव अभयारण्यात वन्यजीव पाहण्यासाठी एप्रिल-मेचा कालावधी योग्य. पण शांतता हवी असेल, तर हिवाळ्यात जाणे इष्ट.